Photo : ५८ वर्षांच्या 'शिवाजी मंदिर'ला नवी झळाळी, दोन वर्षांनी तिसरी घंटा..
करोना (covid 19) आणि दुरुस्ती यामुळे दोन वर्षे बंद असलेले दादर येथील शिवाजी मंदिर (shivaji mandir) (dadar) नाटयगृह नाटकांसाठी खुले झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच प्रयोगांना सुरवात होणार आहे. दुरुस्ती दरम्यान नाट्यगृहात बरेच बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ३ मे रोजी नाट्यगृहाच्या ५८ वा वर्धापन दिन आहे. या जुन्या नाट्यगृहाला दिलेली नवी झळाळी डोळे दिपवणारी आहे.
दादर पश्चिमेकडील बाजारपेठेत फिरताना प्रत्येकाने हे प्रवेशद्वार आवर्जून पहिले असेल. प्रवेश द्वारावर झळकणारे नाटकाचे फलक, रंगकर्मीची मांदियाळी हीच या वास्तूची ओळख आहे. आज ऑनलाईन माध्यमातून तिकीट सहज उपलब्ध होत असले तरी मुंबईकर मात्र आजही शिवाजी मंदिर मध्ये जाऊनच तिकीट खरेदी करतात.
मध्यंतरी ही वास्तू डागडुजीला आली होती. त्यात करोनामुळे नाट्यगृह बंद झाल्याने दुरुस्तीचे काम सुरु केले. पण टाळेबंदीमुळे दुरुस्तीचे काम रखडले. सध्या शिवाजी मंदिर पूर्णपणे दुरुस्त झाले असून जणू एक नवे रूपच धारण केले आहे.
ध्वनीव्यवस्थेचे आधुनिकीकरण , नवी वातानुकूलित यंत्रणा, बाल्कनीतूनही कार्यक्रम व्यवस्थित पाहता येईल अशी व्यवस्था, वातानुकूलित मेकअपरुप, रंगमंचाचे विस्तारीकरण, खुर्च्यांना नवे कव्हर, नवी प्रकाश व्यवस्था, अंतर्गत सजावट असे नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
अनेक रसिकांचे बाल्कनीशी वेगळे नाते आहे. कित्येक कुटुंबांना पहिल्या रांगेची तिकीट परवडत नसल्याने ते बाल्कनीत बसून नाटक पाहतात. तसेच आपले नाटक बाल्कनीच्या शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचावे यासाठी कलाकारही मेहनत घेत असतात. अशी ही बाल्कनी पूर्णपणे दुरुस्त करण्यात अली आहे. आता बाल्कनीतूनही उत्तर प्रकारे नाटक पाहता येईल.
'तिसरी घंटा' वाजल्यानंतर उघडणारा हा मखमली पडदा दोन विश्वांची सांगड घालत असतो. गेल्या दोन वर्षात दादरमध्ये नाटकाचा प्रयोगच झाला नसल्याने प्रेक्षक शिवाजी मंदिरात येण्यास आतुर आहेत. शुक्रवार २९ एप्रिल रोजी 'संज्या छाया' नाटकाने नाट्यगृह सुरु होणार असून हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे.