साप्ताहिक राशिभविष्य : (२६ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२५)
स्पर्धात्मक पातळीवर यश
मेष : बुद्धिजीवी मंडळींना अतिशय प्रेरक ग्रहमान राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश प्राप्त होईल. सरकार दरबारी वजन वाढेल. उद्याचा सोमवार मोठ्या सुवार्तांतून फ्लॅश न्यूज मध्ये आणणारा. एकूणच बुधवारची अमावस्या भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट हृद्य क्षणांतून रोजनिशीत नोंद करेल. ता. २९ व ३० हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकन मिळेल. शनिवारची श्रीगणेश जयंती मोठे भाग्यसंकेत देणारी.
वरिष्ठाची मर्जी राहील
वृषभ : सप्ताहात रवी-गुरु शुभयोगांतून पूर्वसुकृत फळाला येईल. तरुणांचे भाग्य उजळेल. सप्ताहातील अमावस्या रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्र लोकांतून कनेक्टिव्हिटी साधून देईल. सप्ताहाचा शेवट श्रीगणेश कृपेचाच राहील. विशिष्ट नवस फेडाल. ग्रासलेली पुत्रचिंता जाईल. नोकरीतील हितशत्रू पीडा जाईल. वरिष्ठांचा कृपाशीर्वाद लाभेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पातळीवरील वादग्रस्त वसुलींतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात चैन-करमणुकीतून साजरी होणारी. ता. ३० चा गुरुवार महत्त्वाच्या गाठीभेटींचा.
नोकरीच्या उत्तम संधी येतील
मिथुन : सप्ताह संसर्गजन्य बाधेपासून सांभाळण्याचाच. अनोळखी व्यक्तींशी क्रिया-प्रतिक्रिया जपा. बाकी सप्ताहाचा शेवट श्रीगणेशांच्या कृपेतून चकित करणारा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुलींतून लाभ. मात्र अमावस्येजवळ घरातील मौल्यवान वस्तू सांभाळा. काहींचे वस्तू हरवण्यातून गोंधळ शक्य. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मित्रसंगतीतून विचित्र अनुभव येऊ शकतात. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात नोकरीच्या उत्तम संधी देणारी. मात्र अमावस्येजवळ वाहने सांभाळा.
घरात मंगलकार्य ठरतील
कर्क : सप्ताह रवी-गुरु शुभयोगातून उत्तम परिणाम करणारा. त्यामुळेच अमावस्येचे प्रभावक्षेत्र संमिश्ररीत्या बोलेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील घुसमट जाईल. होतकरू तरुणांना ओळखी-मध्यस्थींतून उत्तम नोकरीचा लाभ होईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट घरात मंगलकार्ये ठरवेल. भावाबहिणींचे भाग्योदय होतील. बाकी आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात कामगारांशी वाद टाळावेत आणि शेअर बाजारात जपून उलाढाली कराव्यात. श्वानदंशापासून सांभाळावे.
व्यवसायात भांडवल मिळेल
सिंह : रवी-गुरु शुभयोगाची पार्श्वभूमी न्यायालयातील प्रकरणात यश देणारी. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तमच राहील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक भांडवलपुरवठा होईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार शैक्षणिक प्रश्न सोडवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखींतून विवाहस्थळे येतील. श्रीगणेश जयंती भाग्यसंकेत देणारी. पती वा पत्नीचा भाग्योदय हा सप्ताहात एक विषय ठरेल आणि मोठी मौजमजा कराल. मात्र सप्ताहात त्वचाविकारांपासून काळजी घ्या.
घाईगर्दीचा प्रवास टाळावा
कन्या : अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात वक्री मंगळाचा अंडरकरंट राहीलच. नोकरीत क्रिया-प्रतिक्रिया जपा. ता. २९ ची अमावस्या संमिश्र स्वरूपाची फळे देईल. वस्तूंची हरवाहरवी सांभाळा. घरातील द्वाड लहान मुलांकडे लक्ष द्या. बाकी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी जास्त सांभाळावे. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती रवी-गुरु शुभयोगाची कनेक्टिव्हिटी उत्तम साधून घेतील. ता. ३० चा गुरुवार विवाहविषयक घडामोडी करणारा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात रोख पैसे सांभाळावेत. घाईगर्दीचा प्रवास टाळावा.
