शेतकरी अडचणीत; कापूस खरेदी केंद्राचे 'घोडे' अडले कुठे ? 

राजू कवडीवाले
Wednesday, 23 December 2020

शेतकरी हितासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे असताना घोडे अडले कुठे? अशी संतप्त भावना कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

यावल : यावल तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्यापपावेतो सुरू न झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यात ‘सीसीआय’मार्फत आठवड्यातून एक दिवस प्रायोगिक तत्त्वावर केंद्र सुरू करण्याची घोषणा खासदार रक्षा खडसे यांनी केली. मात्र, अजूनही केंद्र सुरू झाले नाही. 

आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी अजून बाकी 

तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांकडून कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेले आहेत. आपला पिकवलेल्या कापूस 'कवडीमोल' भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. तथापि या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा कापूस शासकीय दरात खरेदी होणे नितांत गरजेचे आहे. मात्र, अद्यापपर्यंत तालुकास्तरीय शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. केंद्र व राज्य सरकारकडून नेहमी शेतकरी हिताच्या नुसत्या गप्पा केल्या जातात का अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. तेव्हा शेतकरी हितासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे असताना घोडे अडले कुठे? अशी संतप्त भावना कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. तरी यावल तालुकास्तरीय कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

जिल्ह्यात सर्वत्र कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र, यावल तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र अद्यापपर्यंत सुरू झाले नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. तालुक्याला दोन आमदार व एक खासदार लाभलेले असतानासुद्धा या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार व आमदार यांच्याकडे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, त्याला फारसे यश आलेले नाही. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणेतील जिल्हाधिकारी, तहसीलदार व संबधित अधिकारी काय करत आहेत? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. 

आवर्जून वाचा- मलनिस्सारण, भुयारी गटारांचे काम वेगात; दररोज ४२ दशलक्ष लिटर पाणीनिर्मिती 

 

...अन्यता शेतकऱ्यांमध्ये असंतोष 
मिळालेल्या माहितीनुसार, ‘सीसीआय’मार्फत यावल तालुकास्तरीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी साकळी येथील साई रामजी जीनर्स यांच्यावतीने प्रस्ताव सादर केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या जीनर्सची पाहणी (व्हेरिफिकेशन) सुद्धा केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत केंद्र सुरू करण्याबाबत पाऊले उचलली गेलेली नाही. सर्व कामकाज अगदी कासवगतीने सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असून, शासकीय कापूस खरेदी सुरू होत नसल्याने कापूस शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींसह शासन यंत्रणेने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्वरित कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण होऊ शकते. 

 

 
सीसीआय’कडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी साकळी येथे जिनमध्ये प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत होकार दर्शविण्यात आलेला नाही. 
- श्याम महाजन, संचालक, साईरामजी जिनर्स (साकळी, ता. यावल) 

यावल तालुक्यातून ‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात एकही प्रस्ताव सादर झालेला नाही. त्यामुळे केंद्र सुरू होण्यास विलंब होत आहे. रावेर येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. 
- रक्षा खडसे, खासदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmar marathi news yaval cotton procurement central government