विवाहाचे आमिष दाखवून वरपित्याची फसवणूक; वधूसह 2 जणांविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage fraud

विवाहाचे आमिष दाखवून वरपित्याची फसवणूक; वधूसह 2 जणांविरोधात गुन्हा

एरंडोल (जि. जळगाव) : मुलाच्या लग्नासाठी नियोजित वधू दाखवून वरपित्याकडून एक लाख रुपये रोख घेऊन नियोजित वधू व अन्य दोघांनी पळ काढल्याची घटना गुरुवारी (ता. २६) घडली. वरपित्याची एक लाख रुपयांची फसवणूक झाल्यामुळे नियोजित वधू व अन्य दोघा मध्यस्थ यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली फसवणूक

शहरातील रहिवासी तथा पालिकेचे निवृत्त वसुली अधिकारी रामदास चौधरी हे मोठा मुलगा दीपक याच्या विवाहासाठी मुलीच्या शोधात होते. त्यांना पारोळा येथील वत्सलाबाई तुकाराम चौधरी या विवाह जुळविण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. १० एप्रिलला रामदास चौधरी यांनी वत्सलाबाई चौधरी यांची भेट घेऊन मुलगा दीपक याच्यासाठी मुलगी असल्यास माहिती द्यावी, असे सांगितले. वत्सलाबाई चौधरी यांनी त्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मात्र रामदास चौधरी यांनी वत्सलाबाई यांना दोन लाख रुपयांऐवजी एक लाख साठ हजार रुपये देऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर वत्सलाबाईच्या सांगण्यानुसार १९ एप्रिलला भंडारा-गोंदिया याठिकाणी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. अखेर १९ एप्रिलला रामदास चौधरी यांच्या पत्नी, मुलगा व मोठे जावई, मेव्हणे व वत्सलाबाई चौधरी असे सर्वजण खासगी वाहनाने धामणेवाडा (ता. गोंदिया) या ठिकाणी गेले. वत्सलाबाई यांनी पंचम भय्यालाल नगरे यांचे घरी नेले. त्याठिकाणी नियोजित वधू अपेक्षा हिला पाहिल्यानंतर मुलगा, मुलगीची पसंती झाल्यानंतर धार्मिक विधी करण्यात आला. आठ मेस पंचम नगरे व अन्य पाच ते सहा जण एरंडोल येथे आले. त्याच दिवशी वत्सलाबाई यांना रामदास चौधरी यांनी एक लाख रुपये रोख दिले व विवाह झाल्यानंतर उर्वरित ६० हजार रुपये देण्याचे ठरले. सर्वबोली बंधन झाल्यानंतर २५ मे २०२२ ला विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात युरियाचा 60 हजार मेट्रीक टन साठा : कृषी विभाग

१९ मेस वरपिता रामदास चौधरी हे मोठे जावई गोपाल चौधरी यांच्यासह धामणेवाडा येथे गेले असता पंचम नगरे यांच्या पत्नी एकट्याच घरी होत्या. त्यांनी पंचम नगरे व नियोजित वधू अपेक्षा ही नातेवाईकांकडे विवाह असल्यामुळे बाहेरगावी गेले असल्याचे सांगितले. मुलाचा विवाह ठरला म्हणून रामदास चौधरी व त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते. दीपकच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. विवाहसाठी रामदास चौधरी त्यांच्या पत्नी सुशीलाबाई चौधरी, वर दीपक चौधरी, नथ्यू चौधरी लग्नासाठी तिरोडा येथे आले. २४ मेस रामदास चौधरी, गोपाल चौधरी व नथ्यू चौधरी धामणेवाडा येथे पंचम नगरे यांच्या घरी गेले असता त्याठिकाणी कोणीही आढळून आले नाही. रामदास चौधरी यांनी आजूबाजूला चौकशी केल्यानंतर या ठिकाणी पंचम नगरे नावाची कोणीही व्यक्ती राहत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर रामदास चौधरी यांनी पंचम नगरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वत्सलाबाई यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. वत्सलाबाई चौधरी यांचेकडे एक लाख रुपयाची मागणी केली असता तिने पैसे देण्यास नकार देऊन धमकी दिली. रामदास चौधरी यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वत्सलाबाई तुकाराम चौधरी (रा. पारोळा), पंचम भैयालाल नगरे (धामणेवाडा, ता. जि. गोंदिया), अपेक्षा सुरेश परघरमोर (रा. वाडी, नागपूर) यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील तपास करीत आहेत. या कटामध्ये तळई (ता. एरंडोल) येथील एक खासगी वाहनचालकाचा देखील समावेश असून, यापूर्वी देखील त्याच्या मध्यस्थीने अनेकांची फसवणूक झाल्याचे समजते.

हेही वाचा: स्टीलच्या दरात हजार- पंधराशेने घट; बांधकाम क्षेत्राला दिलासा

Web Title: Cheating On Showing The Lure Of Marriage Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonmarriagefraud news
go to top