साप्ताहिक राशिभविष्य : (०४ मे २०२५ ते १० मे २०२५)
अडचणींवर मात कराल
मेष : सप्ताहात मंगळभ्रमणाची गतिमान अशी शुभ फळं मिळतील. व्यावसायिक अडचणींवर मात कराल. विशिष्ट अशा कायदेशीर कटकटींतून मुक्त व्हाल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती विरोध मावळेल. ता. ७ आणि ८ हे दिवस गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर भरणी आणि कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे कृतार्थ करतील. कर्जमुक्तीचा आनंद घ्याल. विशिष्ट स्वरूपाच्या ग्रासलेल्या चिंता जातील. मित्रसंगतीतून लाभ होतील. नोकरीसाठीच्या मुलाखती छान होतील.
शत्रूवर विजय मिळवाल
वृषभ : सप्ताह मोठी नावीन्यपूर्ण अशी शुभ फळे देणारच. हुकमी पद्धतीने तुमची कामे होतील. ता. ७ व ८ हे दिवस झगमगाट करणारे ठरतील. रोहिणी नक्षत्राच्या पती व पत्नीचा मोठा भाग्योदय होईल. दोघांच्या वाट्याला खूप चांगला कालखंड येईल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती शत्रूवर विजय मिळवतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या मानसन्मानातून चकित करेल. नोकरीत मानांकन मिळेल. ग्रासलेली पुत्रचिंता जाईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच व्यावसायिक दिशा देणारा ठरेल. पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल.
कलागुणांना वाव मिळेल
मिथुन : गुरुवारच्या एकादशीच्या प्रभावात शुभग्रहांची स्पंदनं खेचून घ्याल. सप्ताहात बुद्धिकौशल्यातून मोठे लाभ पदरात पाडून घ्याल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह विशिष्ट कलागुणांना वाव देईलच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक समारंभातून संस्मरणीय ठरेल. नोकरीतून परदेशात जाण्याच्या संधी येतील. प्रेमिकांची उत्तम स्पंदने राहतील. विवाहविषयक गाठीभेटी आवर्जून कराच. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मोठा कृतार्थ करणारा असेल. वास्तुस्वप्न साकार होईल.
वरिष्ठांवर छाप पाडाल
कर्क : सप्ताहात ग्रहांचे बॅटिंग फिल्ड राहील. सप्ताहात महत्त्वाच्या कामांचे आयोजन आणि नियोजन कराच. सप्ताहात नोकरीत वरिष्ठांवर छाप पाडाल. मनाजोगती कामे करवून घ्यालच. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीजन्य स्वरूपाचे मोठे असे लाभ होतील. वादग्रस्त स्वरूपाची व्यावसायिक वसुली करवून घेण्यात यश येईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात ग्रहांच्या बॅटिंग फिल्डचा पूर्ण लाभ घेतील. राजकीय व्यक्तींना वश करून घ्याल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या विजयोत्सवाचाच ठरेल.
नोकरीतील दुष्टपर्व संपेल
सिंह : सप्ताहातील गुरुवारच्या मोहिनी एकादशीची पार्श्वभूमी सप्ताहाच्या शेवटी अर्थातच ता. ७ व ८ हे दिवस धरून शेवटी शनिवारी उत्तम फलद्रूप होणारी अशी असेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धिकौशल्यातून मोठे लाभ होतील. अर्थातच गाठीभेटींतून छाप पाडून कामे करवून घ्याल. नोकरीतील एखादे दुष्टपर्व संपेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना व्याधींवर रामबाण उपाय गवसेल. नवपरिणितांना अपत्यलाभाचे संकेत मिळतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून धक्कादायक यश मिळेल. पती वा पत्नीवरचे संकट टळेल.
आर्थिक कोंडी दूर होईल
कन्या : सप्ताहात ता. ८ च्या मोहिनी एकादशीजवळ शुभग्रहांचा मोठे अनुकूल वातावरण असेल. घरातील पर्यावरण अतिशय प्रसन्न आणि पवित्र राहील. उद्याचा सोमवार प्रवासातील कामे यशस्वी करवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखीचा लाभ होईल. नोकरीतील हितशत्रुत्वावर मात कराल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच मोठी रसद पुरविणारा. व्यावसायिक आर्थिक कोंडी जाईल. घरात उंची वस्तूंची खरेदी होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी सूर्योदयी सुवार्तांतून धन्यता लाभेल. परदेशी जाण्यासाठी व्हिसा मंजूर मिळेल.
