साप्ताहिक राशिभविष्य : (०८ जून २०२५ ते १४ जून २०२५)
नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश
मेष : सप्ताह मोठा रंगतदार राहील. अर्थातच होतकरू तरुणांना मार्ग दाखवेल. ता. १२ व १३ हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरणारे. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभ ग्रहांची कनेक्टिव्हिटी साधतील. परदेशस्थ तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनातून लाभ देईल. सरकारी माध्यमांतून लाभ होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी उद्याचा सोमवार प्रवासात सांभाळावा.
बँकांकडून अर्थसाहाय्य होईल
वृषभ : विशिष्ट अपवादात्मक पार्श्वभूमीवर बेरंग होऊ शकतात. यंत्रे, वाहने किंवा विद्युत उपकरणे जपून हाताळा. बाकी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तम राहील. काहींना बँकांकडून अर्थसाहाय्य होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे शैक्षणिक प्रश्न सुटतील. काहींना कॅम्पसमधून नोकरीचा लाभ होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ घरातील सुवार्तांची पार्श्वभूमी राहील. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून प्रसन्न ठेवणारीच अशी पौर्णिमा ठरेल.
वास्तूचे स्वप्न साकारेल
मिथुन : राशीतील बुध-गुरु युतियोग एक नवी जीवनदृष्टी देईल. आजचा रविवार मोठे भाग्यसंकेत देणारा आहे. आजचा रविवार मनपसंद गाठीभेटीचा ठरेल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच सप्ताहात प्रगतीची मोठी झेप अनुभवतील. काहींचे वास्तूचे स्वप्न साकारेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात परदेशी संधी मिळतील. नोकरीत विशिष्ट मानांकन मिळेल. मात्र सप्ताहात हातापायाच्या दुखापतींपासून काळजी घ्या. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा गोड राहील. काहींना देवदर्शनातून प्रचिती येईल. पौर्णिमा पुत्रचिंता घालवणारी ठरेल.
फसवणुकीपासून सावध राहावे
कर्क : पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र बुद्धिकौशल्यातून लाभ देईल. विशिष्ट प्रवासातील कामे होतील. तरुण वर्ग नोकरीविषयक मुलाखतींतून छाप पाडेल. तरुणांनो तयार राहाच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट शुभसंकेत प्रसन्न ठेवतील. मात्र सप्ताहात खरेदी-विक्रीच्या व्यवहारात प्रलोभने टाळा किंवा फसवणुकीपासून सावध. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात छान होईल. चैन करमणुकीची संधी असून सहलीचा मोठा आनंद मिळेल. पौर्णिमेजवळ गर्भवतींनी सांभाळावे. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी पाकिट सांभाळावे.
अटीतटीच्या झुंजीनंतर यश मिळेल
सिंह : पौर्णिमेच्या सप्ताहात शुभग्रहांची लॉबी क्रियाशील राहील. सुवार्तांतून सतत चर्चेत राहाल. नोकरीतील घडामोडी पथ्यावरच पडतील. मघा नक्षत्राच्या व्यक्ती फोटो फिनीश यश मिळवतील, अर्थातच अटीतटीची झुंज देऊनच. सप्ताहाचा शेवट एकूणच छान फ्लॅशन्यूज देत राहील. बाकी सप्ताहात राजकीय शत्रुत्व सांभाळावे. कोणतीही दादागिरी नको. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा चैनीवर खर्च करवणारी ठरेल. सहकुटुंब प्रवासाचे चांगले योग आहेत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहने जपूनच चालवावीत.
परदेशगमनाचे योग येतील
कन्या : सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावात उत्तम वातावरण ठेवेल. व्यावसायिक उत्सव प्रदर्शने गाजतील. मात्र सप्ताहात प्रवासात काळजी घ्या. काहींना नैसर्गिक प्रकोपातून नुकसानीचे प्रसंग येऊ शकतात. अवधान ठेवा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा विवाहविषयक गाठीभेटीतून मार्गस्थ करणारी असून पौर्णिमा मित्रमंडळींकडून लाभ देणारी ठरेल. व्यावसायिक वसुली होईल. ता. १२ चा गुरुवार गुरुकृपेचाच. नवपरिणितांना मोठा शुभलक्षणी असा कालखंड आहे. विशिष्ट विसंवाद संपतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनांचे योग आहेत.
