साप्ताहिक राशिभविष्य : (२२ जून २०२५ ते २८ जून २०२५)
मौल्यवान वस्तू सांभाळा
मेष : सप्ताहात शुभ ग्रहांची लॉबीच क्रियाशील राहील. मात्र सप्ताहात नियोजनबद्ध राहा. वेळेचे भान ठेवा. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. बाकी सप्ताहात रविगुरु सहयोगाचे उत्तम पाठबळ अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना मिळणार आहे. तरुणांना विशिष्ट संधीचा लाभ निश्चितच मिळेल. सप्ताहाचा शेवट एकूणच गोड बातम्या पुरवेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कोर्ट प्रकरणात यश मिळेल. शुक्रवार महत्त्वाच्या गाठीभेटीतून फलदायी होणारा. घरात तरुणांचे भाग्योदय होतील.
सरकारी कामांमध्ये यश येईल
वृषभ : सप्ताहात रविगुरु युतियोगाची पार्श्वभूमी कुयोगांच्या झळा कमी करेल. मात्र सप्ताहात अमावस्येचे प्रभावक्षेत्र चोरी नुकसानीतून जपण्याचे आहे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट संसर्गजन्य बाधेतून त्रास होऊ शकतो. खरेदी-विक्रीत फसू नका. बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कामांतून साथ देणारा. पुत्रोत्कर्ष धन्यता देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार वैयक्तिक सुवार्तांतून जल्लोषाचा ठरेल. कलाकारांना विशिष्ट मानसन्मान चकित करतील. व्यावसायिक उत्सव प्रदर्शने गाजतील. प्रेमिकांना शुभसंदेश मिळतील.
परदेशातील तरुणांचे प्रश्न सुटतील
मिथुन : सप्ताहातील अमावस्या दैवी चमत्कारांतून थक्क करेल. विशिष्ट गुप्तचिंता जाईल. रविगुरु युतियोगाचे पॅकेज सप्ताहावर पूर्ण अंमल करेल. आजचा रविवार याचीच प्रचिती देईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात भाजण्या-कापण्यापासून सावध राहावे. बाकी सप्ताह गुरु भ्रमणाचा उत्तम लाभ उठवेलच. तरुणांच्या नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ वैयक्तिक सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेलच. विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी होतील. कलाकारांना सप्ताह विलक्षण असाच राहील. परदेशी तरुणांचे मोठे प्रश्न सुटतील.
मित्रमंडळींकडून मोठे साहाय्य लाभेल
कर्क : सप्ताहाची ग्रह पार्श्वभूमी संमिश्र फळे देणारी. काहींना नैसर्गिक दुर्घटनांतून नुकसानीचे योग संभवतात. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी परिस्थितीचे भान ठेवावे. प्रवासात सांभाळावे. घरातील वृद्धांची काळजी घ्यावी. अमावस्येचे प्रभावक्षेत्र विचित्र जागरणाचे होऊ शकते. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर विशिष्ट भाग्यसंकेत देणारा. वास्तुविषयक खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नोकरी मिळवून देईल. विवाहविषयकही हालचाली होतील. मित्रमंडळांकडून मोठे साहाय्य मिळेल.
नोकरीमध्ये प्रभुत्व गाजवाल
सिंह : रवि-गुरु युतियोगाची पार्श्वभूमी अमावस्येच्या सप्ताहातही मोठे चमत्कार घडवेल. शिवाय शुक्रभ्रमणाच्या कला चांगलाच प्रभाव टाकतील. तरुणांनो, सप्ताहाच्या आरंभापासून लाभ घेतच सुटा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची शैलीदार फलंदाजी होईल. विशिष्ट स्पर्धापरीक्षांतून चमकाल. मात्र सप्ताहातील बुधवारच्या अमावस्येचे प्रभावक्षेत्र प्रवासात विचित्र दुखापती घडवू शकते. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ दणकेबाज राहील. मोठी मनासारखी कामे होतील. नोकरीत प्रभुत्व गाजवाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ सुवार्तांची मोठी परंपरा ठेवेल. आजचा रविवार गाठीभेटीतून भाग्यबीजे पेरणारा.
महत्त्वाच्या गाठीभेटी होतील
कन्या : सप्ताहात विरोधी पार्श्वभूमीवरही रविगुरु युतियोगाची साथ मिळेल. सप्ताहारंभ घरात आनंदोत्सवाचाच राहील. वैवाहिक जीवनातील भावस्पंदने साथ देतील. उत्तरा नक्षत्रास नोकरीतील गुप्तचिंता जाऊन दिलासा मिळेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २७ हे दिवस अतिशय सुसंगत असे राहतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. घरात मुलामुलींची कार्य ठरवाल. बेरोजगारांना उत्तम नोकरीचा लाभ मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहात चैनीवर खर्च होईल. सप्ताहात हातापायाच्या दुखापती जपा. घरातील द्वाड लहान मुलांकडे लक्ष द्या.
