एकनाथ खडसेंनी रखडलेल्या कामांची पाहणी केली; आणि कामाला मुहूर्त गवसला !

एकनाथ खडसेंनी रखडलेल्या कामांची पाहणी केली; आणि कामाला मुहूर्त गवसला !

भुसावळ : पालिकेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरण कामांचे १२ ऑक्टोबरला भूमिपूजन झाले होते. त्यानंतर चार महिन्यांचा कालावधी उलटूनही एकाही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे भुसावळकरांना खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेता, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भेट देऊन रस्त्यांची पाहणी करून, बंद पडलेल्या कामास गती देण्याच्या सूचना केल्या. 

पालिकेकडे १७ कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. या निधीतून पाच कोटींच्या निधीतील रस्त्यांना सप्टेंबर महिन्यात वर्कऑर्डर देण्यात आली होती. वर्कऑर्डरनंतरही काम रखडल्याची ओरड झाली. त्यामुळे १२ ऑक्टोबरला सतारे भागात माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे आदींच्या उपस्थितीत रस्ते कामाचे भूमिपूजन झाले होते. त्या रस्त्यांचे अद्यापही डांबरीकरण न झाल्याने ते केव्हा होईल, असा प्रश्न भुसावळकरांना पडला आहे.

पंधरा दिवसात काम बंद

सतारे भाग ते टेक्निकल हायस्कूलपर्यंतचा रस्ता, न्यायालयाच्या मागील रस्ता, टिंबर मार्केट ते स्वामी समर्थ केंद्र व गडकरीनगरातील एक अशा एकूण चार रस्त्यांचे काम सुरू झाले. मात्र अवघ्या ८ ते १५ दिवसांतच ही कामे बंद झाली. ऑक्टोबर अखेरपासून बंद असलेली कामे चार महिने उलटूनही ठप्प आहेत.

तक्रारीवरून खडसेने पाहणी केली

रस्त्यांच्या संदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेता श्री. खडसे यांनी भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली. तसेच महिनाभरात कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला भुसावळात येऊन पाहणी करणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा. सुनील नेवे, वसंत पाटील, प्रमोद नेमाडे, रमेश मकासरे, ॲड. बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे आदी उपस्थित होते. 

या रस्त्यांचे काम रखडले : 
लाइफ केअर हॉस्पिटल ते महात्मा गांधी पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा ते सुभाष पोलिस चौकी, मॉडर्नरोड-गांधी चौकी-सराफ बाजार-मोठी मशीद, मरीमाता मंदिर-अप्सरा चौक ते नृसिंह मंदिर मिरवणूक मार्ग, जवाहर डेअरी ते पाच नंबर शाळा, गंगाराम प्लॉट ते भवानी पेठ जामनेर रोड मार्ग, मातृभूमी चौक-रिंगरोड-विवेकानंद हायस्कूल मार्ग हायवेपर्यंतचा मार्ग, मातृभूमी चौक ते नेब कॉलनी, जामनेररोड ते नेब कॉलनी हायवेपर्यंत, सिंधी कॉलनी प्रवेशद्वार ते हौसिंग सोसायटीपासून हायवेपर्यंत, नवशक्ती ऑर्केड ते टीव्ही टॉवर केळकर हॉस्पिटलमार्गे हनुमाननगर ते महामार्गापर्यंत, नवशक्ती आॅर्केड ते श्रीरामनगर, दत्तनगर ते महामार्गापर्यंत, चांदवाणी चौक, बद्री प्लॉट, नंदनवन कॉलनी, चमेलीनगर, श्रीरामनगर भाग तसेच देव कॉम्प्लेक्स ते व्यंकटेश मंदिर दगडी पूल, टिंबर मार्केट, अमरदीप चौक ते भजेगल्लीमार्गे सराफ बाजार, शनिमंदिर वॉर्ड ते काझी प्लॉट पापानगर ते रजा चौकापर्यंत, भोईनगर चौक, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी नगरपालिका हद्दीपर्यंत, यावलरोड ते श्री गजानन महाराजनगर ते पवननगरपर्यंत, जळगाव रोड प्रभाकर हॉलचा रस्ता थेट कोटेचा विद्यालयापर्यंत, टेक्निकल हायस्कूल ते कोटेचा महाविद्यालय परिसर असे ३२ किमी रस्त्यांचे काम रखडले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com