अमळनेरमध्ये प्रजासत्ताकदिनी संतप्त शेतकऱ्यांच्या उपोषणाने वेधले लक्ष 

योगेश महाजन
Tuesday, 26 January 2021

पालिका, महसूल प्रशासन व वनविभागाने याबाबत लक्ष घालावे. शेतकऱ्यांची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा

अमळनेर : गेल्या दोन महिन्यांपासून डुकरांच्या उपद्रवाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वैतागले असून, डुकरांचा बंदोबस्त होत नसल्याने आज शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी तहसील आवारात बेमुदत उपोषण सुरू केले. या प्रकरणी पालिकेने आठ दिवसाच्या आत बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, बंदोबस्त न झाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मध्यस्थी केल्याने तूर्तास या वादावर पडदा पडला आहे.

आवश्य वाचा- राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार !
 

ढेकू रोड, पिंपळे रोड, चोपडा, पारोळा रस्त्यावरील शेतकाऱ्यांचे पीक डुकरांनी फस्त करून मोठे नुकसान केले आहे. डुकरांच्या बंदोबस्ताची जबाबदारी पालिकेची असल्याने त्यांनी याबाबत कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. या प्रकरणी आज माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, प्रभारी प्रांताधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र, फक्त चर्चा नको कारवाई करा असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. यावेळी पुरुषोत्तम पाटील, अधिकार देसले, सुधाकर लांडगे, श्याम कदम, शिवाजी पाटील, एकनाथ चौधरी, शामराव देसले, भगवान देसले आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

अधिकारांचा वापर करावा : साहेबराव पाटील
डुकरांच्या बंदोबस्तासाठी पालिका कठोर कारवाई करेल. मात्र, शासन आदेशानुसार मोकाट डुकरांचा नायनाट करण्याचा अधिकार शेतकऱ्यांसह सर्वांना आहे. त्या अधिकाराची अमलबजावणी व्हावी, असे सांगून त्यांनी अध्यादेशाच्या प्रति शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिल्या. 

वाचा- जळगाव जिल्‍ह्‍यातील शाळांचे असे असणार नियोजन; पाचवी ते आठवीच्या ७३७ शाळा उघडणार 
 

समन्वयातून मार्ग काढा : उन्मेश पाटील
पालिका, महसूल प्रशासन व वनविभागाने याबाबत लक्ष घालावे. शेतकऱ्यांची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी उपोषणस्थळी केले.

डुक्करमुक्त शहर करणार : मुख्याधिकारी
पालिकेकडून डुकरांच्या बंदोबस्तासाठी निविदा काढण्यात येईल. आठ दिवसात शहर डुक्करमुक्त करणार आहोत. शेतकऱ्यांनी आता उपोषण मागे घ्यावे असे लेखी आश्वासन दिल्याने तूर्तास उपोषण स्थगित करण्यात आले आहे. 

आवर्जून वाचा- जळगावातील चौपदरीकरणात महामार्गाचे दोन टप्पे ठरले सावत्र 
 

शेतकरी आक्रमक
पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे यांनी चर्चेप्रसंगी शहरात डुक्कर राहिल्यास चालतील मात्र शेत शिवारात डुकरांचा बंदोबस्त करावा असे वक्तव्य केल्याने शेतकरी संतप्त होऊन आक्रमक झाले. शहरातील मोकाट डुक्करच रात्री शेतशिवारात पिके उध्वस्त करतात त्यामुळे शहर डुक्कर मुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer marathi news amalner crop farmers agitation republic day