Read weekly Rashi bhavishya in marathi langauge | weekly Horoscope - 31sh July 2022 to 6th August 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२२)

परदेशी नोकरीची शक्यता

मेष : ग्रहांचं फिल बॅटिंगचं नाहीच, नोकरी सांभाळा. गृहिणींनी घरात भाजण्या-कापण्याचे प्रसंग सांभाळावेत, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य होऊ शकतात. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात पुत्रोत्कर्षातून धन्यता. मात्र सप्ताहात पित्तप्रकोप होईल. प्रवासात काळजी घ्या. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीची शक्यता.

कलागुणांना प्रसिद्धी मिळेल

वृषभ : अतिशय संमिश्र स्वरूपाची फळं देणारा सप्ताह. वृद्धांनी जपलं पाहिजे. घरातील तरुणांशी वाद नकोत. बाकी रोहिणी नक्षत्राच्या तरुणांना सप्ताह रवी-गुरू शुभयोगाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यातील कलागुणांना प्रसिद्धी देणारा. ता. २ ते ३ हे दिवस जल्लोषाचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात कायदेशीर गोष्टी जपाव्यात. स्त्रीहट्ट पुरवा.

पगारवाढ होईल

मिथुन : सप्ताहात आपणास मोठी आचारसंहिता पाळावी लागणार आहे. घरी वा दारी संशयास्पद आविर्भाव टाळा. व्यावसायिकांनी जुगार टाळावा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी भावनोद्रेक टाळावा. सप्ताहाचा शेवट वादविवादाचा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-गुरू शुभयोगाचं पॅकेज रन होईल. अभिनंदनाचे सतत प्रसंग. पगारवाढ होईल. बुधवारची संध्याकाळ छानच.

वसुलीतून लाभ मिळेल

कर्क : सप्ताहात रवी-गुरू शुभयोगाचं पॅकेज उत्तम साथ देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती चांगल्याच फ्लॅशन्यूज देतील. ता. १ ते ३ हे दिवस व्यावसायिकांना छान साथ देतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट फसवणुकीचा.

व्यवसायात चांगली प्राप्ती

सिंह : सप्ताहात एक प्रकारचं गृहयुद्धच होणार आहे. शनी-मंगळ-हर्षल यांचा सत्तासंघर्ष गाजणार आहे, त्याच्या झळा बसणार आहेत. म्हणूनच परिस्थितीशी नमतं घ्या, आहे ते जपा. सप्ताहात पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक छान प्राप्ती होईल. मात्र, राजकारण्यांचा संपर्क टाळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रुत्वाच्या झळा. नोकरदारांना उत्तम कालखंड.

नवतारुण्य गवसेल, महत्त्वाकांक्षांची पूर्तता

कन्या : नोकरदार मंडळींना उत्तम सप्ताह. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. ता. २ ते ४ हे दिवस सुवार्तांचे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नवतारुण्य गवसेल. वैवाहिक जीवनात आनंदोत्सव. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट उत्सव, समारंभातून बेरंगाचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात फसवणुकीपासून सावध राहावे.

प्रामाणिकपणाची कास सोडू नका

तूळ : हा सप्ताह ग्रहांचा सत्तासंघर्ष सुरू करणारा आहे. आपली रास सतत सीसी कॅमेऱ्याखालीच राहणार आहे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य बनतील. सावध रहा एवढंच. बाकी शुभग्रहांची साथ नोकरदारांना मिळत राहील. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणेच व्यवहार करावेत. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ ते ४ हे दिवस लाभसंपन्न ठेवतील. नोकरीत उत्तम घडामोडी.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल

वृश्‍चिक : ग्रहयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर शनी-गुरू शुभयोगाचं पॅकेज उत्तम क्रियाशील राहील. नोकरीत अद्वितीय संधी येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती चांगल्या फ्लॅशन्यूजमध्ये येतील. ता. २ ते ४ हे दिवस अतिशय छान आणि सुसंगत राहतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून जपावं.

नोकरीत प्रसन्न काळ

धनू : सप्ताह उत्तराषाढा नक्षत्रास ग्रहयुद्धातून पीडणारा. काहींना शत्रुत्वाच्या झळा. मात्र, शुक्रभ्रमणाच्या सुगंधित झुळका श्रावणमासाची भावभक्तीची परंपरा उत्तम राखतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती भावभक्तीत न्हाऊन निघतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील.

पतप्रतिष्ठा मिळेल

मकर : मंगळ-हर्षल योगातून ग्रहयुद्ध पेटवणारा सप्ताह. अतिरेकी बनवणारं ग्रहमान. सावध. बाकी रवी-गुरू शुभयोग अंडरकरंट स्वतंत्र व्यावसायिकांना छानच बोलेल. श्रवण नक्षत्रास पतप्रतिष्ठा मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी आपलं सार्वजनिक जीवन जपावंच. राजकारणात पडू नका. स्त्रीहट्ट पुरवा.

बलवत्तर विवाहयोग

कुंभ : सप्ताहातील ग्रहयुद्धातही सुरक्षित राहाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांची यंत्रणा साथ देईल. पुत्रचिंता जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रव्यक्तींना बलवत्तर विवाहयोग. घनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मध्यस्थीतून लाभ. शनिवारी प्रभातफेरी करताना सावधान.

संमिश्र स्वरूपाची फळं मिळतील

मीन : सप्ताहात फक्त कामापुरतंच बोला, बाकी मौन पाळा. सप्ताह नोकरदारांना छानच. काहींना ओळखी, मध्यस्थीतून उत्तम नोकरी. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती नवस फेडतील. रेवती नक्षत्रास सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळं देईल. आर्थिक मध्यस्थी टाळा. खरेदीत फसू नका. बाकी सप्ताहात घरात मंगलकार्यं ठरतील.