साप्ताहिक राशिभविष्य : ( २७ एप्रिल २०२५ ते ०३ मे २०२५)
आर्थिक ओघ कायम राहील
मेष : अमावस्येच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी विशिष्ट आचारसंहिता पाळतच अनुसरावा. बाकी व्यावसायिक पार्श्वभूमीवर स्वतंत्र उद्योजकांना सप्ताह आर्थिक ओघ अबाधित ठेवणारा. ता. २९ ते १ हे दिवस घरी आणि दारी सुवार्तांचा भर ठेवतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील अक्षय्य तृतीया विशिष्ट विजयोत्सव साजरा करणारी ठरेल. तरुणांना सप्ताह शिक्षण, विवाह आणि नोकरी या त्रिघटकांतून मोठ्या संधी देणाराच असेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थयात्रा करण्याचा योग आहे. विशिष्ट स्वरूपाच्या दैवी प्रचितीचा अऩुभव येईल.
वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील
वृषभ : अक्षय्य तृतीयेचा सप्ताह शुभग्रहांची स्पंदने खेचूनच देईल. सप्ताह रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पर्वणीच ठरेल. शैक्षणिक क्षेत्रातल्या विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक मोठा भांडवल पुरवठा होईल. सरकारी कार्यालये फलदायी ठरतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा आनंद देणारा ठरेल. नोकरीतील एखादे संकट टळेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह तारुण्यातील उमेद वाढवणारा ठरेल. या सप्ताहात मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य राहील. कर्जमंजुरीतून वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील.
मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
मिथुन : एक प्रकारच्या ऐतिहासिक स्वरूपाचे ग्रहमान राहील. सकारात्मक आणि श्रद्धेने वाटचाल करत राहा. दैवतांच्या सहकार्याची प्रचिती येईलच. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल. नोकरी-व्यावसायिक कोंडीतून मुक्त व्हाल. घरातील होतकरू तरुणांचे मोठे भाग्योदय होतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांचा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठे भाग्यसंकेत मिळतील. वैवाहिक जीवनात एखादा विजयोत्सव साजरा कराल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. उष्माघातापासून अगदी काळजी घ्याच.
अक्षय्य तृतीया संस्मरणीय ठरेल
कर्क : सप्ताहारंभाची अमावस्येची पार्श्वभूमी वादग्रस्त बाबींतून उपद्रवमूल्य असणारी आहे. सार्वजनिक बाबींतून त्रासदायक ठरेल. बाकी सप्ताहात ता. २९ व ३० हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटींतून फलदायी होणारे आहेत. प्रवासातील कामे होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ व २ हे दिवस अकल्पित लाभांचे ठरणार आहेत. आदरसत्कारांमधून चकित व्हाल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ मे चा शनिवार मोठी नावीन्यपूर्ण फळे देईल. शत्रुत्वाच्या झळा कमी होतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० ची अक्षय्य तृतीया भाग्योदयातून कायमची लक्षात राहील.
नोकरीतला विरोध मावळेल
सिंह : अमावस्येचे प्रभावक्षेत्र सप्ताहारंभी प्रवासात जपण्याचे. वृद्धांनी दुखापती सांभाळाव्यात. बाकी ता. २९ ते १ हे दिवस एकूणच आपल्या राशीस व्यावसायिक उपक्रमांतून उत्तम प्रतिसाद मिळणारे आहेत. अक्षय्य तृतीया पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचे नैराश्य घालवेल. सरकारी माध्यमातून लाभ होतील. ता. १ व २ हे दिवस सुवार्तांतून तुम्हाला सतत फ्लॅशन्यूजमध्ये ठेवतील. नोकरीतील विरोध मावळेल. तुमच्या कामांमुळे वरिष्ठांच्या मर्जीत तुम्ही कायम राहाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचे विशिष्ट स्पर्धात्मक यश थक्क करणारे असेल. कॅम्पसमधून नोकरी लागण्याची शक्यता आहे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात सतत प्रिय व्यक्तींची भेट होईल तसेच सतत मनासारखी कामे होतील.
मानाचा पुरस्कार मिळेल
कन्या : अक्षय्य तृतीयेच्या सप्ताहात ग्रहांचे फिल्ड अत्यंत अनुकूल असेल. तरुणांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. व्यावसायिकांनी शिस्तबद्धरीतीने पावले टाकावीत व अनुकूल वातावरणाचा लाभ उठवावा. उत्तरा नक्षत्राच्या उमलत्या तरुणाईला मोठा वाव देणारा सप्ताह आहे, मात्र सुरुवातीचे अमावस्येचे प्रभावक्षेत्र सहली-करमणुकीत जपण्याचे, काळजी घेण्याचे आहे. बाकी ता. ३० ते २ हे दिवस नोकरी-व्यावसायिक पातळीवर भाग्याचे क्षण अनुभवतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच हृद्य प्रसंगातून नेईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा मानाचा पुरस्कार मिळेल.
