साप्ताहिक राशिभविष्य : (९ फेब्रुवारी २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२५)
कलाकारांना चांगला कालखंड
मेष : सप्ताह काहींना अपवादात्मक परिस्थितीतून नेऊ शकतो. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सावधान राहावे किंवा परिस्थितीचे भान ठेवावे. नोकरीत क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्यातच. बाकी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या नोकरीच्या संधी देईलच. ता. १३ व १४ हे दिवस विलक्षण असे चमत्कार घडवतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा तीर्थाटनाची ठरेल. कलाकारांना पौर्णिमा हृद्य राहील. छान उत्सव-समारंभ होतील. पती वा पत्नीचा भाग्योदय मोठा आनंदाचा विषय होईल. व्यावसायिक वसुलीतून लाभ होईल.
व्यवसायात तेजीचा कालखंड
वृषभ : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात गुरुभ्रमणाचा छान अंडरकरंट राहील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना इतरांचे उत्तम सहकार्य लाभेल. काहींचा वास्तुप्रवेश होईल. ता. १२ ते १४ हे दिवस एकूणच भावरम्य राहतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र व्यावसायिक तेजीचे राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात अर्थातच पौर्णिमेच्या प्रभावात विशिष्ट मानसन्मानाचे योग आहेत. मात्र सप्ताहात जुगारसदृश व्यवहार टाळा. गर्भवतींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात पथ्ये पाळावीत. घरातील व्रात्य मुलावर लक्ष ठेवाच.
सरकार दरबारची कामे होतील
मिथुन : पौर्णिमेच्या सप्ताहात वक्री मंगळाचे हाय व्होल्टेज राहीलच. अन्नपाण्यातील संसर्ग जपाच. वाहने सांभाळा. काहींना व्यावसायिक पातळीवर कामगारपीडेतून त्रास शक्य. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सामाजिक प्रश्नातून त्रास होईल. शेजारी राहणाऱ्याशी भांडणे टाळा. बाकी आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ते १३ हे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर उत्तम परिणाम दाखवणारे ठरेल. व्यावसायिक वसुली होईल. विशिष्ट स्वरूपाची सरकारी कामे होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी गैरसमज होऊ देऊ नयेत. मित्रांची कुसंगत नको.
आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करा
कर्क : पौर्णिमेचा सप्ताह हर्षलच्या भ्रमणातून निश्चितच आचारसंहिता पाळायला लावेल. बेकायदेशीर व्यवहार नकोतच. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रवासातील बेरंगातून अस्वस्थ करू शकते. बाकी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण पौर्णिमेच्या प्रभावात कलांचा उत्कर्ष करेल. व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील. ता. १३ व १४ हे दिवस शुभग्रहांच्या माध्यमातून आजूबाजूचे मानसिक पर्यावरण छान ठेवतील. मनपसंत गाठीभेटी होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी थट्टामस्करी टाळावी.
प्रवासात काळजी घ्यावी
सिंह : सप्ताहात वेंधळेपणा टाळाच. प्रवासात जपा. महत्त्वाचे दस्तऐवजांची काळजी घ्या. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेचे उधाण जपलेच पाहिजे. गर्भवतींनी सांभाळावे. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपात फलदायी होईल. अन्नपाण्यातील संसर्गापासून सांभाळावे. सप्ताहाचा शेवट मातृपितृ चिंतेतून अस्वस्थ ठेवेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विशिष्ट आदरसत्कार मिळणारा ठरेल. मात्र शेअर बाजारात मस्ती नकोच.
तरुणांच्या समस्या सुटतील
कन्या : सप्ताहातील पौर्णिमेला धरून शुभग्रहांची लॉबी चांगलीच क्रियाशील राहील. उत्तरा नक्षत्रास शुक्रकलांच्या माध्यमातून लाभ होतील. विवाहविषयक गाठीभेटींतून सूर गवसेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ ते १४ हे दिवस मोठे सुगंधित राहतील. व्यावसायिक धनवर्षाव होतील. सरकारी माध्यमातून लाभ होतील. घरातील तरुणांचे प्रश्न सुटतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र दुखापतींपासून जपण्याचे. बाकी पौर्णिमा चैन, चंगळ आणि मौजमजेचीच. मात्र थट्टामस्करी टाळा. सार्वजनिक ठिकाणी उन्माद नको.
