अरेच्चा ! जळगाव जिल्ह्यातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला दिला नकार

देविदास वाणी
Wednesday, 20 January 2021

दिवसभरात ६३ जणांनी लसीकरण करून घेतले. दिवसभरात सुमारे २० डॉक्टर्ससह आरोग्य यंत्रणेतील ६३ जणांनी लस घेण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया पूर्ण केली.

जळगाव : जिल्ह्यात शनिवार पासून कोविड लसीकरणास सुरवात झाली होती. मंगळवारी दुसरा दिवस असल्याने सात केंद्रांवर सातशे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन होते. मात्र ४५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगत लस टोचून घेण्याचे टाळले आहे. 

कोरोना लस जिल्ह्यात उपलब्ध झाल्यानंतर प्रथम आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफला लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या शनिवारी पहिल्या दिवशी ३७ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरणास नकार दिला होता. आरोग्य कर्मचारी कोरोना काळात अग्रभागी होते. यामुळे शासनाने प्राधान्याने त्यांना अगोदर लस देण्याचा निर्णय घेतला.

कारणे दाखवून लस घेण्यासाठी दिला नकार..

मात्र ३७ टक्के कर्मचाऱ्यांनी या-ना त्या कारणांनी लस घेणे टाळले. मंगळवारी दुसऱ्या दिवशी सर्वच आरोग्य कर्मचारी लस घेतील, असा अंदाज होता. मात्र ७०० पैकी ३३० जणांनी लस टोचून घेतल्याचे चित्र सायंकाळी चारपर्यंत होते. जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शिवाजीनगरातील जैन रुग्णालय, चोपडा, जामनेर उपजिल्हा रुग्णालय, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २४ हजार ३२० लसींचे डोस आले आहेत. 

आरोग्य यंत्रणेतील ३६ जणांचा सहभाग
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक यांनी उत्साह दाखविला. दिवसभरात ६३ जणांनी लसीकरण करून घेतले. दिवसभरात सुमारे २० डॉक्टर्ससह आरोग्य यंत्रणेतील ६३ जणांनी लस घेण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine marathi news jalgaon forty five percent employees denial vaccinated