साप्ताहिक राशिभविष्य : ( ०६ एप्रिल २०२५ ते १२ एप्रिल २०२५)
वास्तूविषयक व्यवहारांतून दिलासा
मेष : श्रीराम नवमीचा आजचा रविवार घरगुती पार्श्वभूमीवर प्रसन्नच राहील. विशिष्ट बाबींचे शुभारंभ होतील. विशिष्ट मौल्यवान ऐवज खरेदी कराल. अश्विनी नक्षत्राच्या तरुणांच्या विवाहविषयक गाठीभेटी अंतिम टप्प्यात येतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक व्यवहारांतून दिलासा देणाराच सप्ताह. ता. १० चा गुरुवार घरात मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. हनुमान जयंतीचा शनिवार तुम्हाला ग्रासणारी गुप्तचिंता घालवेल. कृत्तिका नक्षत्राच्या खेळाडूंची विजयी वाटचाल होईल. मात्र प्रवासात मौल्यवान वस्तू जपा.
ओळखीतून लाभ होतील
वृषभ : सप्ताह चैनी-करमणुकींतून आनंद देणारा. वैवाहिक जीवनात पती वा पत्नीच्या अनपेक्षित भाग्योदयातून चकित व्हाल. एकूणच सप्ताहारंभ दैवी प्रचितीचाच. कृत्तिका नक्षत्राच्या तरुणांना उत्तम संधींचा फायदा घेता येईल. नोकरीतील विशिष्ट घडामोडी पथ्यावर पडतील. सप्ताहाचा शेवटही मोठ्या चौकार-षटकारांचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ व १० हे दिवस शिक्षण, नोकरी, विवाह या त्रिघटकांतून मार्गस्थ करतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र वैयक्तिक मानसन्मानातून थक्क करेल. नव्या ओळखींतून मोठा लाभ.
प्रामाणिक प्रयत्नांना यश
मिथुन : सप्ताहातील वक्री शुक्रभ्रमणाची पार्श्वभूमी शनीच्या युतियोगातून मोठी प्रभावी फळे देईल. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारा सप्ताह सर्व प्रकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देणारा. विशिष्ट कायदेशीर कटकटींतून मुक्त व्हाल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे अकल्पित लाभ होतील. ता. ९ ते १० हे दिवस मोठ्या आनंदोत्सवाचेच ठरतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमान जयंतीचा शनिवार घरात मोठ्या सुवार्ताचा ठरेल. घरातील तरुणांचे प्रश्न सुटतील.
अपयश धुवून निघेल
कर्क : सप्ताहात राशीत आगमन केलेला मंगळ भाग्यातील ग्रहांच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्वाला उजाळा देईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींचे अपयश धुवून निघेल. काहींच्या नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा गोड राहील. ता. १० चा गुरुवार पुष्य आणि आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तीस कोणत्याही शुभारंभास योग्यच राहील. यंदाची हनुमान जयंती एकूणच आपल्या राशीस मोठी भाग्यसूचक राहील. आपल्या ध्येयाकडे उत्तम वाटचाल कराल.
शत्रूंवर विजय मिळवाल
सिंह : सप्ताहातील ग्रहमान आणि ग्रहयोग चंद्रबळातून साथ देतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. पती वा पत्नीची विशिष्ट चिंता जाईल. शैक्षणिक नैराश्य जाईल. काहींना ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. प्रेमिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अर्थातच ता. १० ते १२ हे दिवस आत्यंतिक गतिमान राहतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा अवश्य करा. सरकारी माध्यमांतून उत्तम साथ मिळेल. व्यावसायिकांना लॉटरीसारखा फायदा होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती शत्रूवर विजय संपादन करतील.
यशाची परंपरा राखाल
कन्या : सप्ताहात मॅन ऑफ दि मॅच होणारच आहात. उड्डाण करण्याच्या तयारीत राहा. सप्ताहातील बुध-शुक्राची स्थिती आणि त्यांची शनीशी होणारी युती चंद्रकलांच्या स्पंदनातून मोठा झगमगाट करेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी रसद पुरवली जाईल. प्रेमळ माणसांचे सतत सहकार्य राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट यशाची परंपराच ठेवतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनातील मोठे प्युअर सीक्वेन्स लागतील. अर्थातच हुकमी यश मिळत राहील. चित्रा नक्षत्रच्या व्यक्तींना हनुमान जयंती विक्रम प्रस्थापित करणारी राहील. प्रेमिकांचे मनोमीलन होईल. व्यावसायिक मुहूर्तमेढ रोवली जाईल.
