‘संचार’ नसलेल्या वेळेत वांझोटी ‘बंदी’; ना बंदोबस्त ना तपासणी 

सचिन जोशी
Saturday, 6 March 2021

मुळात, जळगाव शहर काही ‘मेट्रो’ शहर नाही. नेमक्या याच वेळेत संचारबंदी का जारी करण्यात आली? हा प्रश्‍नच आहे.

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू केली खरी.. मात्र, नागरिक घरात असताना रात्री दहा ते पहाटे पाच या संचार नसलेल्या वेळेत ‘बंदी’चा आदेश का काढला? याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. या काळात ना कुठे बंदोबस्त, ना तपासणी अशी स्थिती असताना परिणाम शून्य असलेली ही संचारबंदी वांझोटी ठरत आहे. 

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण नव्याने वाढू लागले. लग्न सोहळे, अन्य कार्यक्रमांनी संसर्ग वाढल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला. त्यामुळे या कार्यक्रमावर निर्बंध घालताना जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यात रात्रीची संचारबंदीही २२ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान जारी केली. 

पहिल्याच दिवशी तपासणी 
रात्रीच्या संचारबंदीची वेळ दहा ते पहाटे पाच अशी आहे. मुळात, जळगाव शहर काही ‘मेट्रो’ शहर नाही. त्यामुळे या वेळेत नागरिक घराबाहेर फार मोठ्या संख्येने नसतातच. तरीही नेमक्या याच वेळेत संचारबंदी का जारी करण्यात आली? हा प्रश्‍नच आहे. बरं, बंदी लागू केल्यानंतर केवळ पहिल्याच दिवशी २२ फेब्रुवारीला जळगाव शहरातील चौकात, रस्त्यांवर पोलिस तपासणी करताना दिसले. त्यानंतर ही यंत्रणा गायब झाली ती, अद्याप रस्त्यावर दिसायला तयार नाही. 

रस्ते सामसूम, संचार सुरू 
गर्दीच्या वेळी संचारबंदी गरजेची असताना नागरिक घरी जाऊन झोपल्यानंतरच्या वेळेत संचारबंदीचा आढावा घेतला असता असेही या वेळेत रस्त्यांवर अगदीच तुरळक लोक दिसले. अर्थात, तेदेखील का फिरताय, हे विचारणारी पोलिस यंत्रणा रस्त्यावर नव्हती. रस्ते सामसूम होते, मात्र काही वाहनांचा ‘संचार’ सुरूच होता. 

सायंकाळी सातपासून गरजेची 
कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही सध्या दिवसभर बाजारपेठेत तसेच सायंकाळी सात ते नऊ यावेळेत खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असते. संसर्ग टाळायचाच असेल आणि संचारबंदी लावायचीच असेल, तर ती दिवसभर लावणे शक्य नसले तरी सायंकाळी सातपासून लावण्याची गरज आहे. गर्दी नसताना संचारबंदीची गरजच काय, हे प्रशासनाला समजत नाही काय? असा प्रश्‍नही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: curfew marathi news jalgaon curfew rules not enforced citizens administration