weekly horoscope 5th january 2025 to 11th january 2025
weekly horoscope 5th january 2025 to 11th january 2025Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : ०५ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५

माणसाचे एखाद्या गोष्टीला धरणे-पकडणे किंवा ते साठवून ठेवणे हे सतत चालूच असते.
Published on

वादग्रस्त वसुली होईल

मेष : सप्ताहाची सुरुवात आर्थिक व्यवहारांतून उत्तम फलदायी होईल. काहींची व्यावसायिक वादग्रस्त वसुली होईल. सरकारी माध्यमांतून कामे होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांची भ्रमणे उत्तम साथ देतील. बँकांकडून रसद पुरवली जाईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींवर ता. ८ च्या सूर्योदयी भाजण्या-कापण्याचे प्रसंग येऊ शकतात. बाकी ता. १० चा शुक्रवार तरुणांना मोठ्या जल्लोषाचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात वाहन वा यंत्रपीडा होण्याची शक्यता आहे.

परदेशात संधी मिळतील

वृषभ : सप्ताहाची सांगता मोठ्या यशातून होईल. सप्ताहातील पुत्रदा एकादशीचा प्रभाव उत्तम राहील. शुक्रभ्रमण ग्रहांच्या पटावर अतिशय स्वतंत्र अशी फळे देईल. फक्त ध्येयाकडे वाटचाल करा. सप्ताहात तरुणांना परदेशी संधी येतीलच. सप्ताहाची सुरुवात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक लाभ देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट प्रतीक्षा संपवेल. नोकरीत पगारवाढीची शक्यता. विशिष्ट व्यावसायिक कायदेशीर प्रश्न सुटतील.

खरेदी-विक्रीचा मोह टाळा

मिथुन : सप्ताहातील बुध आणि शुक्र यांची भ्रमणे विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ देतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती फायदा उठवतीलच. काहींना सरकारी माध्यमातून लाभ. काहींना परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात कोणत्याही स्वरूपाच्या खरेदी-विक्रीचा मोह टाळावा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट दैवी प्रचितीचा असेल. पुत्रचिंता जाईल. सप्ताहाची सुरुवात नोकरीतील घडामोडींतून प्रसन्न ठेवेल. नोकरीतून परदेशी जाण्याची संधी लाभेल

नेत्रविकारांचा त्रास शक्य

कर्क : सप्ताहातील ग्रहांचे फलंदाजीचे क्षेत्र नाहीच. आजचा रविवार हेच सांगेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी द्वाड मित्रसंगती टाळा. सप्ताहात काहींना नेत्रविकार उद्‍भवतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात नोकरीतील वरिष्ठ वर्गाला जपावे. क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्यात. या सप्ताहात नोकरीमध्ये बदलीचे सावट सतावेल. बाकी सप्ताहातील ता. ९ व १० हे एकादशीचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचे राहील. सार्वजनिक बाबींत पडू नका. व्यावसायिक वसुलींतून सप्ताहाचा शेवट प्रसन्न ठेवेल.

भागीदारीमधून भाग्योदय होईल

सिंह : सप्ताहात शुक्रभ्रमणाच्या कलांचा मोठा लाभ होईल. उत्सव-समारंभ गाजवाल. नोकरीतील मानांकन वाढेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ ते ११ हे दिवस प्रत्येक वनडे जिंकूनच देतील. महत्त्वाच्या कामाचा पाठपुरावा अवश्य करा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ संमिश्र स्वरूपाचा ठरेल. बुधवारी सूर्योदयी यंत्रे, वाहने जपून हाताळावीत. बाकी सप्ताह कलाकारांचे जीवन समृद्ध करणारा. सरकारी माध्यमातून सहकार्य मिळेल. नवपरिणितांना पुत्रलाभ होईल. काहींचा भागीदारीतून मोठा भाग्योदय होईल.

मानसन्मान होईल

कन्या : सप्ताहातील ग्रहमान मोहजाळात पाडणारे. देण्या-घेण्याचे व्यवहार जपून करा. काहींना संगणकीय बाबींतून दगाफटका बसू शकतो. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी संगणकीय व्यवहार जपून करावेत. ता. ८ व ९ हे दिवस फसगतीचे ठरण्याची शक्यता असून अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट मोठा गोड राहील. विशिष्ट मानसन्मानाचे प्रसंग थक्क करतील. चित्रा नक्षत्रास सप्ताहात अग्निभय आहे. सप्ताह गर्भवतींसाठी संवेदनशील आहे.