दुखापतीपासून सावध राहा
तूळ : सप्ताहातील रविगुरु युतियोगाची पार्श्वभूमी बुद्धिजीवी मंडळींना छान प्रेरणा देणारी, आपल्या गुणांनी मोठी छाप टाकाल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा वाव मिळत राहील. नोकरीतून मानांकन वाढेल. सप्ताहाचा शेवट मोठा अद्वितीय यश देणारा. स्वाती नक्षत्रच्या व्यक्तींना एकूणच सुसंगत राहील. मात्र सप्ताहात दुखापतीपासून सावध राहा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सप्ताहाचे सुंदर बजेट घोषित करेल. ता. २६ व २७ हे दिवस एकूणच आपल्या राशीस गाठीभेटीतून सुसंवादी राहतील. तरुणांना फलदायी होणारे.
मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात
वृश्चिक : अमावस्येचा सप्ताह आजूबाजूचे पर्यावरण बिघडवणारा. अन्नपाण्यातून संसर्ग होऊ देऊ नका. सप्ताहात नोकरीत गैरसमज होऊ देऊ नका. काहींना नोकरीत बदलीचे सावट अस्वस्थ करेल. नोकरीत वरिष्ठांशी हुज्जती नकोत. बाकी सप्ताहातील शुभ ग्रहांची रसद अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मिळू शकते. ता. २४ व २५ हे दिवस एखादी ग्रासलेली गुप्तचिंता घालवतील. बँकेकडून अर्थसाहाय्य होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ जुनाट व्याधींपासून सतावणारा. मस्तकशूळ उठेल.
कलाकारांना लक्षणीय यश मिळेल
धनु : राशींच्या एक्स्चेंजमध्ये आपली रास अनेक माध्यमांतून लक्ष वेधून घेणार आहे. रविगुरु युतियोगाच्या पार्श्वभूमीवर अमावस्या पौर्णिमेसारखी फळे देईल. आजचा रविवारचा सूर्योदय सप्ताहाची शुभलक्षणेच दाखवत होईल. मूळ नक्षत्रास ता. २५ ते २७ हे दिवस दैवी प्रचितीचे ठरतील. नोकरीतून परदेशगमनाचे योग. व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचे फिल्ड मोठे अनुकूल राहील. प्रेमिकांचे निर्णायक संवाद होतील. विशिष्ट व्यावसायिक भागीदारी यशस्वी होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सुवार्तांची मोठी शृंखला ठेवेल. कलाकारांना झगमगाटी यश मिळेल. व्यावसायिक प्रदर्शने उत्तम प्रतिसाद देतील.
आरोग्यविषयक पथ्ये पाळावीतच
मकर : सप्ताहातील अमावस्या शत्रुत्वाच्या झळांतून त्रास देऊ शकते. सप्ताहारंभी घरी वा दारी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाच. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहाच्या शेवटी विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ देईल. विशिष्ट पर्याय पुढे येतील आणि भाग्यनिश्चिती होईल. सप्ताहात श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी आरोग्यविषयक पथ्ये पाळावीतच. घरातील वृद्धांशी वाद टाळा. नवपरिणीत तरुणांनी एकमेकांशी गैरसमज टाळावेत. अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात खरेदीत फसू नका. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या सुरुवातीस थट्टामस्करी टाळावी.
नव्या ओळखी फलद्रूप होतील
कुंभ : सप्ताहातील रविगुरु युतियोगाची पार्श्वभूमी आणि शुक्र भ्रमण तरुणांना विशिष्ट कलागुणांतून प्रकाशातच आणणारे. मात्र सप्ताहात वाहने जपून चालवा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी निश्चितच जपलं पाहिजे. बाकी आपल्या राशीस एकूणच सप्ताह बुद्धिकौशल्यातून लाभ देणारा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींच्या नव्या ओळखी फलद्रूप होतील. सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार शुभग्रहांच्या पॅकेजमधूनच फलदायी होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विलक्षण अशा संधी येतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. वास्तुविषयक खरेदी-विक्रीचे व्यवहार संपन्न होतील.
आर्थिक प्राप्ती चांगलीच राहील
मीन : सप्ताहातील रविगुरु युतियोग साडेसातीच्या झळा कमी करेल. विशिष्ट शत्रुत्वाला परिस्थितीजन्य लगाम बसेल. काहींच्या राजकीय ओळखी काम पूर्ण करून देतील. बाकी सप्ताहात व्यावसायिक आर्थिक प्राप्ती चांगलीच राहील. व्यावसायिक जाहिराती यशस्वी होतील. मात्र सप्ताहात बेकायदेशीर व्यवहार टाळाच. अमावस्येजवळ सर्व प्रकारची आचारसंहिता पाळाच. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार शुभ ग्रहांच्या माध्यमातूनच चांगले परिणाम दाखवतील. मुलाखती, गाठीभेटी आणि करारमदार यशस्वी होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार एकूणच जल्लोषाचा. घरात कार्य ठरतील. खाण्यापिण्याची चैन कराल. घरातील स्त्रीवर्ग खूष राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.