दिलासा देणारी बातमी; चाचण्या घटल्या, रुग्णसंख्या देखील झाली कमी ! 

सचिन जोशी
Wednesday, 6 January 2021

एकूण रुग्णसंख्या ५६ हजार १२४वर पोचली. तर ४१ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ३१७ एवढा झाला आहे.

 जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून आठवडाभरात चारशे रुग्णांची भर पडल्यानंतर बुधवारी रोजच्या आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत काहीशी घट झाली. दिवसभरात ३५ नवे रुग्ण आढळून आले, मात्र तुलनेत चाचण्याही कमी झाल्याने रुग्णसंख्या घटल्याचे दिसून येते.

आवश्य वाचा-  नाव न घेता एकनाथ खडसे - गिरीश महाजनांची ‘तीरंदाजी’ तीव्र !

जळगाव जिल्ह्यात जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाचा संसर्ग उच्च पातळीवर होता. सप्टेंबरनंतर तो कमी होऊ लागला. तीन- चार महिन्यांत रुग्णसंख्या झपाट्याने घटली. मात्र, गेल्या आठवडाभरात पुन्हा काही प्रमाणात रुग्ण वाढू लागले. 

चाचण्या घटल्या 
आठवडाभरात चाचण्या हजारांच्या आत राहिल्या. तरीही रुग्णसंख्या ५० पेक्षा जास्त आढळून येत होती. बुधवारी अवघ्या सातशे चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले, त्यातून ३५ नव्हे रुग्ण समोर आले. एकूण रुग्णसंख्या ५६ हजार १२४वर पोचली. तर ४१ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ३१७ एवढा झाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी दोघांचा बळी गेला, त्यामुळे बळींचा आकडाही १३३३ वर पोचला आहे. 

आवर्जून वाचा- खड्यांचा 'बर्थडे' तो ही चक्क केक कापून; कुठे? वाचा सविस्तर 
 

जळगाव शहरास दिलासा 
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात वीसपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. आज त्यात थोडा दिलासा मिळाला. शहरात अवघे ८ रुग्ण सापडले. तर भुसावळला ७, अमळनेर ५, एरंडोल, चोपडा, पाचोरा, जामनेर, रावेर तालुक्यात प्रत्येकी २, जळगाव ग्रामीण, भडगाव, यावल, पारोळा तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona marathi news jalgaon tests number patients less comforting news