
अमळनेरला रस्त्याच्या मधोमध दीड फुटाचे चेंबर
अमळनेर - शहरातील आदर्शनगर व एलआयसी कॉलनी भागात रस्त्यांची कामे तर झालीत, मात्र रस्त्याच्या मधोमध एक ते दीड फूट उंचीचे चेंबर बांधून चालणाऱ्या व्यक्तीलाही अडथळे निर्माण केल्याबद्दल संबंधित विभागाचे अभियंता आणि ठेकेदाराचा सत्कार करण्याची उपरोधिक मागणी नागरिकांनी केली आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या भुयारी गटारींचे काम जीवन प्राधिकरण विभागाला देण्यात आले असून, मुख्य चेंबर रस्त्याच्या मध्ये आले तरी त्याचे सबचेंबर हे रस्त्याच्या कडेला असले पाहिजेत. मात्र अवघ्या दीड दीड फुटांवर मुख्य चेंबरजवळ सबचेंबर बनवून रस्त्यात अडथळा निर्माण केला. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा सोडली. जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतरच ठेकेदाराला बिल अदा करायला हवे होते.
रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत झाले. त्यांनी देखील रस्त्यातील मोठे अडथळे पाहिले नाहीत. पालिकेच्या हद्दीत रस्ता होत असल्याने पालिका अभियत्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, नागरिकांना सुविधा देण्याच्या नावाखाली गैरसोयच जास्त झाली आहे. चारचाकीला खालचा भाग लागतो, सायकल, मोटरसायकलीला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अशा काम करणाऱ्या ठेकेदारांचा व जबाबदार अधिकाऱ्यांचा सत्कार झालाच पाहिजे, अशी उपरोधिक मागणी होत आहे.
Web Title: Amalner Has Chamber Of One And Half Feet In Middle Of Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..