साप्ताहिक राशिभविष्य : (०९ मार्च २०२५ ते १५ मार्च २०२५)
बेकायदा व्यवहार टाळा
मेष : सप्ताहातील ग्रहमान सार्वजनिक पार्श्वभूमीवर क्रिया-प्रतिक्रिया सांभाळायला लावणारे. बेकायदेशीर व्यवहार टाळाच. मित्रसंगतीतून अडचणीत येऊ शकता. कोणाच्या आहारी जाऊ नका. बाकी सप्ताह बुध-शुक्र सहयोगाच्या पार्श्वभूमीवर वैवाहिक जीवनात रंग उधळेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याच्या सोमवारची एकादशी एक उत्तम शुभ मुहूर्त राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हे दिवस अतिशय प्रसन्न राहतील. व्यावसायिक वसुली आणि विशिष्ट समारंभ होतील. भातृचिंता जाईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र पतप्रतिष्ठाविषयक प्रश्नातून त्रासाचे ठरू शकते.
नोकरीत वाद घालू नका
वृषभ : बुध-शुक्र युतियोगाची पार्श्वभूमी रोहिणी नक्षत्रास सप्ताहाच्या आरंभी चंद्रकलांचा आस्वाद देईल. ता. १० व ११ हे दिवस जीवनातील तरुणांची स्वप्ने पूर्ण करणारे. विशिष्ट शैक्षणिक टप्पा गाठाल. व्यावसायिक तेजी राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्यात. नोकरीत वरिष्ठांशी वाद वा गैरसमज नकोत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात अन्नपाण्यातील संसर्गापासून सावध राहावे. गर्भवतींनी सांभाळावे. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या.
व्यवसायात तेजीचा कालखंड
मिथुन : सप्ताहातील बुध-शुक्र सहयोगाच्या पार्श्वभूमीवर पौर्णिमा अनेकांना नक्षत्र लोकांतून लाभ देईल. मात्र न दिसणाऱ्या चंद्रग्रहणाची पार्श्वभूमी जुगारसदृश व्यवहारातून फटका देऊ शकते. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रलोभनापासून दूर राहावे. वृद्धांनी सप्ताहारंभी हातापायाच्या दुखापती जपाव्यात. बाकी सप्ताहारंभ व्यावसायिक तेजी ठेवेल. उद्याचा सोमवार मुलाखती, गाठीभेटी आणि करारमदार इत्यादींतून सुसंवाद साधेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची एकादशी तपोपूर्तीची. विशिष्ट सरकारी लागेबांधे एखादा भूखंड सोडवून देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात विसरभोळेपणा पासून सावधच ! मोबाइल सांभाळा.
आचारसंहितेचे पालन करा
कर्क : अतिशय परस्परविरोधी ग्रहमानाचा सप्ताह वाटतो. रवी-शनी युतियोगाची पार्श्वभूमी वादग्रस्त आर्थिक व्यवहारांतून झळा पोहोचविणारी. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना निश्चितच आचारसंहिता पाळायला लावेल. धुळवड सांभाळूनच खेळा किंवा उडवा. स्त्रीवर्गाशी आचारसंहिता पाळाच. बाकी सप्ताहातील बुध-शुक्र युतियोगाची पार्श्वभूमी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना मनपसंत गाठीभेटींतून छान प्रतिसाद देईल. वास्तुविषयक खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना गती मिळेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र धुळीतून संसर्गाचे. धुळवड जपूनच खेळा. श्वानदंश सांभाळा.
ओळखीतून नोकरीची संधी
सिंह : रवी-शनी युतियोगाची पार्श्वभूमी होळी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र विचित्र गुप्तचिंतेतून हैराण करू शकते. काहींना मातृपितृ चिंता शक्य. बाकी सप्ताहात व्यावसायिक उत्तम तेजी राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना हुताशनी पौर्णिमेचा गुरुवार व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद देईल. तरुणांना थोरामोठ्यांच्या ओळखीतून नोकरीचा लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी प्रवासातील संसर्ग जपावा. घरातील कामगारवर्गाशी वाद नकोत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना धुळवडीच्या पार्श्वभूमीवर स्त्रीवर्गाशी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्यात. वाहनांचे पार्किंग सांभाळा.
नवीन वास्तूमध्ये प्रवेश होईल
कन्या : सप्ताहातील बुध-शुक्र युतियोगाची पार्श्वभूमी व्यावसायिक उपक्रमांतून झगमगाट साजरा करेल. तरुणांना हा सप्ताह थोरामोठ्यांच्या सहकार्यातून बोलणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विशिष्ट महत्त्वाच्या कामांतून यश देईलच. नवपरिणितांचे नूतन वास्तुप्रवेश होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाची फळे देईल. पर्यटनस्थळी जपा. अन्नपाण्यातील संसर्ग जपा. श्वानदंशापासून सावध. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी थट्टामस्करी करू नये.