आरोग्याची काळजी घ्यावी
तूळ : अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा सप्ताह विचित्र असून तुमचा बेरंग करू शकतो. सहवासातील प्रिय व्यक्तींची मने जपा. नोकरीत क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना भाजण्या-कापण्याचे प्रसंग अस्वस्थ करतील. सप्ताहात एकूणच स्त्री-वर्गाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. गर्भवतींनी दक्षता घेण्याची गरज आहे. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक प्राप्तींतून अत्यंत चांगला असा राहील. घरातील तरुणांची कार्ये ठरतील. अक्षय्य तृतीया एकूणच प्रसन्न राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार चैन-करमणूक करणारा असेल. शनिवार प्रेमिकांच्या गाठीभेटींचा ठरेल.
कामगारांशी वाद टाळावेत
वृश्चिक : अक्षय्य तृतीयेचा सप्ताह शुभग्रहांच्या मंत्रालयांतून लाभ देईलच. घरात उत्तम भावनिक स्पंदने राहतील. नवपरिणितांना हा सप्ताह पर्वणीसारखाच असेल. विशिष्ट नवस फेडाल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक क्षेत्रात लॉटरी लागल्यासारख्या संधी येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात सार्वजनिक जीवन सांभाळावे, यंत्र विद्युत किंवा वाफ इत्यादींतून सांभाळावे. कामगारांशी वाद नकोतच. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचा दिवस एक उत्तम मुहूर्त राहील. मोठी कामे सुरू होतील. या कालखंडात विवाहेच्छूंनी गाठीभेटी कराव्याच.
गुरुकृपेची अनुभूती येईल
धनु : सप्ताहात शुभग्रहाच्या प्रभावाने गुप्त रसद पुरविली जाईल. सप्ताहातील ता. १ ते ३ हे दिवस मोठी अजब फळे देणारे असतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुकृपेची प्रचिती येईल. साधनेला दृढ चालवावेच. सप्ताहात पूर्वाषाढा नक्षत्राला विशिष्ट अनुभूती येतील. नवपरिणितांच्या चिंता जातील. नोकरीतील घटना प्रसन्न ठेवतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या चैनी-करमणुकीचा राहील. घरात कोणाचा विवाह ठरवाल. आजच्या अमावस्येजवळ काहींना जागरणाचे प्रसंग येतील. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्या.
नवीन जीवनदृष्टी देणारा काल
मकर : सप्ताहात शुभग्रहांची मंत्रालये अतिशय अनुकूल राहतील. सप्ताहातील अक्षय्य तृतीया एक नवीन जीवनदृष्टी देईल. चांगली माणसे जीवनात येतील. सप्ताहात विवाहेच्छूंसाठी निश्चितच अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा फिल्मी राहील. मात्र सप्ताहातील आजचे अमावस्येचे प्रभावक्षेत्र प्रवासात जपण्याचे आहे. श्रवण नक्षत्रास अक्षय्य तृतीया ऐश्वर्यसंपन्न करणारी. नोकरी-व्यावसायिक शुभारंभ होतील. उत्तराषाढा नक्षत्रास बलवत्तर विवाहयोग. शनिवार गाठीभेटींतून चमत्कार घडविणारा.
व्यावसायिकांची ध्येयपूर्ती होईल
कुंभ : सप्ताहातील शुभग्रहांची व्यूहरचना छानच राहील. सप्ताहाचा शेवट मोठा गोड राहील. फक्त सप्ताहाच्या सुरुवातीच्या अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात वृद्धांनी दुखापती सांभाळाव्यात. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहने चालवताना काळजी घ्यावी. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीया हा एक मोठा शुभमुहूर्त राहील. एकूणच ता. ३० ते २ हे दिवस उत्तम संगतीचे असे राहतील. स्वतंत्र व्यावसायिकांची ध्येयपूर्ती होईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील सुवार्तांतून धन्य करणाराच सप्ताह आहे. वास्तुयोग आहेतच.
वादग्रस्त येणे वसूल होईल
मीन : सप्ताहाचा कल शुभग्रहांच्या माध्यमातून आविष्कारित होईल. अक्षय्य तृतीयेचा सप्ताह तरुणांना पर्वणीसारखाच. शिक्षण, नोकरी आणि विवाह माध्यमांतून संधी देणाराच. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीया मोठे भाग्यसंकेत देईल. पती वा पत्नीचा भाग्योदय होईल. विवाहेच्छूंना अनुरूप विवाहस्थळे येतील. सप्ताहात विशिष्ट वादग्रस्त येणे येईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात अक्षय्य तृतीयेच्या प्रभावात विशिष्ट व्यावसायिक ध्येय साध्य होईल. विशिष्ट राजकीय मदत मोठा दिलासा देईल. शत्रुत्व शमेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.