
Eknath Khadse | डॉ. आबेंडकरांचा पुतळा हलविण्यामागे जमिनीचा व्यवहार : एकनाथ खडसे
जळगाव : जिल्हा रूग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हलविण्यामागे त्या ठिकाणच्या जमिनीचा २०० कोटींचा व्यवहार करण्याचा हेतु होता.
याला एका राजकीय नेत्याचे पाठबळ असून, त्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. (eknath khadse statement about Dr Ambedkar statue move jalgaon news)
जिल्हा रूग्णालयासमोरील मोकळ्या जागेत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रात्रीतून हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जनतेने विरोध केल्यामुळे त्यांचा प्रक्षोभ पाहून अखेर तो पुतळा पुन्हा त्या ठिकाणी बसविण्यात आला.
माजी मंत्री श्री. खडसे यांनी शनिवारी (ता. १८) त्या जागेला भेट देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर जयश्री महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष श्याम तायडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मुंकूद सपकाळे आदी उपस्थित होते. तसेच, मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी श्री. खडसे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गेल्या अनेक वर्षापासून असलेला पुतळा रात्रीतून हलविणे ही निषेधार्ह बाब आहे. या प्रकारामागे या ठिकाणी असलेल्या २०० कोटी रूपयांच्या जमिनीचा आर्थिक व्यवहार आहे. तसेच त्याला राजकीय नेत्याचेही पाठबळ आहे. समाजातील नेतेही त्यात सहभागी आहेत, तर प्रशासनाचा मोठा सहभाग आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
गेल्या महिन्यात २२ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या ठिकाणी पुतळा हलविण्याबाबत प्रशांत देशपांडे यांनी अर्ज दाखल केला होता. देशपांडे यांच्यासोबत अमित पाटील उपस्थित होते. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी महापालिकेला एक पत्र देवून हा पुतळा या ठिकाणी केंव्हा बसविण्यात आला? याची माहिती देण्यास सांगितले.
मात्र, महापालिकेने आमच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे पत्र दिले. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिवसा उजेडात काम करण्याऐवजी रात्रीच्या अंधारात काम केले. त्यामुळे यात प्रशासनाचा मोठा सहभाग आहे.
तसेच अर्जदार देशपांडे यांच्या मागे एका मोठ्या राजकीय नेत्याने पाठबळ उभे केले. त्यामुळे त्याचे धाडस वाढले. हा मोठा जमिनीचा व्यवहार असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी महापौर श्रीमती महाजन व लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या श्रीमती शिंदे यांनीही आक्रमकपणे आपले मत मांडले. या वेळी समाजातर्फे खडसे यांना निवेदनही देण्यात आले.