आर्थिक कोंडी दूर होईल
तूळ : सप्ताहात मंगळाशी होणारे ग्रहयोग चंद्रकलांच्या प्रभावात उत्तम बोलतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी दूर होईल. विशिष्ट वादग्रस्त येणे वसूल कराल. सरकारी माध्यमे साथ देतील. सप्ताहातील ता. ९ व १० हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची पती वा पत्नीविषयक चिंता जाईल. नोकरीतील शत्रुत्वाच्या झळा सौम्य होतील. विशिष्ट वास्तुविषयक प्रश्न मार्गी लागतील. आजची श्रीराम नवमी मोठी भाग्यलक्षणे दाखवेल. थोरामोठ्यांची आश्वासने मोठा धीर देतील. विशाखा नक्षत्रास शनिवार अन्नपाण्यातील संसर्गाचा ठरू शकतो.
भाऊबंदकीचे प्रश्न सुटतील
वृश्चिक : श्रीराम नवमीने सुरू होणारा सप्ताह हनुमान जयंतीकडे उत्तम वाटचाल करणारा. आजचा रविवार गाठीभेटींतून सार्थकी लावणारा. विवाहेच्छूंनी आपले अँटिने सज्ज ठेवावेत. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची एखादी खंत किंवा प्रतीक्षा निश्चितच संपेल. भाऊबंदकीचे प्रश्न सुटतील. अनुराधा नक्षत्राच्या नवपरिणितांना हा सप्ताह एकूणच छान भावस्पंदनांतून नांदवेल. ता. ९ ते ११ हे दिवस अनेक माध्यमांतून यशस्वीच राहतील. नोकरीच्या मुलाखतींतून प्रभाव टाकाल. कलाकारांना हा सप्ताह उत्तम सूर गाठून देणारा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमान जयंती स्वयंवराची राहील. आत्मतृप्ती लाभेल.
बदलीच्या प्रयत्नांना यश येईल
धनु : सप्ताहात चंद्रकलांचा भावस्पर्श जाणवत राहीलच आणि त्या कलांचा उत्कर्ष हनुमान जयंतीजवळ पूर्णपणे अनुभवाल. सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धिकौशल्यातून लाभ देणारा कालखंड. मातापित्यांचे मार्गदर्शन लाभेलच. ता. ९ ते १२ हे दिवस घरात प्रसन्न वातावरण ठेवतील. पूर्वाषाढा नक्षत्राची नोकरीतील ग्रासलेली अस्वस्थता जाईल. काहींचे बदलीचे प्रयत्न यशस्वी होतील. काहींना व्यावसायिक कर्जमंजुरीतून लाभ होईल. यंदाची हनुमान जयंतीची पौर्णिमा उत्तराषाढा नक्षत्राची मातृपितृचिंता घालवेल.
व्यावसायिक प्रतिष्ठा लाभेल
मकर : सप्ताहात राश्याधिपती शनीशी होणारे इतर ग्रहांचे योग हनुमान जयंतीच्या विजयी उड्डाणाकडेच वाटचाल करणारे. सप्ताहाचा आरंभ आत्मविश्वास वाढवेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या उत्तम संधी येतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमान जयंतीचे प्रभावक्षेत्र मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. घरातील तरुणांच्या चिंता जातील. हा सप्ताह मोठ्या उत्सव-समारंभातून उपस्थिती ठेवेल. काहींना राजकीय लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक प्रतिष्ठा देणारा.
सरकार दरबारी लाभ होईल
कुंभ : सप्ताहात शनीशी होणारे शुभ ग्रहांचे योग आपणास वलयांकित करणारे. काहींना सरकारी माध्यमांतून लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी निश्चितच जाईल. घरात प्रिय व्यक्तींची आगमने होतील. भावाबहिणींच्या चिंतेतून मुक्त व्हाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक मोठा आर्थिक ओघ ठेवेल. ता. १० चा गुरुवार मोठा प्रसन्न राहील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रच्या व्यक्तींना सप्ताहात पौर्णिमेजवळ जुन्या गुंतवणुकी फलदायी होताना दिसतील. नवपरिणितांचे प्रश्न सुटतील. पती वा पत्नीची चिंता जाईल.
नोकरीत मनासारख्या बाबी होतील
मीन : श्रीराम नवमीने सुरू होणारा सप्ताह चंद्रकलांचा उन्मेष साजरा करेल. घरी व दारी उत्तम पर्यावरण ठेवणारा सप्ताह. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्वसुकृताची साथ लाभेल. आजची श्रीराम नवमी देवदेवतांची स्पंदने जाणवून देईल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सतत ग्रीन सिग्नलच मिळतील. नोकरीत मनासारख्या घडामोडी होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र वैयक्तिक सुवार्तांच्या फ्लॅशन्यूजमध्ये आणेल. उमलत्या तरुणाईला हा सप्ताह ध्येयाकडे उड्डाण करवेलच. अर्थातच हनुमान प्रसन्न होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.