सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार ; ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करणार

देविदास वाणी
Wednesday, 2 December 2020

येत्या सोमवारपासून (ता.८) शाळा सूरू करण्यात येणार आहे. त्यातही केवळ ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करता येणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला आदेश काढून कोरोना संदर्भात काय दक्षता घ्यावी याची सूचना दिलेल्या आहेत. 

जळगाव : कोरोना संसर्गापासून बचाव करीत येत्या ८ डिसेंबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी आदेश काढले आहेत. शिक्षण विभागाला आदेश देवून शाळांमध्ये कोरोना संसर्गापासून बचावापासून शाळांची स्वच्छता करण्यासह जंतूनाशकाची फवारणी, सामाजिक अंतर राखत बैठक व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय समिती व पालक शिक्षक समितीच्या बैठका घेवून पालकांना संमतीपत्र देण्याविषयी मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात २३ नोव्हेंबरलाच शाळा सूरू होणार होत्या. मात्र कोरोनाचे वाढते रुग्ण, पालकांचा विद्याथर्यांना शाळेत पाठविण्यास नकार पाहता आठ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राउत यांनी घेतला होता. आता येत्या सोमवारपासून (ता.८) शाळा सूरू करण्यात येणार आहे. त्यातही केवळ ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करता येणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला आदेश काढून कोरोना संदर्भात काय दक्षता घ्यावी याची सूचना दिलेल्या आहेत. 

जिल्हयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करावयाचे आहे. शाळा स्तरावर शाळा समिती व पालक शिक्षक संघ यांची सभा घ्याव्यात. ९ वी ते १२ पर्यंत शिकविणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यात पॉझिटीव्ह आढळलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विलगीकरणात ठेवण्यात यावे.

पाल्यांनी शाळेत येणेबाबत वर्गशिक्षकांनी पालकांचे संमती पत्रक घेतले आहेत, याची खात्री करावी. शाळेची स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे. जंतूनाशक, साबन, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता करून घेण्यात आली आहे, याची खात्री करावी. विदयार्थ्यांची बैठक व्यवस्था सुरक्षित अंतर ठेवून केल्याची खात्री करावी, असे आदेश करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे ८ डिसेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सूरू करता येतील. त्या अनुषंगाने शाळांना सूचना दिलेल्या आहेत. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी उपाय योजनाही करण्यास सांगितल्या आहेत. त्याची पाहणी लवकरच केली जाणार आहे. 
- भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector Abhijeet Raut has issued orders that school bells will ring from Monday