
Amlaki Ekadashi : प्रतिपंढरपूर... अभंग, दिंडी अन् बरेच काही...
जळगाव : शाळेचे प्रांगण, विशिष्ट जागेचा परिसर शेणाने सारवलेला. पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल मंदिरासह तेथील स्थळांची प्रतिकृती. (Amlaki Ekadashi celebrated by creating Pratipandharpur Dindi little saints in Dr Avinash Acharya Vidyalaya jalgaon news)
विविध संतांच्या वेशभूषतील चिमुकले. संतांवर आधारित नाटिका, अशा संतांच्या मांदियाळीचे चित्र विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात अनुभवायला मिळाले. निमित्त होते, आमलकी एकदशीचे.
विद्यालयात आमलकी एकादशीनिमित्त वर्षभर साजऱ्या झालेल्या एकादशींचा समारोप आमलकी एकादशीला संत मेळाव्याने झाला. या मेळाव्यातून संतांच्या परंपरेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात विठ्ठल-रुख्मिणी प्रतिमापूजनाने होऊन मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
दादामहाराज जोशी, महापौर जयश्री महाजन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, रामानंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले, शालेय समितीप्रमुख हेमा अमळकर, मुख्याध्यापिका योगिता शिंपी आदी उपस्थित होते.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
कीर्तन, अभंग, दिंडी...
दोनशेवर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत संत मेळाव्यात कीर्तन, भारुड, अभंग, पावली व दिंडीने भक्तिभाव निर्माण केला. संतांच्या जीवनावर आधारित प्रसंग, पथनाट्यातून संतांचा जीवनपट उलगडला. संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, सावता माळी, सेना महाराज, चोखामेळा, नरहरी सोनार, मुक्ताबाई, सखुबाई, पुंडलिक, निवृत्तीनाथ, एकनाथ या संतांची पात्र विद्यार्थ्यांनी वेशभूषेसह साकारली.
पंढरपूरची प्रतिकृती
संत मेळाव्याचे खास आकर्षण ठरले. पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर (संत नामदेव महाद्वार), नामदेव पायरी, गरुड खांब, संत चोखामेळा समाधी, ज्ञानेश्वर, मुक्ताबाईची ताटी, जनाबाईचे घर, संत गोरा कुंभाराच्या झोपडीची प्रतिकृती.
त्यानिमित्त परिसर शेणाने सारवण्यात आला होता. कान्होपात्रा विठ्ठल भेट, सखुबाई विठ्ठल दर्शन, पुंडलिक विटेचा प्रसंग, एकनाथ जनार्दन स्वामी प्रसंग, सावता माळी विठ्ठल भेट, ज्ञानेश्वर ताटी प्रसंग व रेड्याकरवी श्लोक आदी प्रसंग विद्यार्थ्यांनी सरसपणे सादर केलेत.