आनंदाची बातमी ! जिल्ह्यात ‘कोव्हिशील्ड’च्या २४ हजार लसी दाखल 

देविदास वाणी
Wednesday, 13 January 2021

कोविड लसीकरणाबाबतची रंगीत तालीमही झाली आहे. शंभर जणांवर जिल्ह्यात चार ठिकाणी रंगीत तालीम झाली होती. १६ पासून प्रत्यक्षात लसीकरणास सुरवात होणार आहे.

 जळगाव ः कोरोना महामारीवर उपाय म्हणून कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती भारतात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरवात होणार आहे. प्रथम आरेाग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल. त्यासाठी जिल्ह्यात २४ हजार ३२० ‘कोव्हिशील्ड’ व्हॅक्सिन लसी बुधवारी (ता. १३) रात्री किंवा गुरुवारी (ता. १४) पहाटे पोचणार आहेत. 

आवश्य वाचा- नाथाभाऊंना थांबविण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले ! त्यांनी पक्ष सोडणे हे आमच्यासाठी दुःखदायक

 

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरवात होणार आहे. सुरवातीस नऊ केंद्रांवर लसी देण्यात येतील. गेल्या शुक्रवारी (ता. ८) कोविड लसीकरणाबाबतची रंगीत तालीमही झाली आहे. शंभर जणांवर जिल्ह्यात चार ठिकाणी रंगीत तालीम झाली होती. १६ पासून प्रत्यक्षात लसीकरणास सुरवात होणार आहे. त्याबाबत मंगळवारी (ता. १२) नऊ केंद्रांवरील लसीकरणासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण जिल्हा रुग्णालयात देण्यात आले. बुधवारी (ता. १३) जिल्हा रुग्णालयात लसीकरणाबाबत मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागातर्फे व्हीसी झाली. त्यात जळगावमधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद सहभागी झाले होते. 

जिल्ह्यात अगोदर आरोग्य विभागातील १४ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. नंतर पोलिस, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

वाचा- ओव्हरटेक करतांना अचानक समोर आला डिव्हायडर; पण दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

 

ही ठिकाणे असतील लसीकरणाची 
तीन उपजिल्हा रुग्णालये : जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, तीन ग्रामीण रुग्णालये : भुसावळ, चाळीसगाव, पारोळा, तीन जळगाव शहरात : जिल्हा रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय (पंचमुखी हनुमान मंदिरामागे), भिकमचंद जैन रुग्णालय (शिवाजीनगर, जळगाव). 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona marathi news jalgaon vaccine corona vaccine filing