
कोरोना द्विवर्षपूर्ती... : लॉकडाउन सक्ती... ते कोरोनामुक्ती
दोन वर्षांपूर्वी २८ मार्चला (२०२०) जळगाव जिल्ह्यात व खानदेशातही पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला. नवीन महामारीमुळे पहिल्या वर्षीचा अनुभव कटू होता. मात्र, गेल्यावर्षी याच काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडविला. ऑक्सिजन बेड, रेमडेसीव्हीर, टॉसलीझुमॅबसारख्या औषधींचा तुटवडा, अंत्यसंस्कारासाठी रांग, अगदी स्मशानभूमीला ‘लॉक’ लावण्याइतपत विदारक दृश्य आपण अनुभवले.. सुदैवाने वर्षभरापूर्वी लॉन्च झालेल्या व प्रभावी ठरलेल्या देशातील कोविडविरोधी लशीने ‘डॅमेज कंट्रोल’ केले, आणि तिसरी लाट केवळ थोपवून धरली नाही तर परतावून लावली.. आतापर्यंतच्या जवळपास ८० टक्के लसीकरणाने कोरोनामुक्तीचे सकारात्मक चित्र निर्माण झालेय.
महामारीची दहशत.. लॉकडाउनची धास्त
जगभरात, देशात व पर्यायाने राज्यातही पसरलेल्या कोरोनाने गेल्या दोन वर्षांत लाखो बळी घेतले.. जळगाव जिल्हाही त्याला अपवाद ठरला नाही. जळगावात २८ मार्च २०२० या कोरोनाचा पहिला पहिला रुग्ण सापडण्याच्या आधीच देशभरात लॉकडाऊन (२४ मार्च) सुरू झाले होते. कोरोनासारख्या नवख्या आजारावर उपचार, औषधी नाही.. त्यामुळे जगातील चित्राप्रमाणे देशात लॉकडाऊन लागले. इतिहासात प्रथमच रेल्वे बंद होण्याची वेळ.. जीवनावश्यक वस्तू अन् सेवा वगळता सर्वच बंद.. आपल्या घरात आपण कैदी, अशी स्थिती. लॉकडाऊनमुळे बंद पडलेली वाहतूक व्यवस्था, गावाकडे निघालेले स्थलांतरित मजूर.. हे चित्र बघताना त्यांना मदत करणारे लाखो हात, समर्पितपणे सेवा देणारी आरोग्य यंत्रणा, दिवस-रात्र उभे राहणारे पोलिस, जवानांची कर्तव्यकठोरता या सकारात्मक चित्रांची दखल न घेणे कृतघ्नता ठरेल.
दुसऱ्या वर्षात बदलले चित्र
गेल्यावर्षी कोरोनाच्या वर्षपूर्तीचा आढावा घेताना आम्ही ‘आता कोरोनासोबत जगायचे..’ या मथळ्याखाली विश्लेषण केले. कारण, मार्चमध्ये जळगावात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर वर्षभरात एकूण रुग्णांची संख्या जवळपास लाखापर्यंत व मृतांचा आकडा पंधराशेपर्यंत पोचला.. मात्र, गेल्या वर्षी जानेवारीतच कोरोनाविरोधी दोन लशी (कोविशील्ड व कोव्हॅक्सीन) लॉन्च झाल्यानंतर आशेचा किरण दिसला. अर्थात, लोकसंख्येच्या तुलनेत लशींच्या मर्यादित उत्पादन व लसीकरणाच्या यंत्रणेच्या मर्यादेनेही कोरोनाचा धोका कायम होता.
दुसऱ्या लाटेमुळे धडकी
गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२१मध्येच देशात, राज्यात दुसऱ्या लाटेने धडक दिली. जळगाव जिल्ह्यातही फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून रुग्ण झपाट्याने वाढू लागले. मार्चमध्ये रुग्णसंख्येचा ‘पीक’ आला. नव्या डेल्टा व्हेरिएंटने आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना निष्प्रभ ठरवले. दररोजची वाढती रुग्णसंख्या व मृत्यूचे आकडे धडकी भरविणारे ठरले.
सर्वाधिक रुग्ण, मृत्यू
कोरोनाच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंतच्या एकूणच वाटचालीत जळगाव जिल्ह्यात सर्वांत वाईट महिना म्हणून मार्च व एप्रिल २०२१चा उल्लेख करावा लागेल. या एका एप्रिल महिन्यात नवीन ३ हजार ९८६ रुग्णांची नोंद झाली आणि महिनाभरात तब्बल ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील हा सर्वांत भीषण काळ. मे महिन्यापर्यंत ही लाट कायम होती, ती जूनपासून ओसरू लागली.
स्मशानभूमीला लागले लॉक
दुसऱ्या लाटेत मार्च व एप्रिल महिन्यात सर्वांत जास्त मृत्यू झाले. जळगाव शहरात आणि ग्रामीण भागातील मिळून साडे पाचशेपेक्षा अधिक मृत्यूची नोंद या एका महिन्यात झाली. मार्च महिन्यात एका दिवसांत सर्वाधिक २८ मृत्यूची नोंदही झाली. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्याचे चित्र याच महिन्यात पाहायला मिळाले. २५ मार्च २०२१च्या रात्री जळगावच्या नेरीनाका स्मशानभूमीचे प्रवेशद्वार ‘लॉक’ करण्याची वेळ आली.
लसीकरणाने निर्माण झाली आशा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च ते जून २०२१ या तीन महिन्यांत हाहाकार उडविल्याचा विदारक अनुभव आहेच.. मात्र, त्यानंतरच्या काळात लसीकरणाचा वेग वाढल्याने चित्र बदलले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘पीक’ येऊन गेल्यानंतर ती ओसरू लागली. जुलै २०२१मध्ये ती पूर्ण आटोक्यात आली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये संसर्ग अगदीच प्रभावहीन ठरला. मात्र, लाट ओसरण्याच्या प्रभावाबरोबरच लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
गेल्या वर्षभरातील स्थिती अशी
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ लाख ६ हजार २८९ चाचण्या झाल्या. त्यापैकी ६२हजार ५१०वर रुग्ण आढळून आले. वर्षभरात ९६६ रुग्णांचा मृत्यू होऊन कोरोनामुळे आतापर्यंत बळी पडलेल्यांचा आकडा २५९१वर गेला.
तिसरी लाट थोपवली
सुरवातीच्या काळात लस उत्पादन, उपलब्धता मर्यादित होती. नंतरच्या टप्प्यात लशींचे उत्पादन वाढले, उपलब्धता वाढू लागली. नागरिकांमध्ये यंत्रणेने केलेल्या जागृतीचा चांगला परिणाम होऊन लोक लसीकरणासाठी रांगा लावू लागले. जगभरात तिसरी, चौथी लाट आली तशी नव्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटने भारतातही धोका निर्माण केला. मात्र, लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना ‘ओमिक्रॉन’चा त्रास होणार नाही, असे संशोधन समोर आले. जळगाव जिल्ह्यात गेल्या जानेवारीत तिसरी लाट सुरू झाली. अर्थात, तिला लाट म्हणावे काय? हा प्रश्न आहे. मात्र, तोवर ७० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाल्यामुळे ही लाट थोपवली गेली जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, म्हणजे तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात केवळ १४ मृत्यूची नोंद आहे.
Web Title: Corona Completes Two Years Lockdown Face To Release Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..