भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शिरुड गावाची अनोखी शक्कल; जाणून घ्यायचयं, मग वाचा सविस्तर !

उमेश काटे
Wednesday, 13 January 2021

पॅनलप्रमुखांनी लढविलेली ही अनोखी शक्कल चर्चेचा विषय ठरत आहे. या कृतीमुळे कोणताही सदस्य आपल्या कार्यकाळात अफरातफर करणार नाही.

अमळनेर : ग्रामपंचायत ग्रामस्तरावरचे ‘मिनी मंत्रालय’ असते. या मंत्रालयात योग्य उमेदवार निवडून आल्यास गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. याच पार्श्वभूमीवर शिरूड (ता. अमळनेर) येथे स्वच्छ व पारदर्शी कारभार ग्रामपंचायतीत व्हावा, तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. जो इच्छुक उमेदवार सद्य:स्थितीत निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे अनोख्या सूत्राने या निवडणुकीत एक वेगळाच रंग आणला आहे.

 

 शिरूड (ता. अमळनेर) येथे ग्रामपंचायतीत ११ जागांपैकी सुमारे चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सात जागांसाठी जनताजनार्दन पॅनल व प्रगती पॅनलमध्ये सरळ लढत असून, १५ उमेदवार निडणुकीच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीत पारदर्शी कारभार असेल तरच गावाचा कायापालट होऊ शकतो, यासाठी पॅनलप्रमुख माजी सरपंच महेंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, माजी उपसरपंच डी. ए. धनगर, अमित पाटील व माजी सरपंच अरुण मोरे यांनी अनोखी शक्कल लढविली आहे.

काय आहे सुत्र

जनताजनार्दन पॅनलतर्फे प्रत्येक उमेदवाराकडून ग्रामपंचयतीच्या नावाने एक कोरा धनादेश घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंच या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर जर कोण्या सदस्याने अफरातफर केली तर पॅनलप्रमुख या नात्याने त्यांच्याकडून दुप्पट रक्कम भरून वसूल करण्यात येईल. यासाठी पॅनलप्रमुखांनी लढविलेली ही अनोखी शक्कल चर्चेचा विषय ठरत आहे. या कृतीमुळे कोणताही सदस्य आपल्या कार्यकाळात अफरातफर करणार नाही, तसेच भ्रष्टाचाराला वाव देणार नाही, पर्यायाने लोकाभिमुख काम होऊन गाव प्रगतिपथावर जाईल, अशी शाश्वती पॅनलप्रमुख तथा माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

 

हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन 
शिरूड येथे सध्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत सुरवातीलाच हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन शिरूडकरांनी घडविले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. यात केवळ खाटीक समाजाचे एकच घर आहे. मात्र तरीसुद्धा वॉर्ड क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण महिलांमधून अफसाना अकबर खाटीक यांना बिनविरोध निवडून दिले. या राष्ट्रीय एकात्मतेच्या कृतियुक्त संदेशाने खाटीक परिवार पूर्णपणे भारावला आहे. विशेष म्हणजे, याच वॉर्डातून जनताजनार्दन पॅनलच्या अनिता दिलीप पाटील, तर प्रगती पॅनलकडून नरेंद्र राजाराम पाटील व सुरेखा वसंत पाटील या दोन अशा चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news amalner shirude pepole new trick election candidet cheke