Maharashtra Din 2022: महाराष्ट्रातील जनतेसाठी वरदान ठरलेल्या महत्त्वाकांक्षी योजना
Maharashtra Din 2022: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर महाराष्ट्रानं मागे वळून कधीच पाहिलं नाही. निर्मितीपासूनच महाराष्ट्राने विकासाची घौडदौड कायम राखली. राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत, देशरक्षणापासून ते शिक्षणापर्यंत, तंत्रज्ञानापासून ते आर्थिक सुबत्तेपर्यंत, खेळापासून ते कलेपर्यंत देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्रानं मोलाचं योगदान दिलं आहे. महाराष्ट्राचा जरिपटका तिरंग्याच्या सन्मानासाठी कायमच संघर्ष करत राहिला आहे. हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री कायमच धावून गेला आहे. दरम्यान महाराष्ट्राने काही लोककल्याणकारी योजना राबवल्या की त्यांचा प्रभाव आणि उपयुक्तता पाहून नंतर देशभरात राबवल्या गेल्या. आज आपण जाणून घेऊया अशाच काही कल्याणकारी योजनांबदद्ल-(Famous Scheme of Maharashtra Government)
1. रोजगार हमी योजना- महाराष्ट्रात रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी 1977 पासून सुरु झाली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अकुशल व्यक्तींकरिता रोजगारीची हमी दिली जात होती. सन 2005 मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (विद्यमान नाव - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) लागू केला.
2. ग्रामस्वच्छता अभियान- ग्रामीण जनतेचं आरोग्यमान उंचावण्यासाठी सन 2000– 2001 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम अमलात आणण्यात आला असून त्यामधून लोकांच्या पुढाकार तसेच शासनाचा सहभाग असा नवीन विचार पुढे आला. घरांची, गावाची स्वच्छता व्हावी तसेच ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान उंचवावे, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येते. स्वच्छतेतून समृद्धीकडे हे या योजनेच ब्रीदवाक्य आहे. या अभियानाअंतर्गत विविध निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना पारितोषिक देण्यात येते.
3. तंटामुक्ती योजना- गावातील तंटे गावातच सोडवून गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान अस्तित्वात आले. महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प असून १५ ऑगस्ट २००७ पासून या योजनेची सुरुवात झाली.