
साहेब कामावर, कर्मचारी संपावर
जळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. अधिकारी कामावर मात्र कर्मचारी संपावर असे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयासह, तहसिलदार, प्रांताधिकारी कार्यालयात पाहावयास मिळत आहे. संपाचा शुक्रवारी (ता. ८) पाचवा दिवस होता. संपकाळात पन्नास लाखांचे नुकसान महसूल विभागाचे झाले आहे. संप चिघळला असून नागरिकांचे मात्र हाल होत आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेप्रमाणे गुरुवारी (ता. ७) नाशिक विभागीय महसूल आयुक्तांशी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. मात्र मागण्या मान्य करणार असेल तर चर्चा करू, आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता. तो आजही कायमच आहे. आंदोलनात महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, शिपाई संवर्गातील कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. सर्वच शासकीय कामे ठप्प झाल्याने नागरिकांच्या फेऱ्या वाया जात आहेत. जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा महसूल वाहनचालक संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
Web Title: Department Of Revenue Officers At Work Staff Strike Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..