weekly horoscope 23rd february 2025 to 1st march 2025
weekly horoscope 23rd february 2025 to 1st march 2025Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (२३ फेब्रुवारी २०२५ ते ०१ मार्च २०२५)

जीवनात येऊन शिवतत्त्वाला समजून घेणे यालाच जीवनसाधना म्हणतात.
Published on

शत्रुत्वाच्या झळा कमी होतील

मेष : सप्ताहाची सुरुवात स्वतंत्र व्यावसायिकांना मोठीच प्रेरक राहील. काहींना सरकारीपदस्थ व्यक्तींकडून लाभाची शक्यता आहे. शत्रुत्वाच्या झळा चांगल्याच कमी होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या प्रकाशात येतील. ता. २६ ची महाशिवरात्र मोठी शुभशकुनाची असेल. नोकरीत बढतीचा मार्ग खुला होईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार गाठीभेटींतून भाग्यबीजे पेरणारा. पुत्रविषयक विशिष्ट चिंता जाईल. अमावस्या देवदर्शनाची ठरेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र विशिष्ट भातृचिंतेचे ठरण्याची शक्यता.

नोकरीत स्थैर्य लाभेल

वृषभ : सप्ताहातील बुध-शनी युती योग मोठी अजब फळे देईल. महाशिवरात्र दैवी प्रचितीची ठरेल. नोकरीत स्थैर्य लाभेलच. तरुणांना शैक्षणिक संदर्भातून मार्गस्थ करणारे ग्रहमान आहे. नोकरीच्या क्षेत्रात मनासारख्या संधी येतील. मुलाखतीसाठी तयार राहाच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक माध्यमांतून मोठे आश्वासक स्वरुपाचे ग्रहमान राहील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात दंतव्यथा त्रास देऊ शकते. बाकी सप्ताहात नोकरीतील ताण जाईलच. सप्ताहातील अमावस्येचे प्रभावक्षेत्र सप्ताहाच्या शेवटी संमिश्र परिणाम दाखवेल. घरात वडीलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग टाळाच.

व्याधी आटोक्यात येतील

मिथुन : सप्ताहात राशीचा मंगळ मार्गी होत आहे. शारीरिक वेदनायुक्त विशिष्ट व्याधी आटोक्यात येईल. नोकरीतील अस्वास्थ्य जाईल. कलावंतांची स्वप्न साकारेल. उद्याची विजया एकादशी विजयोत्सवाची. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या चैनीचे तसेच आनंद देणारे प्रसंग येतील. पती वा पत्नीचा भाग्योदय होईल. व्यावसायिकांचे मार्केटिंग यशस्वी होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठे आत्मिक बळ प्राप्त होईल. एखादा गॉडफादर भेटेल. पुत्रपौत्रांचा भाग्योदय होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना महाशिवरात्रीच्या नजीकच्या काळात साधनेचे फळ मिळेल. शत्रू मित्र बनतील.

नोकरीतील बदली लाभदायक

कर्क : सप्ताहात वारसाहक्काचे विशिष्ट प्रश्न सुटतील. ता. २५ व २६ हे दिवस घरात मोठे पवित्र वातावरण ठेवतील. मातृपितृबाबत चिंता जाईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना महाशिवरात्रीचा दिवस पर्वणीचा राहील. काहींना नोकरीतील बदलीतून लाभ घडतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र विचित्र गाठीभेटी घडवून त्रास देईल. कोणाशीही दुष्टोत्तरे टाळाच. नवपरिणितांनी सावध राहावे. सप्ताहात मौल्यवान दागिने किंवा वस्तू सांभाळा. असत्य वचने टाळा. चहाडी-चुगली यापासून लांब राहा.

अपयश पुसून काढाल

सिंह : सप्ताहात बुद्धिजीवी मंडळींना अतिशय प्रेरक ग्रहमान राहील. सप्ताह कलाकारांना पर्वणीसारखाच. मोठ्या छान फ्लॅशन्यूज द्याल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा मार्केटमधील शेअरचा भाव चांगलाच वाढेल. सप्ताहात होतकरू तरुणांना मोठा वाव मिळेल. एखादे अपयश धुवून काढाल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सप्ताहाचे सुंदर पॅकेज घोषित करेल. एखादे बोचरे हृदयशल्य जाईल. मात्र अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात घरामध्ये वागण्या-बोलण्यातून भान ठेवा. स्त्री वर्गाबरोबर वागताना गैरसमज होऊ देऊ नका.

तरुणांचे भाग्य उजळेल

कन्या : सप्ताहात सर्व प्रकारांतून आचारसंहिता पाळाच. पथ्ये पाळाच. बाकी सप्ताहातील शुभ ग्रहांचा अंडरकरंट राहीलच. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा सुंदर लाभ घेतील. सप्ताहात घरातील मानसिक पर्यावरण छानच राहील. ता. २६ ची महाशिवरात्र विशिष्ट आत्मसंकल्प पूर्ण करणारी. घरातील तरुणांचे भाग्य उजळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ विशिष्ट नैतिक विजय मिळवून देईल. मात्र अमावस्येचे प्रभावक्षेत्र प्रवासातील बेरंग करणारे ठरेल. सप्ताहात सुवर्णालंकार जपा. कुसंगत टाळा.

