साप्ताहिक राशिभविष्य : (२३ मार्च २०२५ ते २९ मार्च २०२५)
ओळखीतून लाभ होईल
मेष : सप्ताहातील रवी, बुध, शुक्र यांच्या ग्रहयोगातच अवतरणारे फिल्ड परदेशस्थ तरुणांना वाव देणारे. काहींना उत्तम शैक्षणिक संधी येतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांची परंपरा ठेवतील. नोकरीच्या मुलाखतींसाठी तयार राहाच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ चा एकादशीचा दिवस गुरुकृपेचा. नव्या प्रकारची गुंतवणूक फलद्रूप होईल. बँकांची कामे होतील. काहींना नव्या ओळखीतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उष्णताजन्य विकार. काहींना अर्धशिशीचा त्रास शक्य आहे. सप्ताहात शेजारी सांभाळा. काहींना कामगारपीडा होण्याची शक्यता.
नोकरीतील ताण जाईल
वृषभ : सप्ताहातील रवी, बुध युती योगाचे फिल्ड तरुणांना यशस्वी चौकार षटकार मारू देईल. ता. २४ ते २६ या दिवसांत नवीन उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे नुकसानीचे भय जाईल. रोगावर औषध लागू पडेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. नोकरीतील ताण जाईल. काहींना वास्तुविषयक व्यवहारातून लाभ होतील. न्यायालयातील खटला संपेल. भावाबहिणींचे प्रश्न सुटतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या आरंभी प्रवासात वस्तू सांभाळाव्यात.
मुलाखतींमध्ये यश लाभेल
मिथुन : सप्ताहातील रवी, बुध युती योगाची पार्श्वभूमी आणि वक्री शुक्रभ्रमण स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे आर्थिक लाभ करून देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश लाभेल. विशिष्ट नव्या ओळखींतून लाभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश लाभेल. घरातील मुलाबाळांचे भवितव्य ठरेल. सप्ताह प्रेमिकांचा विरोध घालविणारा. जीवनात मार्गस्थ व्हाल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र मातृपितृ चिंतेचे ठरू शकते. काहींना जागरणाचे प्रसंग येतील. नोकरीतील राजकारणात पडू नका.
परिस्थितीची साथ मिळेल
कर्क : सप्ताहातील ग्रहमान मोठी ऐतिहासिक फळे देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस परिस्थितीची उत्तम साथ देतील. नवपरिणितांना वास्तुयोग चकित करतील. बँकेची कर्जमंजुरी होईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक गॉडफादर भेटेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पापविमोचनी एकादशीचे प्रभावक्षेत्र दैवी चमत्कार दाखवेल. एखादी ग्रासलेली पुत्रचिंता जाईल. मात्र अमावस्येजवळ रहदारीत सांभाळा. पैशाचे पाकीट जपा.
व्हिसाविषयक अडचणी संपतील
सिंह : सप्ताहात व्यावसायिक पार्श्वभूमीवर तेजी राहील. विशिष्ट सरकारी निर्णयातून लाभ होतील. काहींना राजकीय व्यक्तींचे पाठबळ मिळेल. मात्र सप्ताहात अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात गर्भवतींनी काळजी घ्यावी. सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक चिंता घालवणारे ग्रहमान. काहींना कॅम्पसमधून नोकरी. परदेशी व्हिसाचा प्रश्न सुटेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील एकादशीचे प्रभावक्षेत्र महत्त्वाच्या गाठीभेटींतून चमत्कार घडवेल. मुलाबाळांचे भाग्य उलगडेल. अमावस्येजवळ अंधारात धडपडू नका किंवा तिन्हीसांज सांभाळा. घरातील लहान मुले सांभाळा.
आत्मविश्वास वाढणारा कालखंड
कन्या : सप्ताहातील भावनिक ग्रहांची स्पंदने प्रभावशाली राहतील. ता. २५ ते २७ हे दिवस अनेक प्रसंगांतून हृद्यच राहतील. उत्तरा नक्षत्रास नोकरीतील नव्या जडणघडणीतून लाभ. परदेशस्थ तरुणांचे व्हिसाचे प्रश्न सुटतील. काहींना राजकीय मध्यस्थीतून लाभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ आत्मविश्वास वाढवेलच. नोकरीत बढतीकडे वाटचाल. मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य मिळेल. एखादी व्याधी चिंता कायमची जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची कोर्ट प्रकरणातून सुटका. मात्र, अमावस्येजवळ आपल्या राशिव्यक्तींनी प्रवासातील संसर्ग सांभाळा.
