Jalgaon News : रस्त्यावर वेस्ट मटेरियल, अनधिकृत होर्डिंग नकोच! महापालिका युनिटप्रमुखावर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : रस्त्यावर वेस्ट मटेरियल, अनधिकृत होर्डिंग नकोच! महापालिका युनिटप्रमुखावर होणार कारवाई

जळगाव : बांधकाम तोडल्यानंतर वेस्ट मटेरियल रस्त्यावर टाकून दिले जाते, तसेच रस्त्यावर कुठेही अनधिकृत फलक लावले जातात. (Action will be taken against municipal unit head for Unauthorized hoarding of waste material on road jalgaon news)

त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते व नागरिकांना त्रास होता. आता त्यावर वेळीच कारवाई करण्याचे आदेश युनिटप्रमुखांना दिले आहेत. त्यांनी कारवाई केली नाही, तर त्या युनिटप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आदेश काढले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, की शहरात विविध भागांमध्ये बांधकाम साहित्याचे वेस्ट मटेरियल रस्त्यावर पडले आहे. तसेच अनेक प्रमुख रस्त्यांवर विनापरवानगी जाहिरातींचे बॅनर व फलक लावली आहेत.

यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रहिवाशांनाही त्रास होत असून, शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे असे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, किरकोळ वसुली विभागाने नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी अन्यथा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

आठवड्याला घेणार आढावा

याबाबत त्यांनी म्हटले आहे, की कारवाई करण्याचे अधिकार बांधकाम युनिटअंतर्गत येणारे शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. कारवाईसाठी बांधकाम विभागप्रमुखांना किरकोळ वसुली विभाग पावतीपुस्तक व वसुलीसाठी मदत करणार आहेत.

दैनंदिन प्रत्येकी किमान पाच जणांवर दंडात्मक कारवाई करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. केलेल्या दंडात्मक कारवाईचा आढावा दर सोमवारी होणाऱ्या आढावा बैठकीत घेतला जाईल व ज्या युनिटप्रमुखांमार्फत कमी प्रमाणात कारवाई करण्यात आली असेल त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.