
रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागाचे कर्मचारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये बसविण्यात आलेल्या एसीमध्ये गॅस भरण्याचे काम करीत होते.
भुसावळ : येथील रेल्वे रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमधील एसीमध्ये गॅस रिफिलिंग करत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. यात दोन कर्मचारी भाजले असून, त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
येथील मध्य रेल्वेच्या रुग्णालयात नियमितपणे एसी दुरुस्तीची कामे केली जातात. त्यानुसार रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागाचे कर्मचारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये बसविण्यात आलेल्या एसीमध्ये गॅस भरण्याचे काम करीत होते. मात्र, या वेळेस अचानक काहीतरी बिघाड होऊन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये इलेक्ट्रिक विभागाचे दोन कर्मचारी भाजले गेले असून, त्यांना तत्काळ रेल्वे रुग्णालयातच उपचारार्थ दाखल करण्यात आले.
माहिती देण्यास टाळाटाळ
या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून, यात जखमी झालेले कर्मचारी धोक्याच्या बाहेर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले. जखमी असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत मात्र अधिक माहिती देण्यास रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली.
रेल्वे रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये एसी दुरुस्तीचे काम सुरू असताना गॅस लिक झाल्याने स्फोट झाला. यात काही कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. घटना घडली त्या वेळेस आम्ही डीआरएम कार्यालयातील मीटिंगमध्ये असल्याने याबाबत अधिक माहिती नाही. या संदर्भात इलेक्ट्रिकल विभागास माहिती आहे.
-डॉ. पी. के. सामंतरॉय, मुख्य चिकित्सा अधिकारी, मध्य रेल्वे रुग्णालय, भुसावळ
संपादन- भूषण श्रीखंडे