Jalgaon : ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम ९० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम ९० टक्के

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम आता जवळपास ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. शहरातील सहापैकी चार झोनमध्ये ठरावीक ठिकाणी योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची चाचणीही (ट्रायल) पूर्ण झाली आहे. असे असले तरी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा मात्र अद्याप कायम आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अमृत’ योजनेत तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसेंनी जळगाव महापालिकेसह भुसावळ पालिकेचा समावेश करुन घेतला. तीन- साडेतीन वर्षांपूर्वी जळगाव शहरात याअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामांना सुरवातही झाली. दोन वर्षे मुदत असतानाही अद्याप ही दोन्ही स्वरुपातील कामे अद्याप प्रलंबित आहेत.

पाणीपुरवठ्याचे ९० टक्के काम

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर योजनेतील १२०० मि.मी. व्यासाची प्रमुख जलवाहिनी, मुख्य जलवाहिन्या व अंतर्गत वाहिन्यांसह ६ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम याअंतर्गत प्रस्तावित होते. काम सुरु झाल्यानंतर साडेतीन वर्षे उलटून गेल्यानंतरही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आतापर्यंत कामाला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेच्या यंत्रणेकडून केला जात आहे.

वाढीव वस्त्यांमध्ये नवीन डीपीआर

या योजनेत आधीच्या आराखड्यानुसार अंतर्गत जलवाहिन्या (distribution lines) ६४५ किलोमीटरच्या होत्या. हे काम पूर्ण झाले आहे. त्यातयात वाढीव वस्त्यांमधील १९ किलोमीटर वाहिन्यांचा समावेश करण्यात आला असून तेदेखील काम पूर्णत्वाकडे आहे. मुख्य जलवाहिन्यांची लांबी २१ किलोमीटर असून त्यापैकी १४ कि.मी. काम पूर्ण झाले आहे. ६ पाण्याच्या टाक्यांचे कामही ९० टक्केपूर्ण आहे. प्रेशर रिडींगसाठी मुख्य १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बदलवणे आवश्‍यक असल्याने तीदेखील बदलण्यात आली आहे.

तीन-चार ठिकाणी चाचणी

अमृत योजनेतून झालेले काम शहराच्या सहा विभागात (झोन) विभागले असून त्यापैकी चार झोनमधील काही ठिकाणी पाणीपुरवठ्याची चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी ठरली आहे. यात सुप्रीम कॉलनी, पिंप्राळा, नित्यानंदनगर या भागांचा समावेश आहे. सुप्रीम कॉलनीत तर ‘अमृत’मधून नियमित पाणीपुरवठाही होत आहे.

असे आहे कामाचे स्वरूप

मुख्य जलवाहिनी (१२०० मि.मी. व्यास) : काम पूर्ण

अंतर्गत जलवाहिन्या (६४५ कि.मी.) : काम पूर्ण

मुख्य जलवाहिन्या (२१ कि.मी.) : १४ कि.मी. पूर्ण

वाढीव वस्ती जलवाहिनी (१९० कि.मी.) : काम पूर्ण

पाण्याच्या टाक्या ६ : ९० टक्के काम पूर्ण

loading image
go to top