Jalgaon Airport : विमानतळाची धावपट्टी सतराशे मीटर करण्याचे प्रस्तावित; प्रवासी सेवा अधांतरीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon airport authority

Jalgaon Airport : विमानतळाची धावपट्टी सतराशे मीटर करण्याचे प्रस्तावित; प्रवासी सेवा अधांतरीच

जळगाव : विमानतळाची देखभाल- दुरुस्ती डोईजड झाल्यामुळे प्राधिकरणाने इथून गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २) विमानतळ (Airport) प्राधिकरण समितीची बैठक झाली. (Discussion regarding expansion of airport runway to 17 hundred meters and commencement of passenger services airport jalgaon news)

खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बैठकीत आढावा घेतला. त्यात विमानतळाची धावपट्टी सतराशे मीटरपर्यंत वाढविण्यासह प्रवासी सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली.

खासदार उन्मेष पाटील यांनी बैठकीनंतर त्यासंदर्भात माहिती दिली. ‘उडान’ योजनेंतर्गत जळगावात विमानतळ सुरू करण्यात आले. त्यानंतर जवळपास १५ हजारांवर प्रवाशांनी जळगाव-अमदाबाद-मुंबई असा प्रवास केला.

मात्र, तेव्हा सेवा देणारी ट्रू-जेट कंपनी अवसायनात निघाल्याने सेवा बंद पडली. त्यानंतर विविध वेळी सेवा देण्यासंदर्भात प्रयत्न झाले. दोनदा निविदाही निघाल्या. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रवासी विमानसेवा सुरू होऊ शकली नसल्याचे खासदार पाटील म्हणाले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

सुविधांमुळे प्रशिक्षण केंद्र

विमानतळावर सर्व पायाभूत सुविधांसह नाईट लॅन्डींगचीही सुविधा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र जळगावात सुरू होऊ शकले, असा दावा खासदारांनी केला. आता या विमानतळावरील धावपट्टीची लांबी सातशेवरून सतराशे मीटरपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

दरम्यानच्या काळात प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात कंपनी व उद्योजकांमध्ये चर्चा घडवून आणली जाईल, असे ते म्हणाले. विमानतळाच्या विस्तारामुळे नशिराबाद-उमाळा रस्ताच बंद असल्याने ग्रामस्थांनी त्याबाबत निवेदन दिले आहे. ग्रामस्थांना पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने तो रस्ताही उपलब्ध करून देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. बैठकीस विमानतळ प्राधिकरण समितीचे सदस्य भरत अमळकर, प्रेम कोगटा आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonAirport