District Bank Election : जिल्हा बँकेत कॉंग्रेसचे आघाडीलाच मतदान; प्रदीप पवार, आमदार चौधरींचा पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Bank

District Bank Election : जिल्हा बँकेत कॉंग्रेसचे आघाडीलाच मतदान; प्रदीप पवार, आमदार चौधरींचा पलटवार

जळगाव : जिल्हा बँकेत कॉंग्रेसच्या तीन संचालकांनी गद्दारी केल्याचा आरोप चुकीचा आहे. आमच्या संचालकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान केले आहे. (Eknath Khadse is trying to defame Congress to cover his reputation Congress counterattack district president Pradeep Pawar and MLA Shirish Chaudhary jalgaon news)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे आपली प्रतिष्ठा झाकण्यासाठी कॉंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा पलटवार कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या संचालकांनी महाविकास आघाडीशी गद्दारी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. त्यानंतर कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले, की जिल्हा बँकेत सत्तेचे जे सूत्र ठरले आहे त्याचप्रमाणे व्हावे अशी आमची इच्छा होती.

असे असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला विश्‍वासात न घेता केवळ संचालकांना बैठकीला बोलावले होते. त्यामुळे आम्ही आमच्या तीनही संचालकांना कॉंग्रेस भवनात बोलावून घेतले होते. त्यानंतर आमदार खडसेंचा आम्हाला फोन आला आणि आम्ही जिल्हा बँकेत गेलो.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण


त्याठिकाणी शेवटचे दोन वर्ष कॉंग्रेसचा उपाध्यक्ष करण्यावर सहमती झाली. तसेच, राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी ॲड. रवींद्र पाटील यांचे नाव निश्‍चीत केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीतच इच्छुकांची संख्या वाढल्याने नेमके कोण फुटले? याचे आत्मपरिक्षण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले पाहिजे, असा टोलाही पवार यांनी लगावला.

मित्र पक्षाची बदनामी करू नका : आमदार चौधरी

आम्ही महाविकास आघाडीचे मित्र पक्ष आहोत. त्यामुळे केवळ आमचे संचालक फुटले म्हणून बदनामी करणे योग्य नाही. असे मत व्यक्त करून आमदार शिरीष चौधरी म्हणाले, की आमदार खडसेंना यापुढे आघाडी टीकवायची नाही असे दिसून येत आहे. पत्रकार परिषदेस जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, शैलजा निकम, गोंडू महाजन, प्रभाकर सोनवणे, जमील शेख, ज्ञानेश्‍वर कोळी, विकास निकम आदी उपस्थित होते.