तुळजाभवानी माता मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ
Published on : 10 January 2022, 1:53 pm
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवास सोमवारी (ता.दहा) प्रारंभ झाला आहे. तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती सोमवारी पहाटे सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. त्यानंतर देवीस अभिषेक पुजा झाली. तसेच पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास यजमानांच्या सिंहासन पुजा झाल्या. तसेच तुळजाभवानी मातेचे भोपे पुजारी प्रशांत पाटील यांनी तुळजाभवानी मातेचे सर्व धार्मिक विधी केले.
त्यानंतर गौमुख तिर्थ कुंडापासून कलश मिरवणूक काढण्यात आली. कलशाचे पुजन शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमान प्रवीण नरहरी कदम तसेच त्यांच्या पत्नी मंजूषा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कलशाची मिरवणूक तुळजाभवानी मंदिरात मिरवण्यात आली.
त्यानंतर गणेश विहारात घटस्थापना करण्यात आली.
त्यानंतर शाकंभरी नवरात्र महोत्सवातील होणाऱ्या पूर्णाहुती सोहळ्यासाठी ब्राह्मणांना वर्णी देण्यात आली.
यावेळी तुळजाभवानी मातेचे उपाध्ये सुनित पाठक, धनंजय पाठक, शैलेश पाठक, मकरंद प्रयाग, भैय्या दीक्षित, श्रीराम अपसिंगेकर, रवी पाठक, शरद कांबळे, राजेश अंबुलगे, चंद्रकांत ओवरीकर यासह ब्राह्मणांना वर्णी देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, भोपे मंडळाचे माजी अध्यक्ष सुधीर कदम, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, सचिन अमृतराव, सुधीर रोचकरी, सागर इंगळे, प्रा. धनंजय लोंढे , तुळजाभवानी मातेचे पलंगे बब्रुवान पलंगे, नागेश शितोळे आदी उपस्थित होते.
पुण्यातील रांजणगाव येथील भाविक माऊली नानासाहेब पाचुंदकर, अर्चना पाचुंदकर यांनी शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिराचा परिसर विशेषतः गाभारा फुलांनी सजविला.
श्री पाचुंदकर यांचा यावेळी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त गणेशपुजन, वरूण पुजन, कलश पुजन आदीसह विविध धार्मिक विधी परंपरेने झाले.
तुळजाभवानी मंदिरात चंद्रकांत मोरे यांनी संबंळ हे वाद्य वाजविले.
तसेच छत्री आबदागिरी, चौरी , चोपदार काठी घेऊन पारंपारिक सेवेधारी उपस्थित होते.