सरकारी कामांमध्ये यश लाभेल
तूळ : सप्ताहातील अमावस्येचे प्रभावक्षेत्र संमिश्ररीत्याच बोलेल. सार्वजनिक वादात पडू नका. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी तिन्हीसांजा सांभाळाव्यात. कोठे धडपडू नये. घरात विद्युत उपकरणे जपा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमप्रदोष दैवी चमत्काराचा. पुत्रचिंता जाईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सरकारी कामातून यश मिळेल. मात्र सप्ताहाचा शेवट प्रवासात काळजी घेण्याचाच. आरोग्यविषयक पथ्ये पाळा. नोकरीतील स्त्रीवर्गाशी जपून वागा. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळेल
वृश्चिक : सप्ताहातील रवी-गुरु शुभयोगाच्या पार्श्वभूमीवर अमावस्येच्या आणि वक्री मंगळाच्या प्रदूषणापासून सुरक्षित राहणारी सप्ताहातील ही रास. मात्र ज्येष्ठ नक्षत्राच्या व्यक्तींनी जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर जपावे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर सप्ताह उत्तम साथ देणारा. होतकरू तरुणांना परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची ग्रासलेली शैक्षणिक चिंता जाईल. ता. ३० चा गुरुवार आपल्या राशीस एकूणच जल्लोषाचा राहील. राजकीय व्यक्तींकडून लाभ. वादग्रस्त येणे येईल.
संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेत
धनु : वक्री मंगळाच्या पार्श्वभूमीवरील अमावस्या विचित्र खर्चाची ठरू शकते. काहींना देण्याघेण्याच्या व्यवहारांतून त्रास होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेच. बाकी सप्ताहाचा शेवट घरातील प्रिय व्यक्तींच्या चिंता घालवेलच. ता. ३० ते १ फेब्रुवारी हे दिवस पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांतून मोठे सुसंगत राहतील. मूळ नक्षत्रास श्रीगणेश जयंती नोकरीत शुभशकुनीची ठरेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या नवपरिणितांनी अमावस्येजवळ जिभेवर नियंत्रण ठेवावे.
कलांचा आविष्कार चांगला होईल
मकर : रवी-गुरु शुभयोगाचा प्रभाव सप्ताहावर जबरदस्त राहील. शिवाय शुक्रकलांचा आविष्कार चांगलाच राहील. सप्ताहात श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती दैवीगुणसंपन्न होणार आहेत. सप्ताहातील अमावस्या नक्षत्र लोकांशी संपर्क घडवेल. न बोलता कामे होतील. मात्र धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी अंगमस्ती टाळावी. अमावस्येजवळ स्त्रीवर्गाशी निष्कारण वाद होऊ शकतात. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या प्रसिद्धी देणारी. नोकरीत प्रशंसा पात्र व्हाल. परदेशी संधी प्राप्त होतील. प्रेमिकांचे उत्तम संवाद राहतील.
अकल्पित धनलाभ होईल
कुंभ : सप्ताहातील ता. २९ च्या अमावस्येची पार्श्वभूमी संमिश्र स्वरूपात फलदायी होऊ शकते. वेदनायुक्त व्याधींतून जागरणाचे प्रसंग येऊ शकतात. काहींना विशिष्ट नुकसानीचे भय सतावू शकते. बाकी पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार धनचिंता घालवेल. बाकी ता. ३० ते १ फेब्रुवारी हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच प्रसन्न ठेवतील. संतसज्जनांच्या गाठीभेटी होतील. अमावस्येजवळ एखादे तीर्थाटन होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारच्या श्रीगणेश जयंतीजवळ अकल्पित धनलाभ होतील.
मोठ्या व्यक्तीचे सहकार्य लाभेल
मीन : अमावस्येजवळ होणारा रवी-गुरु शुभयोग नक्षत्र लोकांतून लाभ देणारा. अर्थातच दैवी प्रचिती देणारा. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत विशिष्ट पदाचा लाभ होईल. पती वा पत्नीचा भाग्योदयही श्रीगणेशजन्म साजरा करेल. होतकरू तरुणांना हा सप्ताह मोठा पर्वणीचा ठरणार आहे. जीवनात एखादा गॉडफादर भेटेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहातील अडसर दूर होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात वैयक्तिक कला वा छंद माध्यमातून वाव मिळेल. मात्र अमावस्येजवळ शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर क्रिया-प्रतिक्रिया यापासून जपा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.