कला व छंदांमधून प्रसिद्धी मिळेल
तूळ : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुक्र भ्रमण प्रभावी होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. गुरु-बुध युतियोगाची पार्श्वभूमी पौर्णिमेनंतर कला वा छंद माध्यमातून मोठी प्रसिद्धी देणारी ठरेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेचं फिल्ड मोठे. अपवादात्मक परिस्थितीत अर्थातच मोठे परिस्थितीजन्य लाभ देईल. बुद्धिचातुर्य प्रभाव टाकेल. हितशत्रुत्व संपेल किंवा शमेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार चांदण्यात हितगुज करवेल. प्रेमिकांचा आशावाद वाढेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपात आपला परिणाम दाखवेल. दुखापतीपासून सावधगिरी बाळगावी.
शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील
वृश्चिक : राशीतील पौर्णिमा संमिश्र स्वरूपात फळे देऊ शकते. नैसर्गिक घटनांमधून नुकसानीचे योग. सार्वजनिक बाबींतून त्रास होऊ शकतो. गैरसमज टाळावा. बाकी सप्ताहाचा शेवट सुखदच राहील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून मोठा धनलाभ लागेल. तरुणांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. ता. १२ चा गुरुवार गुरुप्रचितीचा असेल. गृहिणींची गुप्तचिंता जाईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अर्थातच संकष्टी चतुर्थीचा कालखंड विशिष्ट गाठीभेटींतून प्रसन्न ठेवणारा असेल. विवाहेच्छूंना शुभसंकेत देणारा काळ व सर्व अडथळे दूर होतील.
व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल
धनु : सप्ताह अतिशय वैशिष्ट्यपूर्ण फळे देणारा. सप्ताह कायम चांगल्या तऱ्हेने आठवणीतच राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर अतिशय छान प्रवाही ठेवेल. ता. १२ ते १४ हे दिवस चढत्याक्रमाने फलद्रूप होतील. व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना घडतील. काहींचा परदेशात भाग्योदय होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा शुक्रवार मोठा जल्लोषाचा ठरेल. विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. वास्तुविषयक प्रश्न सुटतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचे शत्रुत्व शमेल.
गृहिणींना उत्तम कालखंड
मकर : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुक्र भ्रमण मोठा कार्यभाग साधेल. गृहिणींना सप्ताह न बोलता कार्यभाग साधून देणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचे भावजीवन सुधारेल. सप्ताहाचा शेवट मोठा प्रसन्नच राहील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात पौर्णिमेजवळ दुखापतींपासून सावधगिरी बाळगावी. बाकी सप्ताह वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ देईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कला, छंद वा विशिष्ट बौद्धिक उपक्रमांतून मोठी साथ देईल. परदेशगमनातील अडथळे दूर होतील.
स्पर्धा परीक्षांतून उत्तम नोकरीचा लाभ
कुंभ : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना छानच राहील. नवकल्पनांना वाव देणारा असा हा सप्ताह आहे. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभग्रहांची लॉबी प्रचंड प्रभावी राहील. जीवनातला एखादा विक्रम नोंदवाल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धापरीक्षांतून उत्तम नोकरीचा लाभ होईल. नवपरिणितांना पौर्णिमा जल्लोषाची राहील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह घरी व दारी उत्तम पर्यावरण ठेवेल. पुत्रोत्कर्षातून धन्य व्हाल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा वाहनांबाबत सांभाळण्याची तसेच सार्वजनिक ठिकाणी वादविवाद टाळाच.
संकट टळेल - चैतन्य लाभेल
मीन : आपली गुरुची रास सप्ताहातील पौर्णिमेची स्पंदने खेचूनच घेईल. काहींना दैवी प्रचिती येईलच. विशिष्ट संकट निवारलं जाईल. बुध-गुरु युतियोगातून आत्मप्रचिती येईल. काहींना योग्य सल्ले देणारा गुरु भेटेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एक प्रकाराचे नवचैतन्य मिळेल. घरातील प्रिय व्यक्तींच्या संदर्भातील चिंता जातील. तरुणांना सप्ताह उत्तम पॅकेजची नोकरी देणारा, विवाहेच्छूंचे नैराश्य घालवणाराच सप्ताह आहे. उत्तम विवाहस्थळांचे प्रस्ताव येतील. उत्तम प्रेमसंवाद साधाच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा आदरसत्कार चकित करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.