आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हर्षदा पवारला सुवर्ण

रविवार, 17 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - इंडियन बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिटनेस फेडरेशनच्या ‘डायमंड कप इंडिया-२०१९’ या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला शहरात शनिवारपासून (ता. १६) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी महिलांच्या फिजिकल प्रकारात मुंबईच्या हर्षदा पवारने कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या बिकिनी प्रकारात विदेशी खेळाडू ताहितीच्या ॲलेना लोपेजने शानदार प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले. दरम्यान, पुरुष गटात जेहान मिझामी मोहम्मद व पंढरीनाथ पाटील यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताचा दबदबा पाहायला मिळाला.

विभागीय क्रिडा संकुलावर ही स्पर्धा सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, फेडरेशनचे अरमन्डो, नतालिया, भारताचे सचिव डॉ. संजय मोरे, महापौर नंदकुमार घोडेले, राजेश राऊत, महावीर ढाका, बेनी फ्रान्सिस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. कार्यक्रमाची सुरवात दिलीप खंडेराय यांच्या समूहाने गणेश वंदनेने झाली. त्यानंतर महिला बॉडी बिल्डरसाठी बिकिनी प्रकारात ताहिती देशाच्या ॲलेना लोपेजने शानदार प्रदर्शन करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर केनियाच्या मिखायला परेसा सेलेस्टिनाने रौप्यपदक जिंकले. इंग्लंडच्या मॅंगल लोरझने कांस्यपदक मिळविले. तर किर्गिस्तानच्या लुधिमिला इलेग्ना चौथ्या स्थानावर, तर भारताची रिता देवी पाचवा, तर सहाव्या स्थानी आशा शेहरा राहिली. 

भारताच्या हर्षदाचे सोनेरी यश
महिला फिजिकलमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले. यात मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्षदा पवारने सोनेरी कामगिरी साधली. दीपा सप्रेने रौप्यपदक आणि श्रद्धा आनंदने कांस्यपदक पटकावले. स्नेहा प्रकाश चौथी, स्नेहा कोकणे-पाटील पाचवी व पल्लवी डोशी सहाव्या स्थानावर राहिली.

पुरुष फिजिकल गट १७१ सेमी
जेहान मिझामी मोहम्मद, भारत (सुवर्णपदक), हासिम सय्यद, अफगानिस्तान (रौप्यपदक), आर. पेनकर ऋषिकेश, भारत (कांस्यपदक), अजय शेट्टी, भारत (चौथा), दत्ता सुदामकर, (पाचवा), महेंद्र, भारत (सहावा).

पुरुष फिजिकल १७५ सेमी गट 
पंढरीनाथ पाटील, भारत (सुवर्णपदक), लव्हली शर्मा, भारत (रौप्यपदक), शोओकमिन हॉन, मंगोलिया (कांस्यपदक), के. अलेक्‍झांडर मॅनहेनग्रेव्ह (चौथा), उपेंद्र शर्मा, भारत (पाचवा), एम. शेख कदीम, भारत (सहाव्या).

‘‘या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधत्व केले. यात यश मिळविले आहे. आतापर्यंत आठ पदके मिळाली. हे सुवर्णपदक मिळून नववे आहे. या स्पर्धेसाठी मला कुटुंबाची मदत मिळाली. प्रशिक्षकांचेही योग्य मार्गदर्शन लाभले. गेल्या चार वर्षांपासून तयारी करीत होते. मुलीही या क्षेत्रात करिअर घडवू शकतात. या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहावे.
- हर्षदा पवार, मुंबई