weekly horoscope 25th february 2024 to 2nd march 2024
weekly horoscope 25th february 2024 to 2nd march 2024Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (२५ फेब्रुवारी २०२४ ते २ मार्च २०२४)

शरीररूपी हाडांच्या सापळ्यात अडकलेलं माणसाचं जीवन सध्या पुढं पाऊल टाकू का थांबू, सिग्नल पाळू का तोडू अशा विचित्र संभ्रमातून धडपडत चाललेलंच आपण पाहत आहोत.

महत्त्वाच्या गाठीभेटी होतील

मेष : सप्ताह ग्रहयोगांतून महत्त्वाच्या गाठीभेटी, विशिष्ट करारमदार आणि वादग्रस्त पार्श्वभूमीवर सामोपचारातून अर्थातूनच तडजोडींतून मार्ग काढणारा. आजचा रविवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना भाग्योदयाची चाहूल देईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार आणि शुक्रवार मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवतील. विवाहविषयक गाठीभेटी.

नोकरीत राजकारणामुळं त्रास

वृषभ : स्वतंत्र व्यावसायिकांच्या संदर्भातून सप्ताहाचं सुंदर अंदाजपत्रक आजच्या रविवारी घोषित होईल. वास्तुविषयक व्यवहारातल्या अडचणी जातील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रचिंतेतून मुक्तता मिळेल. सप्ताहातील रवी-शनी-बुध त्रिग्रहयोग नोकरीतील राजकारणातून त्रास देऊ शकतो. बाकी सप्ताहाचा शेवट मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या भाग्योदयाचा. स्त्री मुळे लाभ.

संशयास्पद व्यवहार टाळा

मिथुन : सप्ताह ग्रहयोगांतून संमिश्र स्वरूपाची फळं देऊ शकतो. घरात वृद्धांशी भांडणं नकोतच. व्यावसायिक संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. बाकी आजचा रविवार विवाहविषयक हालचालींचा. ता. २९ आणि १ हे दिवस आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना झगमगाटी ठरतील. कलाकारांचा भाग्योदय. नोकरीत सुवार्ता. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. व्यावसायिक वसुली होईल.

आरोग्यविषयक पथ्यं पाळावीत

कर्क : सप्ताह रवी-शनी-बुध त्रिग्रहयोगाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पाळायला लावणारा. शेजारीपाजारी सांभाळा. गैरसमज नकोत. आश्लेषा नक्षत्राच्या व्‍यक्तींनी आरोग्यविषयक पथ्यं पाळावीत. व्यसनं सांभाळा. बाकी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विशिष्ट मानसन्मानाचा. गुरुवार घरात आनंदोत्सवाचा. मुलाबाळांचा भाग्योदय. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट नवस फेडतील.

व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून लाभ

सिंह : सप्ताहातील ग्रहमान खूपच परस्परविरोधी राहील. वादग्रस्त मुद्द्यांमध्ये डोकावू नका. वैवाहिक जीवनातील आचारसंहिता पाळा. बाकी आजचा रविवार वैयक्तिक उपक्रमांतून उत्तम. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. मुलाबाळांच्या सुवार्तांची पार्श्वभूमी. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ नोकरीतील चिंता घालवणारा. ता. १ चा शुक्रवार एकूणच आपल्या राशीस सुसंवादी. सरकारी कामं होतील.

मौल्यवान वस्तू सांभाळा

कन्या : सप्ताहातील ग्रहमान नैसर्गिक पाठबळ कमी देईल. शिस्तबद्ध राहा. सरकारी नियम पाळा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात संसर्गजन्य आरोग्यविषयक त्रास संभवतो. प्रवासात सांभाळा. अपरिचित व्यक्तींशी व्यवहार करताना जपून. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक छंद वा उपक्रमांतून यश देईल. मात्र मौल्यवान वस्तू सांभाळा. शुक्रवार व्यावसायिक वसुलीचा.

न्यायालयीन कामांना गती

तूळ : सप्ताहातील ग्रहमान व्यावसायिक पार्श्वभूमीवर चांगलेच राहील. बँकांची किंवा विशिष्ट कोर्टविषयक कामांना गती येईल. आजचा रविवार व्यावसायिक तेजीचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. ता. १ चा शुक्रवार भरगच्च कार्यक्रमांचा. सप्ताहात चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवन सांभाळावं. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारण किंवा गावगुंडांपासून सांभाळावे.

मानसिक अस्वस्थता राहील

वृश्चिक : सप्ताहातील रवी-शनी-बुध या त्रिग्रहयोगाचं फिल्ड घरचं व बाहेरचं मानसिक पर्यावरण बिघडवेल. नोकरीतील राजकारणापासून जपा. बाकी कलाकारांना किंवा बुद्धिजिवी मंडळींना सप्ताहाचा शेवट ऊर्जा देणारा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट पर्यटनातून आनंद देईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शेवटी अन्नपाण्यातील संसर्गाचा धोका. प्रवासात सांभाळा. वेंधळेपणा टाळा.

आर्थिक कोंडी जाईल

धनु : सप्ताहात इतर कुयोगांच्या पार्श्वभूमीवर शुभ ग्रहांचा आंतरप्रवाह राहीलच. आजचा रविवार याचीच प्रचिती देईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक भांडवलपुरवठा होईल. सरकारी माध्यमातून विशिष्ट लाभ. वादग्रस्त पार्श्वभूमीवर सुसंवाद होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी जाईल. एखाद्या शारीरिक वेदनेवर उतारा पडेल. औषध लागू पडेल.

मुलाबाळांच्या चिंता संपतील

मकर : सप्ताहात सट्टेबाजी टाळा. खरेदी-विक्रीतून संमोहन टाळा. बाकी सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहाच्या शेवटी मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ घरातील मुलाबाळांच्या चिंता घालवेल. ता. १ मार्चचा शुक्रवार नोकरीत जल्लोषाचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानाचे योग. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धार्मिक कार्यातून प्रचिती.

थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ

कुंभ : राशीतील रवी-शनी-बुधाचा त्रिग्रहयोग सप्ताहावर पूर्णपणानं अंमल करेल. आरोग्यविषयक पथ्यं पाळाच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींवर नोकरीतील ताण असह्य होईल. सार्वजनिक जीवनातील हितशत्रू पीडा सतावू शकते. बाकी सप्ताहात गुरुवार व शुक्रवार हे दिवस विशिष्ट संकटाचं निवारण करतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात थोरामोठ्यांच्या ओळखीतून नोकरीचा लाभ.

परिस्थितीचं भान ठेवा

मीन : सप्ताहातील रवी-शनी-बुध त्रिग्रहयोगाची पार्श्वभूमी नैसर्गिक पाठबळ देणार नाही. परिस्थितीचं भान ठेवून वागा. प्रत्येक गोष्टीचं शिस्तबद्ध नियोजन करा. बाकी सप्ताह व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनातून साथ देणारा. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात घरातील वृद्धांची चिंता राहील. बाकी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट कोर्टप्रकरणातून मुक्तता मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com