Read weekly Rashi bhavishya in marathi langauge | weekly Horoscope - 30th October 2022 to 5th november 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२)

विवाहाचा बलवत्तर योग

मेष : सप्ताहारंभ शुभ ग्रहांच्या माध्यमातून राहिलेली दिवाळी भेट देणारा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर वधारेल. विवाहासाठी अँटिने सज्ज ठेवा. ता. ३ चा गुरुवार गुरुकृपेचा. नोकरीच्या मुलाखतींतून प्रभाव टाकाल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात बलवत्तर विवाहयोग. मात्र नोकरीत वरिष्ठ सांभाळा.

छान व्यावसायिक प्राप्ती

वृषभ : सप्ताहात खरेदी-विक्रीत सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रलोभनांपासून स्वतःला जपावी. बाकी गुरुवारी वैयक्तिक मोठ्या सुवार्ता मिळतील. विशिष्ट गुप्तचिंता जाईल. रोहिणी नक्षत्रास सप्ताहाचा शेवट छान व्यावसायिक प्राप्तीचा. मृग नक्षत्रास सप्ताहारंभी अपचनादी विकार. आहार सांभाळा.

नोकरीत छाप पाडाल

मिथुन : तरुणांना मोठा मजेदार सप्ताह राहील. प्रेमिकांचा चाँद उगवेल. आर्द्रा व्यक्तींचे जीवन फुलेल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत छाप पाडतील. येत्या गुरुवारी महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. पुनर्वसू नक्षत्रास ता. १ व २ हे दिवस खरेदीत फसण्याचे.

कलाकारांचा भाग्योदय

कर्क : सप्ताह घरातील प्रिय व्यक्तींच्या सुवार्ता देणारा. सप्ताहाचा शेवट विजयी चौकार-षटकारांचा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार प्रवासात दगदगीचा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या यश प्रसिद्धीचा. कलाकारांचे भाग्योदय. मात्र प्रेमिकांनी गैरसमज टाळावेत.

परदेशगमनाचा योग

सिंह : सप्ताह बुध-शुक्रांच्या विशिष्ट ग्रहयोगांतून चंद्रकलांचा उत्कर्ष करणारा. त्याचा लाभ तरुणांनी अवश्य घ्यावा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटींतून सूर गवसून देणारा सप्ताह. ता. ३ चा गुरुवार मोठे चमत्कार घडवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट स्पर्धात्मक यश. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन. कोर्टप्रकरणातून सुटका.

गुंतवणुकीतून लाभ

कन्या : सप्ताह चंद्रकलांच्या उत्कर्षाचाच. सप्ताहातील बुध-शुक्राची खेळी ऐनवेळी धावा काढून देतील. व्यावसायिकांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अतिशय खूष ठेवेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ चा दिवस वैयक्तिक सुवार्ताचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती उंची खरेदी करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकींतून लाभ.

वैवाहिक जीवनात रम्य काळ

तूळ : सप्ताहात चंद्रकलांचा उत्कर्षच राहील. अर्थातच या कलांची साथ घेत बुध-शुक्र हे प्रेमवीर धमाल उडवतील. अर्थातच तरुणांसाठी त्यांचे एक पॅकेज राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना छान नोकरी मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गोपाष्टमी वैवाहिक जीवनातून भावरम्य. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल.

उतावीळपणा टाळावा

वृश्चिक : सप्ताहात कोठेही उतावीळ होऊ नका. बाकी सप्ताहातील चंद्रकला सहली-करमणुकींतून आनंद देतील. नोकरीतील रजा सत्कारणी लागेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हवा-पाण्यातून होणारा संसर्ग टाळावा. कुसंगत नको. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना भाऊबंदकीचा त्रास.

शुभग्रहांची लॉबी कार्यरत

धनू : चंद्रकलांतून शुभ ग्रहांना ताकद मिळेल. अर्थातच त्यांची लॉबी कार्यरत राहील. सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना प्रचंड नैसर्गिक साथ देईल. सतत ग्रीन सिग्नल मिळतील. ता. ३ चा गुरुवार मोठ्या सुवार्तांचा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक लाभ. उत्सव-समारंभ थाटात पार पडतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना आत्मसाक्षात्कार.

स्पर्धात्‍मक यश मिळेल

मकर : सप्ताहातील चंद्रकलांची सप्तपदी तरुणांना छानच प्रसन्न ठेवेल. नवपरिणितांची मोठी मौजमजा होईल. नोकरीतील घडामोडींतून उत्साही राहाल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना वाट मोकळी मिळेल. ता. १ आणि ३ हे दिवस अतिशय सुरात राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट खरेदी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचे स्पर्धात्मक यश फ्लॅशन्यूज देईल.

संतसंगतीचा मोठा लाभ

कुंभ : सप्ताहातील चंद्रकला मोठ्या जीवनसत्त्वांचा पुरवठा करणार आहेत. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड फॉर्ममध्ये येईल. एकूणच सप्ताहाची सांगता विशिष्ट उत्सव-समारंभात साजरी होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना संतसंगतीचा लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे शुक्र-हर्षल योगातून सीमापार चौकार-षटकार. और क्या!

धनलाभाची परंपरा कायम

मीन : सप्ताहातील व्यावसायिक अचानक धनलाभांची परंपरा राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मस्तच. तरुणांना उत्तम विवाहस्थळे येतील. ओळखींतून स्थळं येतील. सध्या गुरुकृपेचे पर्व चालू आहे. ज्योतिषी आड आणू नका. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात शांत राहावे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सन्मानाचा.