वास्तूविषयक व्यवहारात लाभ
तूळ : सप्ताहातील ग्रहमान वैचारिक गोंधळ करणारेच वाटते. कोणाचा सल्ला घेताना सावधान! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कायदेशीर प्रश्न सतावू शकतात. सप्ताहात भाऊबंदकीचे प्रश्न जपून हाताळा. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना छानच राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ वास्तुविषयक व्यवहारातून लाभ देणारा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचेच. नोकरीतील ताण जाईल. मात्र अमावस्येजवळ फसवणुकीचे प्रसंग येऊ शकतात.
कष्टाचे चीज होईल
वृश्चिक : सप्ताहातील शुभग्रहांचे फिल्ड बुद्धिकौशल्यातून लाभ देणार. ता. २४ ते २६ हे दिवस आत्यंतिक प्रवाही राहतील. होतकरू तरुणांना हा सप्ताह कष्टाचे चीज करेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक आर्थिक व्यवहारांतून लाभ होतील. व्यावसायिक हितशत्रूंच्या पीडेतून मुक्त व्हाल. सप्ताह गुणी कलावंतांना चांगलाच वाव देईल. काहींना विशिष्ट सरकारी साहाय्य मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पती व पत्नीच्या भाग्योदयातून जीवनातील अस्वस्थता जाईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ प्रिय व्यक्तींशी वाद टाळावेत.
अपयश धुऊन काढाल
धनू : सप्ताहात वैचारिक गोंधळ निर्माण करणारे प्रसंग उद्भवतील. घरातील वादात पडू नका. बाकी सप्ताहातील शुभग्रहांची लॉबी नोकरीत कर्तृत्वाला उजाळा देणारीच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट अपयश धुवून काढता येईल. सप्ताह मुलाखती गाठीभेटीतून प्रभाव टाकणारा. ता. २६ चा बुधवार विशिष्ट यशाची गुढी उभारणाराच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना हितशत्रूच्या कारवायांवर मात करता येईल. मात्र शनिवारची अमावस्या विचित्र गाठीभेटी घडवू शकते. वाहतुकीत सिग्नल किंवा नियम पाळाच.
सुवार्ता मिळणारा काल
मकर : सप्ताह दमदार वाटचालीचाच राहील. मात्र शारीरिक मस्ती नकोच. वृद्धांनी सांभाळावे. बाकी उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कलात्मक अभिव्यक्तीतून प्रकाशात आणणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ ते २७ हे दिवस सुवार्तांची यशस्वी परंपराच ठेवणारे. तरुणांनी आपला सकारात्मक दृष्टिकोनच ठेवून राहावे. सप्ताह धनिष्ठा नक्षत्रच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. मात्र अमावस्येचे प्रभावक्षेत्र विचित्र गाठीभेटीतून स्फोटक ठरू शकते.
वादग्रस्त येणी वसूल होतील
कुंभ : सप्ताहातील रवि-बुध-शुक्र या ग्रहांची संगत मोठी वैशिष्ट्यपूर्ण फळे देईल. विशिष्ट प्रतीक्षा संपेल. व्यावसायिक वादग्रस्त येणी येतील. काहींना मित्रमंडळींकडून लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत विशिष्ट दिलासा मिळेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस पुत्रोत्कर्षातून साजरे होतील. नोकरीत हितशत्रूंवर मात कराल. काहींना शेअरबाजारातून अकल्पित लाभ. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास अमावस्येचे प्रभावक्षेत्र धावपळीचे आहे. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या.
व्यावसायिक उत्कर्ष होईल
मीन : सप्ताहातील शुभग्रहांचे ग्रहयोग साथ देणारेच. स्वतंत्र व्यावसायिकांची मंदी जाईल. विशिष्ट नवे करारमदार होऊन आर्थिक प्राप्तीची निश्चिती होईल. ता. २५ व २६ हे एकादशीच्या प्रभावक्षेत्रातील दिवस मोठ्या व्यावसायिक उत्कर्षाचेच ठरतील. मार्केटमध्ये आपल्या शेअरचा भाव चांगलाच वाढेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट आदरसत्कारांतून लाभ होतील. पुत्रोत्कर्षातून जीवनाचे सार्थक होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात दुर्मीळ असे विवाहयोग येतील. लक्ष ठेवून राहाच!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.