चोरी-नुकसानीपासून काळजी घ्या
तूळ : पौर्णिमेचा सप्ताह जुगारसदृश व्यवहारातून धोकादायक वाटतो. खरेदी-विक्रीत जपा. स्त्रीवर्गाशी वाद नकोत. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी आपली शरीरप्रकृती सांभाळावी. वृद्धांना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र निश्चितच दखलपात्र. तरुणांनी वाहने सांभाळावी. काहींच्या बाबतीत चोरी-नुकसानीच्या घटना शक्य आहेत. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा संमिश्र फळे देईल. सप्ताहारंभी नोकरीमध्ये बदलीचे सावट सतावेल. ता. १४ चा शुक्रवार घरात सुवार्तांचा ठरेल. सरकारी कामे होतील. नव्या ओळखींतून लाभ होतील.
नोकरीत राजकारण टाळा
वृश्चिक : पौर्णिमेचे फिल्ड असलेला सप्ताह शुभ ग्रहांच्या पॅकेजमधूनच बोलेल. एकूणच अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर आश्चर्यकारक घटना घडविणारी पौर्णिमा आहे. हुकमी कामे होतील. सरकारी माध्यमातून लाभ. कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून मोठा प्रतिसाद मिळेल. ओळखींतून विवाहप्रस्ताव येतील. ज्योतिष आड आणू नका. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या मौजमजेचा राहील. मात्र नोकरीतील राजकारणापासून दूर राहा. वरिष्ठांशी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. थट्टामस्करी टाळा.
प्रलोभनापासून दूर राहावे
धनु : सप्ताह आरोग्यविषयक पथ्ये पाळण्याचा. गर्भवतींनी सांभाळावे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ प्रवासात संसर्गाचा. काहींना भावाबहिणींच्या चिंतेतून त्रास. बाकी सप्ताहाचा शेवट अर्थातच ता. १३ व १४ हे खऱ्या अर्थाने शुभवारच राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुलीतून लाभ. विशिष्ट पुत्रचिंता जाईल. विशिष्ट औषध लागू पडेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करावेत. फसगतीचे प्रसंग शक्य. प्रलोभने टाळा.
नव्या करार-मदारातून लाभ होतील
मकर : पौर्णिमेचा सप्ताह शुभ ग्रहांच्याच प्रभावात फलद्रूप होणारा. शुक्र भ्रमणाची पौर्णिमेचा मुहूर्त साधून कलांची उधळण होईल. स्वतंत्र व्यावसायिकांना नव्या करार-मदारांतून लाभ होईल. ता. ११ व १२ हे दिवस शुभ ग्रहाच्या माध्यमातून प्युअर सिक्वेन्स लावणारे आहेत. झटपट कामे उरका. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेचे फिल्ड शैक्षणिक प्रश्न सोडवेल. काहींना परदेशी जाण्याचा व्हिसा मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात वाहतुकीपासून जपावे, श्वानदंशापासून काळजी घ्यावी
संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा
कुंभ : सप्ताहात नैसर्गिक साथ राहणार नाही. सर्व बाबतीत वेळा सांभाळा. कोणतेही नियमभंग करू नका. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र अपवादात्मक घटना-प्रसंगांतून हैराण करू शकते. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रलोभने टाळावीत. प्रवासात अपरिचित व्यक्तींशी जपून राहावे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र भ्रमणाच्या कलांचा सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी लाभ होईलच. पौर्णिमा गुरुप्रचितीची ठरेल. काहींना स्वप्नदृष्टान्त होतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ भाजण्या-कापण्यापासून सावध राहावे. पाकीट सांभाळा, चोरीपासून काळजी घ्या.
परिस्थितीजन्य लाभ होतील
मीन : आपली गुरुची रास सध्या गुरुभ्रमणाच्या उत्तम प्रभावाखाली आहे. त्यातून सप्ताहातील पौर्णिमेच्या प्रभावात राशीतील शुक्र भ्रमणातून पौर्णिमेच्या कलांचा चांगलाच आस्वाद घ्याल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. त्याचीच आजचा रविवार प्रचिती देईल. ता. ११ ते १२ हे दिवस प्रामाणिक आणि श्रद्धावंत मंडळींना मोठ्या संधी देणारे आहेत. तरुणांचा आत्मविश्वास वाढेलच. बाकी सप्ताहात मूर्खांशी संवाद टाळाच. थट्टामस्करी टाळा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रसंगावधान ठेवून वागावे. नवपरिणितांनी आचारसंहिता पाळावी. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.