नोकरीची संधी येईल

तूळ : सप्ताहातील बुध आणि शुक्र यांची भ्रमणे सप्ताहारंभापासूनच जनसंपर्कातून उत्तम प्रभावी राहतील. तरुणांना नोकरीच्या संधी येतील. आजचा रविवार विशिष्ट भाग्यबीजे पेरेलच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींच्या बाबतीत चमत्कार घडतील. काहींना व्यावसायिक वसुलींतून लाभ. घरात पुत्रपौत्रांची कार्ये ठरतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ व १० जानेवारी हे दिवस अतिशय रंगतदार जातील. चैन-करमणुकीवर खर्च कराल. शनिवार ग्रासलेली गुप्तचिंता घालवणारा.

व्यावसायिक प्रतिष्ठा लाभेल

वृश्चिक : सप्ताहातील राशीच्या एक्स्चेंजमध्ये आपल्या राशीचा भाव वाढणार आहे. सतत बाहेरच्या जगात आगतस्वागत होईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट एकूणच जल्लोष साजरा करणारा. व्यावसायिक आवक छान राहील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचे कौटुंबिक भावजीवन सुवार्तांतून अतिशय प्रसन्न राहील. घरातील तरुणांचे विवाह ठरतील. सप्ताहातील पुत्रदा एकादशी सार्थकीच लागेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक प्रतिष्ठेचा लाभ. एखादा नैतिक विजय संपादन कराल.

कर्जप्रकरणे मार्गी लागतील

धनु : सप्ताहातील अष्टमी आणि एकादशीचा एक उत्तम प्रभाव राहील. थोरामोठ्यांच्या ओळखींतून मोठी कामे होतील. नोकरीतील वरिष्ठांचा कृपाशीर्वाद ऐनवेळी फलद्रूप होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील शुक्रभ्रमण व्यावसायिक उत्सव-प्रदर्शने यशस्वी करून देईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक वसुलींतून लाभ होईल. काहींची कर्जप्रकरणे मार्गी लागतील. सप्ताहात काहींना कामगार पीडा शक्य. प्रवासात पाकीट-पैशाची काळजी घ्या.

नैराश्‍य दूर होईल

मकर : सप्ताहात अष्टमी आणि एकादशी यांचे मुहूर्त साधत शुभग्रहांची लॉबी क्रियाशील राहील. विशिष्ट गुंतवणुकी होतील. घरातील तरुणांचे रेंगाळलेले विवाह जमतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींच्या महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी होतील. ता. १० व ११ हे दिवस राखूनच ठेवा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह व्यावसायिक तेजीचाच राहील. काहींना सरकारी माध्यमांतून लाभ होतील. एकूणच आपल्या राशीच्या तरुणांना सप्ताह नैराश्य घालवणाराच ठरेल. ओळखींतून नोकरीचा लाभ.

विदेश व्यापारामध्ये स्थिरता येईल

कुंभ : सप्ताहातील अष्टमी आणि एकादशी या तिथी ध्येयपूर्ती करून देणाऱ्याच ठरणार आहेत. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती दैवीगुणसंपन्न होतील. संकल्पसिद्धीचा लाभ होईल. नवपरिणितांचे भाग्योदय होतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरगुती पार्श्वभूमीवर आणि स्वतंत्र व्यावसायिकांना व्यवसायात निश्चितच स्वप्नपूर्तीचा राहील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी लाभ होतील. विदेशी व्यापारात स्थिरता येईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीतील हितशत्रू पीडा जपली पाहिजे.

सरकारी कामातून दिलासा मिळेल

मीन : सप्ताहातील वक्री ग्रहांची पार्श्वभूमी मोहजाळात अडकवू शकते. तरुणांनी प्रेमप्रकरणात गुंतून घेऊ नये. बाकी सप्ताहातील अष्टमी आणि एकादशीच्या प्रभावात शुभग्रहांची रसद मिळू शकते. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी विवेकनिष्ठ होऊन लाभ घ्यावा. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट आर्थिक पार्श्वभूमीवर दिलासाच देईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सरकारी कामांतून दिलासा देणारा. राजकीय मध्यस्थी उपयोगी पडेल. तरुणांना परदेशी नोकरी शक्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com