
Cotton Rate News : शेतकऱ्यांना मिळणार वाजवी दरात कापूस बीटी बियाणे
Jalgaon News : तालुक्यात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाणार असून अपेक्षित मागणीप्रमाणे कापूस बियाणे पाकीट व मुबलक खते उपलब्ध होणार आहे. अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
शेतकऱ्यांना १ जून नंतरच बियाणे उपलब्ध होणार असून, हवामानाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी १ जूननंतरच कपाशीची लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (Farmers will get cotton Bt seeds at reasonable price Jalgaon News)
दरवर्षी शेतकऱ्यांना बियाण्याची टंचाई दाखवून जादा दरात बोगस बियाणे विकले गेल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत असते.
मात्र यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरित कापसाच्या बिजी -१ वाणासाठी प्रति पाकीट ६३५ रुपये तर बिजी-२ वाणासाठी ८५३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
बीजी-२ वाणासाठी २ लाख ६२ हजार पाकिटे मागवण्यात आली आहेत. तर नॉन बीटी वाणासाठी ३ हजार ७०० पाकिटे मागवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशी बियाणे उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना टंचाई भासणार नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यावर्षी 'स्वदेशी ५' बियाणे उपलब्ध होणार नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारात बनावट बियाणे उपलब्ध झाल्यास असे बियाणे खरेदी करू नये, तसेच निर्धारित दरापेक्षा जास्त दराने बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती च्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
खतांचा मुबलक पुरवठा
अमळनेर तालुक्यात ३१ मार्च २०२३ रोजी ६ हजार ७०० मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून खरीप हंगाम २०२३ साठी २३हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा होणार आहे.त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याना बियाणे अथवा खताची कोणतीही टंचाई भासणार नाही.