पिंपरी : भाजप नगरसेविका आशा शेडगेंसह १० जण पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी : महापालिका कासारवाडी प्रभाग ३० मध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी खोदकाम केले जात आहे. मात्र, आता शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे खोदकाम करू नये. नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होऊ शकतो, अशी भूमिका भाजप नगरसेविका आशा शेडगे यांनी घेऊन कासारवाडीतील काम थांबविण्याची विनंती अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला केली. मात्र, कामे सुरूच ठेवल्याने शेडगे यांच्यासह काही महिला महापालिका भवनात आल्या. आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केले व आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली. याप्रकरणी नगरसेविका शेंडगे यांच्यासह १० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांच्या पक्षाच्या नगरसेविका आशा शेडगे यांनी गुरुवारी आंदोलन केले. आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालय बाहेर असलेल्या नामफलकावर शाई फेकत निषेध व्यक्त केला. याप्रकरणी शेडगे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
महापालिका प्रभाग क्रमांक ३० कासारवाडी-दापोडी मध्ये चार नगरसेवकांपैकी आशा शेडगे या भाजपच्या एकमेव नगरसेविका आहेत. अन्य तीन नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. शेडगे एकट्याच कासारवाडीच राहायला आहेत. अन्य तीन नगरसेवक दापोडीत राहायला आहेत.
शेंडगे यांच्या निवासस्थान परिसरासह अन्य भागात विविध वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई सुरू आहे. त्याला शेडगे यांनी आक्षेप घेतला आहे. सांगूनही अधिकाऱ्यांनी काम सुरूच ठेवल्याने त्या प्रकरणासह काही समस्यांबाबत महिला कार्यकर्त्यांसमवेत आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्यासाठी नगरसेविका शेडगे महापालिका भवनात आल्या. त्या वेळी आयुक्त पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा महत्त्वाच्या बैठकीत होते. त्यामुळे ते आंदोलकांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या शेडगे यांनी आयुक्तांच्या कार्यालय बाहेर असलेल्या त्यांच्या नामफलकावर काळी शाई फेकून निषेध व्यक्त केला.
शाई फेकण्याचा प्रकार घडतात काही क्षणातच सुरक्षारक्षक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आशा शेडगे यांच्यासह दहा महिला कार्यकर्त्यांना महापालिकेच्या आवारातून ताब्यात घेतले.
त्यांना पिंपरी पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अचानक घडेलेल्या या प्रकारामुळे महापालिकेत गोंधळ उडाला.