
Abhay Yojana : अभय शास्ती योजनेस मुदतवाढ जाहीर; ही आहे अंतिम तारीख...
जळगाव : महापालिकेतर्फे घरपट्टी थकबाकी (Arrears) वसुली करण्यासाठी ‘अभय शास्ती’ योजना लागू करण्यात आली. मंगळवारी (ता. २८) या योजनेचा अंतिम दिवस होता.
जनतेचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. (Commissioner Dr Vidya Gaikwad has extended the Abhay Shasti scheme till March 5 jalgaon news)
एमआयडीसीतील उद्योजकांनीही या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली, तर महापौर व नगरसेवकांनीही त्याबाबत अवाहन केले. त्यामुळे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी या योजनेस ५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या या योजनेस जनतेने प्रतिसाद दिल्याने या महिन्यात १६ कोटी ५० लाख रुपयांचा घरपट्टी कराचा भरणा झाला. शेवटच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी साडेसातपर्यंत नागरिक कर भरण्यासाठी प्रभाग समितीमध्ये गर्दी होती. तब्बल तीन कोटी ७० लाख रुपयांची वसुली झाली.
महापालिकेचे उपायुक्त गणेश चाटे यांनी सांगितले, की महापालिकेची गेल्या वर्षी ६० कोटी रुपयांची वसुली झाली. मात्र, या वर्षी शास्ती योजनेमुळे आजपर्यंत तब्बल ७२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मुदतवाढ दिल्याने या वसुलीत वाढ होण्याची शक्यता आहे. तब्बल ९२ कोटीपर्यंत ही वसुली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
उद्योजकांची मुदतवाढीची मागणी
शहरातील औद्यौगिक वसाहतीतील उद्योजकांनाही याचा फायदा झाला आहे. अनेकांना चार ते पाच लाख रूपयांपर्यंत शास्ती माफी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे उपायुक्त चाटे यांनी सांगितले, ते म्हणाले, हा फायदा लक्षात घेवून एमआयडीसीतील तब्बल १३ असोशिएशनच्या प्रतिनिधीनी पत्र देवून मुदतवाढ करण्याची मागणी केली आहे.
लाभ घेण्याचे आवाहन
नागरिक, महापौर, नगरसेवक व उद्योजकांनी केलेली मागणी लक्षात घेऊन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ‘अभय शास्ती’ योजनेची मुदत ५ मार्चपर्यंत वाढविली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.