नोकरीच्या संधी मिळतील
तूळ : सप्ताहातील चंद्रबळाची स्पंदने अनुकूल राहतील. विशिष्ट वाद सामोपचारातून मिटतील. सप्ताहात पती वा पत्नीचा उत्कर्ष हा एक मोठा विषय राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. नोकरीतील बदलीचे सावट जाईल किंवा त्यातून मार्ग निघेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मोठ्या दैवी प्रचितीचा राहील. पुत्रचिंता जाईल. स्वाती नक्षत्रास सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विशिष्ट गुप्तचिंता घालवेल. बेरोजगारांना नोकरीच्या संधी. पती वा पत्नीची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल.
झंझावाती यशाचा कालखंड
वृश्चिक : सप्ताहात आरंभीपासून चंद्रबळाची सुंदर स्पंदने राहतील. मंगळभ्रमण त्याचा लाभ उठवेल आणि आपला प्रगतीचा आलेख उंचावेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय फॉर्ममध्ये येत, मोठे विजयी चौकार-षटकार मारतील. ता. ७ व ८ हे दिवस झंझावाती यश देणारे. सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती गुरुकृपेतून विवेकसंपन्न होत जीवनातील गुरुकृपेच्या पवित्र आवरणातून लाभ घेतील. एकूणच आपल्या राशीस सप्ताहातील ग्रहांचे पॅकेज ऐश्वर्य प्रदान करेल.
मध्यस्थी लाभदायक ठरेल
धनु : सप्ताहात एकूणच जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. सप्ताहात महत्त्वाचे मध्यस्थीचे व्यवहार क्लिक होऊन लाभ देतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचे घरगुती पर्यावरण अतिशय प्रसन्न राहील. नवपरिणितांना नवी उमेद येईल. पती व पत्नीचे अस्वास्थ्य जाईल. ता. ७ व ८ हे दिवस मोठे प्रसन्न राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम व्यावसायिक पर्याय उपलब्ध होतील. तरुणांना सप्ताहात कॅम्पसमधून नोकऱ्या मिळतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट शत्रुभय घालवेल. राजकीय व्यक्तीचा अनुग्रह होईल.
स्पर्धा परीक्षांमध्ये लक्षणीय यश
मकर : सप्ताहात मंगळभ्रमणातून प्रचंड ऊर्जा मिळणार आहे. विशिष्ट स्पर्धा परीक्षांतून मोठे मानांकन मिळणार आहे. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा झगमगाटी राहील. सप्ताहातील एकादशीला धरून ता. ८ व १० हे दिवस चढत्या क्रमाने प्रफुल्लित राहतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना वलयांकित करणारेच ग्रहमान आहे. नोकरीतील ध्येय साध्य होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी संधी प्राप्त होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा भाव वाढेल. अर्थातच जीवनाच्या शेअर मार्केटमध्ये! त्यामुळेच वैवाहिक जीवनही फुलेल.
खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठे लाभ
कुंभ : सप्ताहात ग्रहांचे फिल्ड विवेकी मंडळींना निश्चितच साथ देईल. ता. ६ ते ८ हे दिवस कडक उष्माघाताच्या सावलीतही शुभग्रहाच्या कृपेच्या सावलीचा लाभ देतील. सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तम साथ देणारे ग्रहमान राहील. बाकी सप्ताहात राजकीय हितशत्रूंशी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळूनच करा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारच्या एकादशीचे प्रभावक्षेत्र गुरुकृपेचीच सावली देणारी. पुत्रपौत्रांची चिंता जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचे वादग्रस्त येणे वसूल होईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मोठे अकल्पित लाभ होतील.
शाॅर्ट कट किंवा मोहापासून लांब राहावे
मीन : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट ग्रहांच्या विशिष्ट ऐतिहासिक स्थितीतून अजब असे लाभ देईल. तरुणांना पण साथ देणाराचा सप्ताह राहील. परंतु कोणतेही शॉर्ट कट किंवा मोहजाल यापासून लांब राहा. बाकी उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती दैवी गुणांनी संपन्न होत आहेत. जीवनातील श्रद्धा बळकट करणारेच असे ग्रहमान आहे. उद्याचा सोमवार शुभ ग्रहांची मोठी कनेक्टिव्हिटी ठेवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट घरातील सुवार्तांतून सद्गदित करणारा ठरेल. काहींचे मोठे व्यावसायिक उत्सव समारंभ होतील. सहकुटुंब मोठ्या सहली किंवा करमणुकीच्या कार्यक्रमांना जाण्याचे योग आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.