Jalgaon : मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेत अन्य आठ तालुक्यांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon : "मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेत अन्य आठ तालुक्यांचा समावेश"

Jalgaon : "मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेत अन्य आठ तालुक्यांचा समावेश"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे ७ जुलै २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये सदर योजनेचे लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यांच्या प्लॅस्टिक व अन्य साहित्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम अनुदान स्वरूपात मिळणार आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास राज्यामार्फत पूरक अनुदान दिले जाणार आहे. त्याअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. हरितगृह आणि शेडनेट हाऊस उभारण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार आहेत.

योजनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर या सात तालुक्यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर, उर्वरित आठ तालुक्यांचाही यात समावेश व्हावा म्हणून पालकमंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला. या अनुषंगाने ७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबत मंत्री पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील उर्वरित ८ नवीन तालुक्यांचा या योजनेत अंतर्भाव करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला होता. याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली होती. आता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने शासन निर्णय जारी करून मान्यता दिली आहे. यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, धरणगाव, भुसावळ, रावेर, बोदवड, यावल, चोपडा, भडगाव या तालुक्यांनाही मुख्यमंत्री कृषी शाश्‍वत सिंचन योजनेला मान्यता मिळाली आहे.

"शेतकरी हा आपल्या समाजाचा केंद्रबिंदू आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून मुख्यमंत्री शाश्‍वत योजना हा याचाच एक भाग आहे. या योजनेचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा."

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

loading image
go to top