esakal | जळगावात तहसीलदाराला धक्काबुक्की करत चालकाला बेदम मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

जळगावात तहसीलदाराला धक्काबुक्की करत चालकाला बेदम मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारोळा (जळगाव): येथील तहसीलदार अनिल गवांदे यांना अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने आणि मालकाने धक्काबुक्की करून त्यांच्या वाहनचालकास मारहाण केली. ही घटना ता. १५ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शिवले नाल्याजवळ घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून वाळु वाहतुक करणाऱ्यांची दबंगगिरी वाढली असल्याचे दिसत आहे. याबाबत पोलिसात ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा गावाच्या पुढे हायवे रोडवरील पेट्रोल पंपाच्या समोर एक निळ्या रंगाचा विना नंबर ट्रॅक्टर अनधिकृत १ ब्रास नेत होता त्याबद्दल तहसीलदार कारवाई करीत होते. त्यावेळी ट्रॅक्टरवरील चालक तसेच ट्रॅक्टर मालक बापु महाजन (रा. उंदिरखेडा) यांनी शासकीय कामात अडथळा आणला तसेच तहसीलदाराला धक्काबुक्की करुन शासकीय वाहनावरील चालक कैलास माळी यास चापटा बुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

हेही वाचा: 'डिजिटल इंडिया'च्या फक्त जाहिराती! केवळ १७६ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट

तहसीलदारांसोबत असलेले त्यांचे सहकारी महेंद्र मुरलीधर पाटील, तलाठी शिवरे दिगर, प्रविण परशुराम शिंदे तलाठी बहादरपुर यांनी ट्रॅक्टर चालकाला आणि मालकाला अडविण्यास प्रयत्न केला. त्यावेळीस ट्रॅक्टर चालकाने आणि मालकाने, आमचा पाठलाग केला तर तुम्हाला ह्याच ट्रॅक्टर खाली दाबून देईल, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत सांगितले. याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

loading image