
जळगाव : अनुकंपा पदभरतीचा पुन्हा जॅकपॉट
जळगाव : जिल्हा परिषदेच्या(zilha parishad jalgaon ) अनुकंपा भरतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागत आहे. आठवडाभरापूर्वी समुपदेशनाद्वारे झालेल्या अनुकंपा भरतीनंतर पुन्हा भरतीचा जॅकपॉट लागला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शंभर जणांची भरती केली जाणार आहे. यासाठी कागदपत्र तपासणीला सुरवातदेखील झाली आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या विभागांमध्ये कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचारींच्या वारसांना अनुकंपेवर भरती केले जात असते. परंतु, मागील आठ-दहा वर्षांपासून अनुकंपेची भरती प्रक्रिया झाली नसल्याने जवळपास साडेतिनशेहून अधिक उमेदवार प्रतीक्षा यादीत होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी हा प्रश्न मार्गी लावत गेल्या आठवड्यातच ८७ जणांच्या समुपदेशनाद्वारे नियुक्ती दिली आहे. यानंतर पुन्हा शंभर उमेदवारांची भरती करून प्रतीक्षा यादी कमी करण्याचा प्रयत्न सीईओ डॉ. आशिया यांचा आहे.
महिनाअखेरपर्यंत प्रक्रिया
शासन नियमानुसार यंदा २० टक्के अनुकंपा धारकांना नोकरी देण्यात आली आहे. यानंतर जिल्हा परिषदेतंर्गत रिक्त पदांच्या २५ टक्के अनुकंपा भरती करावयाची आहे. त्यानुसार शंभर रिक्त जागा या अनुकंपेद्वारे भरल्या जातील. याची तयारी सध्या जिल्हा परिषदेत सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे- पवार यांनी सांगितले.
कागदपत्र तपासणी
अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या साडेतीनशे उमेदवारांपैकी शंभर जणांची शासकीय नोकरीची प्रतीक्षा संपणार आहे. यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीला आजपासून (ता. २१) सुरवात झाली आहे. ही पडताळणी लवकर पूर्ण करून पुढील प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे.