esakal | मका, ज्वारी खरेदी शासन ३० जूनपर्यंत करणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Maize.jpg

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ७६०, तर ज्वारीला २ हजार ५५० रुपये जाहीर केलेल्या हमीभावाने शासन खरेदी करेल, असे सांगितले. त्याप्रमाणे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकी संघामार्फत ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यात चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सातशे मका व तीनशे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 

मका, ज्वारी खरेदी शासन ३० जूनपर्यंत करणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे मका व ज्वारी खरेदी करता यावी, यासाठी ठिकठिकाणी केंद्र सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने आतापर्यंत तालुक्यातील जवळपास सातशे मका व तीनशे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ही योजना मूळ महाराष्ट्र शासनाचीच असून, ३० जूनपर्यंत मका व ज्वारीची खरेदी केली जाणार आहे’, अशी माहिती शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांनी दिली. 
यासंदर्भात श्री. साळुंखे म्हणाले, की ‘कोरोना’च्या संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने मका व ज्वारी खरेदी करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशन व तालुका शेतकी संघातर्फे शासकीय हमीभावाने मका व ज्वारी खरेदीला सुरवात झाली. करगाव रस्त्यावरील गणपती मंदिर परिसरातील शासनाच्या गुदामात ही खरेदी सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका व ज्वारीचे उत्पादन घेतले. मात्र, ‘कोरोना’च्या संकटामुळे बहुसंख्य अन्नप्रक्रिया उद्योग बंद पडल्याने शेतकऱ्यांना मका व ज्वारीची विक्री मातीमोल भावाने करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ७६०, तर ज्वारीला २ हजार ५५० रुपये जाहीर केलेल्या हमीभावाने शासन खरेदी करेल, असे सांगितले. त्याप्रमाणे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकी संघामार्फत ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यात चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सातशे मका व तीनशे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मक्याची हेक्टरी ५४ क्विंटल व ज्वारीची हेक्टरी १९.५० क्विंटल या मर्यादेत खरेदी करण्यात येत आहे. ही योजनाच मूळ महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आभार मानले. ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून, शेतकऱ्यांनी आपला मका किंवा ज्वारी पीकपेरा असलेला सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स घेऊन शेतकी संघात नोंदणी करावी व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाचा लाभ घ्यावा. 


 

loading image