
PM Awas Yojana : घरकुल अनुदान लाटणाऱ्यांवर गुन्हे; 477 लाभार्थ्यांवर पंधरा दिवसांत कारवाई
एरंडोल (जि. जळगाव) : घरकुलांच्या विविध योजनांचा (Scheme) पहिला हप्त घेऊनही बांधकाम न करणाऱ्या तालुक्यातील ४७७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत लवकरच हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. (Cases registered against 477 people who not constructed houses despite receiving first installment of various schemes jalgaon news)
प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच रमाई आवास योजना, शबरी आवास योजनांमधील घरकुले लाभार्थ्यांना मंजूर होऊन बांधकामासाठी पहिला हप्ता देण्यात आला. त्यानंतर शंभर दिवस कालावधी उलटला आहे.
बांधकाम सुरू करण्याबाबत पंचायत समिती व ग्रामपंचायतीमार्फत तोंडी सूचना तसेच लेखी सूचना देऊनही बांधकाम अद्याप सुरू केले नाही, अशा तालुक्यातील ४७७ घरकुल लाभार्थ्यांकडून अनुदान रक्कम वसुली करून त्यांना रद्द करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.
जे लाभार्थी अनुदान रक्कम परत करण्यास नकार देत आहेत, अशा लाभार्थी यांचे ग्रामपंचायत दप्तरी असलेल्या स्वयम मालकीच्या कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेवर किंवा महसूल दप्तरी असलेल्या शेती सातबारा उताऱ्यावर किंवा लाभार्थी याच्या स्थावर जंगम मालमत्तेवर बोजा बसविण्याच्या आदेश शासनाकडून प्राप्त झालेला आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तालुक्यातील आवास योजनेअंतर्गत २०१६- १७ ते आजपर्यंत मंजूर प्रलंबित असलेली घरकुले पूर्ण करण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेली आहेत. अनुदानाचा गैरवापर करणाऱ्या लाभार्थ्यांवर एरंडोल पोलिस स्थानकात व कासोदा पोलिस स्थानकात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील गावनिहाय संपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शाखा अभियंता यांची नेमणूक करण्यात आली आहे.
"ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत घरकुल बांधकामास सुरुवात केलेली नाही, अशा लाभार्थ्यांवर येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही करण्यात येईल, तसेच असे लाभार्थी भविष्यात घरकुलांचा लाभ मिळण्यास अपात्र राहतील. लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून देण्यात आलेली रक्कम पूर्णपणे वसूल करण्यात येणार आहे." - दादाजी जाधव गटविकास अधिकारी, पंचायत समिती, एरंडोल