प्रवासामध्ये पैसे सांभाळा
तूळ : बुध-शुक्र युतियोगाच्या पार्श्वभूमीवर तरुणवर्ग चैन-चंगळ आणि मौजमजा करेलच. सप्ताहात स्वाती नक्षत्राची विशिष्ट उंची खरेदी होईल. पती वा पत्नीची एखादी गुप्तचिंता जाईल. ता. १० व ११ मार्च हे दिवस नोकरी-व्यावसायिक सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवतीलच. विशाखा नक्षत्राच्या वृद्ध व्यक्तींनी प्रिय व्यक्तींशी वाद घालू नयेत. यंदा धूलिवंदन जपूनच करा. चित्रा नक्षत्राच्या नवपरिणितांनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात गैरसमज टाळावेत. प्रवासात रोख पैसे सांभाळा.
तरुणांना उत्तम कालखंड
वृश्चिक : यंदाची हुताशनी पौर्णिमा बुध-शुक्र युतियोगाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकलांचा छान आस्वाद देईल. मात्र ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात पथ्ये पाळावीत. कुसंगत टाळा. तारुण्यातील उन्माद सांभाळा. वाहनांवर मस्ती नको. घरी आणि दारी राजकारणी व्यक्तींपासून दूर राहा. बाकी ता. ९ ते ११ हे दिवस शुभग्रहांचे उत्तम पॅकेज राबवतील. तरुणांचे शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून प्युअर सीक्वेन्स लागतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात मोठा प्रेमवर्षाव होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा दृष्टान्त देईल. अर्थातच गुरुभक्तीची पोच मिळेल.
आनंदोत्सव साजरा कराल
धनु : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांची मोठी भाग्यबीजे पेरेल. सप्ताहात नवपरिणितांचे जीवन चांगलेच मार्गस्थ होईल. मूळ नक्षत्रास यंदाची हुताशनी पौर्णिमा घरात आनंदोत्सव साजरा करेल. ता. १३ चा गुरुवार अतिशय भावरम्य राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुस्वप्न साकारेल. नोकरीतील पर्यावरण सुधारेल. विशिष्ट वाद मिटतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणाची चहाडी किंवा चुगली करू नये. घरातील तरुणांची मने सांभाळावीत. गर्भवतींनी पथ्ये पाळावीत.
कुसंगत-व्यसन टाळा
मकर : सप्ताहातील बुध-शुक्र युतियोगाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम लाभ उठवू शकता. नोकरदारांना हा सप्ताह उत्तम पर्यावरणाचा राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा उत्तम लाभ उठवतील. ता. १० व ११ हे दिवस विजयी चौकार-षटकारांचे राहतील. नोकरीत योग्य ठिकाणी बदली करून घ्याल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हवेतील प्रदूषणापासून जपलेच पाहिजे. शनिवार प्रवासात जपाच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर बाजारातील अट्टाहासातून नुकसानीच्या झळा बसू शकतात. देण्याघेण्याचे व्यवहार जपून करा. कुसंगत टाळा. व्यसने सांभाळा.
आरोप-प्रत्यारोपासून दूर राहा
कुंभ : रवी-शनी युतियोगाची पार्श्वभूमी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात एकप्रकारच्या प्रदूषणाचा प्रभाव टाकू शकते. सप्ताहात कोणताही असंगाशी संग नको. कोणावर आरोप-प्रत्यारोप करू नका. बाकी सप्ताहातील बुध-शुक्र युतियोगाची कनेक्टिव्हिटी साधून बुद्धिजीवी मंडळींना निश्चितच उत्तम लाभ होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ चा गुरुवार विशिष्ट व्याधीचे दडपण घालवेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासात बेरंगाचा. काहींना नैसर्गिक दुर्घटनांतून व्यत्ययाचा किंवा नुकसानीचा.
उत्सव प्रदर्शनांचा लाभ होईल
मीन : सप्ताहातील बुध-शुक्र युतियोगाच्या माध्यमातून उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती छान लाभ घेतील. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शने उत्तम प्रतिसाद देतील. ता. १० व ११ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. भावाबहिणीची विशिष्ट चिंता जाईल. मातृपितृ चिंतेतून मुक्त व्हाल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात तिन्हीसांज समयी भांडणे टाळावीत. बाकी सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र रात्री विचित्र जागरणाचे ठरू शकते. शेजारीपाजारी विचित्र प्रसंग घडू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.