सरकारी अनुदानाचा लाभ होईल

तूळ : सप्ताहातील बुध-शनी शुभयोगाचा तरुणांना छान लाभ होईल. तरुणांना कॅम्पसमधून नोकरी मिळेल. स्वाती नक्षत्रच्या व्यक्तींची एखादी खंत जाईल किंवा मिटेल. ता. २६ ची महाशिवरात्र हृद्य घटनांतून सद्‍गदित करेल. घरात मोठे पवित्र वातावरण राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात बौद्धिक उपक्रमांतून साथ देणारी. व्यावसायिक उपक्रम गाजतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह कर्तृत्वाला वाव देणारा ठरेल. सरकारी अनुदानातून लाभ मिळेल.

महत्त्वाची कागदपत्रे जपा

वृश्चिक : सप्ताहातील मंगळ भ्रमणाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पाळावीच लागेल. यंत्रे, वाहने जपून चालवा. भाजणे, कापणे सांभाळा. बाकी सप्ताह ता. २६ च्या महाशिवरात्रीच्या प्रभावात शुभग्रहांचा वरचष्मा ठेवेल. होतकरू तरुणांना सप्ताहाचा आरंभ प्रयत्नांना मोठे यश देणारा. नोकरीत मानांकन लाभेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ऐनवेळी थोरामोठ्यांची साथ लाभेल. नोकरीवर आलेले एखादे संकट जाईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचे आहे. बेकायदेशीर व्यवहार टाळा. महत्त्वाची कागदपत्रे जपा.

नोकरीतला विरोध मावळेल

धनु : सप्ताहात वक्री मंगळ मार्गी होत आहे. सप्ताहात जीवन प्रवासातील धोक्याची वळणे पार करणार आहात. सप्ताहात एकंदरच घरचे आणि दारचे पर्यावरण सुधारणार आहे. नोकरी-व्यावसायिक विरोध मावळेल. वैवाहिक जीवनातील भावरम्य वातावरण गवसेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना महाशिवरात्र जीवनसत्त्वांचा बूस्टर डोस देणारी. मूळ नक्षत्रच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठी भाग्यलक्षणे दाखवेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या वेंधळेपणातून विचित्र प्रसंग घडवणारी.

परदेशगमनातले अडथळे दूर होतील

मकर : सप्ताहात तरुणांना मार्गस्थ करणारेच ग्रहमान राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना महाशिवरात्रीच्या जवळपास नक्षत्रदेवता प्रसन्न राहतील. नोकरी-व्यावसायिक पर्यावरण अतिशय सुंदर राहील. घरगुती भावजीवन अतिशय पवित्र स्पंदने सोडेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम शैक्षणिक पर्याय लाभतील. परदेशगमनातील अडसर दूर होतील. ता. २८ चा शुक्रवार उत्तम गाठीभेटींचा आणि मुलाखतींचा. उद्याचा सोमवार धनिष्ठा नक्षत्रास सूर्योदयी दुखापतींचा ठरण्याची शक्यता आहे.

नवकल्पनांना वाव देणारा कालखंड

कुंभ : सप्ताहातील ग्रहमानाचा ट्रॅक आपल्या राशीला सुरक्षित वाटचाल करून देणारा आहे. मात्र वेगमर्यादा सांभाळा. अमावस्येजवळ सार्वजनिक जीवन सांभाळा. सप्ताहातील बुध-शनी युती योगाचा प्रभाव नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर उत्तमच राहील. नवकल्पनांना वाव देणारे ग्रहमान. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती जनमानसावर उत्तम छाप टाकतील. ता. २४ व २५ हे दिवस विक्रमी यश मिळवून देतील. नोकरीत वरिष्ठांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात आणि शेवट मोठा भावरम्य राहील. मात्र अमावस्येजवळ अन्नपाण्यातील संसर्ग जपा.

प्रामाणिक प्रयत्नाचे चीज होईल

मीन : सप्ताह अमावस्येच्या अनुषंगाने बोलणारा. सप्ताहामध्ये निराशाजनक विचार टाळा. संतसज्जनांच्याच सहवासात किंवा स्मरणात राहा. ता. २६ ची महाशिवरात्र याचीच प्रचिती देईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ ते २६ हे दिवस अर्थातच त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे चीज करतील. नोकरीत-व्यावसायिक क्षेत्रात एक पर्व सुरू होईल. अर्थातच तथाकथित साडेसातीतही घाबरू नका. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात शुक्रकलांतून त्यांचे जीवनातील भावनिक पर्यावरण अबाधित ठेवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com