
‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध लागू केले असून, शनिवार व रविवार असा दोन दिवस पूर्ण लॉकडाउन जारी केला आहे.
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लादले असून, त्यातील नियमांचे पालन करण्याच्या शर्यतीत अनेक ‘स्पीडब्रेकर’ आहेत. प्रशासन निर्बंध कठोर करून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देत आहे. मात्र, हे नियम पाळण्यासाठी मिळणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे.
जळगाव जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. जिल्ह्यातही रोज हजार-बाराशेवर रुग्ण आढळून येत असून, मृत्यूचे सत्रही थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मंगळवार पासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध लागू केले असून, शनिवार व रविवार असा दोन दिवस पूर्ण लॉकडाउन जारी केला आहे.
निर्बंध अनेक, सुविधा शून्य
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी राज्य शासनाच्या आदेशांसोबत स्थानिक पातळीवरील सूचनांची जोड देत आदेश जारी केले. त्यात अनेक निर्बंध लादले आहेत. सोबत नियमांचे पालन, त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना आहे. मात्र, नियम पाळण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत, अशी स्थिती आहे.
असे नियम, अशा अडचणी
-मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड
दंड आकारणारी यंत्रणा नाही, ज्यांच्याकडे खायला काही नाही. त्यांनी दंड कसा भरावा?
-४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण अनिवार्य
पुरेशा लसींअभावी लसीकरण थंड बस्त्यात, बुधवारी अनेक केंद्रांवर लसीकरणच झाले नाही.
-लसीकरण नसल्यास हजार रुपये दंड.
-खासगी केंद्रांवर २५० रुपये भरूनही लस नाही.
-कारमध्ये एक व्यक्तीलाही मास्क अनिवार्य.
या भलत्याच नियमाबाबत आश्चर्यच व्यक्त होतेय
-लग्नसोहळ्यांत २० जणांची मर्यादा
आता हे २० जण कोणते, ते शासनाने सांगावे.
-लग्नसोहळ्यात येणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ अनिवार्य
या चाचणीचा खर्च कोण करणार, पाहुणे की आयोजक?
-कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नसेल, तर हजार रुपये दंड
अशी जाचक अट असेल तर लग्नाला कोण येणार?
-मार्केट कमिटीत गर्दी व्हायला नको
या गर्दीवर कधीच नियंत्रण नसते, तेथे लक्ष देणारी यंत्रणाच नाही
संपादन- भूषण श्रीखंडे