esakal | सोलर प्रकल्प पीडित शेतकरी मुंबईत आंदोलन करणार 

बोलून बातमी शोधा

सोलर प्रकल्प पीडित शेतकरी मुंबईत आंदोलन करणार }

दिल्लीहून राजकीय दबाव आणून स्थानिक यंत्रणा कामाला लावली व एकाच दिवसातच कंपनीच्या ‘त्या’ संबंधिताला जामीन मिळवून दिला.

jalgaon
सोलर प्रकल्प पीडित शेतकरी मुंबईत आंदोलन करणार 
sakal_logo
By
आनंन शिंपी

चाळीसगाव ः बोढरे (ता. चाळीसगाव) शिवारातील सोलर पीडित शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या एसआयटी चौकशीला विलंब होत असल्याने पीडित शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांना त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन निवेदन देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे १६ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचे शेतकरी बचाव कृती समितीचे भीमराव जाधव यांनी कळविले आहे.

आवश्य वाचा- अमळनेर तालुक्यातील ४६ गावांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अडीच कोटी अनुदान 
 


जोपर्यंत प्रकल्पाच्या एसआयटी चौकशीबाबतचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत पीडित शेतकरी व कृती समितीचे कार्यकर्ते आंदोलन थांबवणार नाहीत, अशी ठाम भूमिका कृती समिती व पीडित शेतकऱ्यांनी घेतली आहे. चार वर्षांपासून कृती समितीच्या माध्यमातून पीडित शेतकरी न्यायासाठी शासनदरबारी लढा देत आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारच्या राजकीय आश्रयाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक हजार २०० एकर शेतजमिनी बेकायदेशीर, गैरमार्गाने, कवडीमोल लाटण्यात आल्या. त्यातून सोलर प्रकल्प थाटला गेला. दिल्ली येथील बड्या नेत्यांच्या आदेशावरून स्थानिक लोकप्रतिनिधींनीही प्रकल्पाच्या मालकांशी हितसबंध जोपासत त्यांना बेकायदा राजकीय आश्रय दिला. ज्यामुळे शेतकऱ्यांना न्यायापासून वंचित राहावे लागत आहे.

दिल्लीतून कारवाई लांबवली जातेय

आजही दिल्लीहून मदत मिळत असल्याने कारवाई लांबली जात असावी, असा संशय आहे? कारण मध्यंतरी एका बनावट खरेदी प्रकरणी जेबीएम सोलर कंपनीच्या प्रतिनिधीला पोलिसांनी मुंबईहून अटक करून न्यायालयात हजर केले खरे. मात्र, दिल्लीहून राजकीय दबाव आणून स्थानिक यंत्रणा कामाला लावली व एकाच दिवसातच कंपनीच्या ‘त्या’ संबंधिताला जामीन मिळवून दिला. यासाठी तहसीलदार व प्रांत कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही कर्मचारी जामिनासाठीचे कामकाज करीत होते.

आवर्जून वाचा- जीएसटी इंटेलिजेंस पथकाच्या धाडीत स्टील कंपनीच्या जागी चक्क मेडिकल 
 

भाजपच्या नेत्यांचे कंपन्यांना पाठबळ

बनावट खरेदी प्रकरणात एका दिवसात जामीन मंजूर होणे शक्य नव्हते. वास्तविक इतर सहआरोपी ताब्यात घेऊन चौकशी करणे पोलिसांना गरजेचे होते. मात्र, भाजपच्या काही नेत्यांचे पाठबळ या कंपन्यांना सुरवातीपासूनच मिळत असल्याचा आरोप भीमराव जाधव यांनी केला. आता न्यायच मिळत नसल्याने मुंबईत हे धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे