
जळगाव : महाजन, गुलाबराव पाटील यांच्या मैत्रीचा किस्सा माहितीये?
तिकडे वर मुंबईत भाजप- शिवसेना नेत्यांमधून विस्तवही जात नसताना इकडे जळगावात सेनेचे मंत्री आणि भाजप नेत्याचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ सुरू आहे. ‘राजकारणापलीकडची मैत्री’ म्हणून गुलाबराव- गिरीशभाऊंचे कार्यकर्ते या संबंधांचे समर्थन करतीलही; पण या मैत्रीसाठी किंवा मैत्रीमुळे जामनेरात अनेक वर्षांपासून शिवसेनेचे अस्तित्व जाणवत नसेल तर पक्षनिष्ठेचे काय? या प्रश्नाचे उत्तर आज नाही, पण.. कधीतरी द्यावेच लागेल.
राजकारण त्याच्या ठिकाणी, आणि संबंध आपल्या.. राजकारणापलीकडे मैत्री जोपासणारी महाराष्ट्राची संस्कृती. बाळासाहेब ठाकरे- शरद पवार, विलासराव देशमुख- गोपीनाथ मुंडे यासारखी उदाहरणे त्यासाठी बोलकी. जळगाव जिल्हाही त्याला अपवाद कसा ठरेल. राजकारणापलीकडे जोपासल्या जाणाऱ्या मैत्रीचे जिल्ह्यातील उदाहरण म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील व भाजपनेते गिरीश महाजन. अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. २०१४च्या आधी भाजप- सेनेत युती होती तेव्हा तर प्रश्नच नव्हता. मात्र, त्यानंतर या दोन्ही पक्षांत कमालीचे वितुष्ट निर्माण झाल्यावरही या मैत्रीत कटुता कधी येऊ शकली नाही.
आता २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांतील राज्यस्तरावरील नेत्यांमधून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. युती म्हणून निवडणूक लढविल्यानंतरही शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेची चूल मांडल्यावर या दोन्ही पक्षांमधील दरी अधिकच रुंदावली आहे. राजकीय दरीच नाही तर २५ वर्षे युतीत राहिल्यानंतरही हे दोन्ही पक्ष आज कट्टर वैरी बनलेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील नेते, कार्यकर्तेही एकमेकांचे शत्रू झालेत.
जळगाव जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. खासदार उन्मेश पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटलांमध्ये महिनाभरापासून सुरु असलेले वाक्युद्ध ताजेच आहे. फडणवीस सरकारच्या काळात माजी मंत्री एकनाथ खडसे व गुलाबराव पाटलांमधील वादाचे परिणाम आजही समोर आहेत. एवढे असले तरी पक्षीय राजकारणात गिरीश महाजन व गुलाबभाऊंमधील संबंध कधीही दुरावले नाहीत की त्यात कटुता आली नाही. अगदी २०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने सेनेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरांना रसद पुरविल्याची गुलाबभाऊंची तक्रार होती. नरेंद्र मोदींच्या सभेप्रसंगी ते ती खदखद बोलून दाखविणार होते, परंतु त्यांना बोलू दिले नाही. विशेष म्हणजे त्यावेळी या निवडणुकीचे जिल्ह्यातील व्यवस्थापन गिरीश महाजनांकडेच होते.
विधानसभा निवडणुकीतील हा अनुभव आणि त्यानंतरच्या दोन वर्षांतील वितुष्ट तीव्र झालेले असतानाही महाजन- गुलाबरावांमधील संबंध ताणले गेले नाहीत, उलट अधिक दृढ बनल्याचे सध्याचे चित्र आहे. या दोघांच्या मैत्रीतूनच बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत खडसेंविरोधात आघाडी शिजली.. दोघा नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवासही केल्याची चर्चा रंगली.. एरवी पक्षाचा कार्यक्रमही कधी होत नाही त्या जामनेरात गुलाबभाऊ परवा जाऊन आले आणि दिलखुलासपणे महाजनांच्या निवासी दोघांमधील मैत्रसोहळा रंगला..
राज्यात सेना- भाजपत विविध कारणांवरुन उद्भवत असलेल्या वादात दोन्ही पक्षांमधील नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसतात.. प्रत्येक प्रसंगात मंत्री म्हणून गुलाबभाऊही भाजपनेत्यांवर तोंडसुख घेतात.. खासदार उन्मेश पाटलांनाही तो अनुभव आलाय.. पण, अशाही स्थितीत महाजन- पाटलांमधील संबंधांमध्ये कुठलीही दरी निर्माण झाली नाही. त्यांच्यातील निखळ मैत्री इतकी घट्ट की, मुलुखमैदान तोफ जामनेरात कधीही पक्ष कार्यक्रमासाठी धडाडली नाही.. की गिरीश महाजनांची तलवार जळगाव ग्रामीणमध्ये कधी चालल्याचे ऐकिवात नाही. राजकारणापलीकडचे संबंध जोपासताना आपापल्या पक्षाचा विस्तार करणेही टाळणार्या या दोघांच्या नेत्यांच्या मैत्रीला मानाचा मुजरा..!
Web Title: Girish Mahajan And Gulab Raghunath Patil You Know The Story Of Friendship
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..