Jalgaon News: अबब! मतदारयाद्यांत दीड लाखांवर फोटो अस्पष्ट, खरा मतदार ओळखायचा कसा? असे करा अपडेट | Voter ID Card | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voters photo issue

Jalgaon News: अबब! मतदारयाद्यांत दीड लाखांवर फोटो अस्पष्ट, खरा मतदार ओळखायचा कसा? असे करा अपडेट

जळगाव : जिल्ह्यात ३४ लाख ६२ हजारांवर मतदार आहेत. मतदारयाद्यांमध्ये तब्बल एक लाख ६३ हजार ८८९ मतदारांचे छायाचित्र ‘ब्लर’ (अस्पष्ट) आहेत. ते फोटो काढून त्या जागी मतदारांचे नवीन फोटो टाकण्याचे आदेश राज्य निवडणूक विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत.

त्यानुसार निवडणूक विभागाने संबंधित मतदाराच्या ‘बीएलओ’ (बूथ लेव्हल अधिकारी) मार्फत मतदारांशी संपर्क साधून नवीन फोटो अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे.

आगामी एक ते दीड वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणूक होतील, असे चित्र आहे. सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, पालिकांचाही निवडणुका आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने नुकताच जळगाव जिल्ह्यातील मतदारयाद्यांचे सर्वेक्षण केले. त्यात अनेक बाबींवर बोट ठेवून त्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात ८० वर्षांवरील एक लाख १५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यांनी जेव्हा मतदारयादीत नाव नोंदविले असेल तेव्हाचा फोटो अपलोड केला आहे. त्यांचे सध्याचे फोटो अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे.

मतदारयाद्यांमध्ये पूर्वी एक लाख ८५ हजार मतदारांचे सारखे फोटो होते. त्यात संबंधितांकडून त्यांचेच नाव, फोटोही त्यांचेच असल्याचे खात्री करून घेत दुसरा फोटो डिलीट करण्यात आला आहे. आता ८१ हजार ५६६ मतदारांचे सारखे फोटो आहेत. ते अपडेट करण्याचे काम सुरू आहे.

मतदारयादीला आधारकार्ड सिडिंग (लिंक) करण्याचे काम केवळ ४९ टक्के झाले आहे. जळगाव शहरात १८ टक्के मतदारांनी मतदारयादीला आधार सिडिंग केले आहे. मतदारांची सारखी नावे असल्याची दोन हजार १२८ मतदार आहेत. त्यांना बोलावून त्यांचीची नावे असल्याची खात्री करून घेतली जात आहे.

''निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार याद्या अपडेट केल्या जात आहेत. मार्च २०२३ ला असलेली मतदारयादी आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. याद्या अपडेटची कामे वेगात सुरू आहेत.'' -तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा